33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeराजकीयKoshyari's Controversial Statement : "अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !"

Koshyari’s Controversial Statement : “अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !”

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी यांच्याबद्दल विधान करून नव्या वादाला सुरुवात केली आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे आता सगळीकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे नाही तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतात. त्यांनी आता पर्यंत अशी बरीचशी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत, ज्यामुळे राज्यात अनेक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. नुकतीच राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगातील हिरो आहेत. राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित यांनी ट्विट करत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, “राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते.” तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी राहुल गांधींवर टीका केली. अशा लोकांना देखील रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून खडेबोल सुनावले आहेत.

तर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र आणि शिवद्रोही म्हंटले आहे. “राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल. उगाच उठायचं अणि जीभ टाळला लावायची हे धंदे बंद करा,” असे संतोष शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Koshyari’s controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबाबत पून्हा वादग्रस्त वक्तव्य

United Nations Security Council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी भारताला फ्रान्सचा पाठिंबा

Ambadas Danve: संदीपान भुमरेंचे मनी लाँड्रींग, दारूची नऊ दुकाने !; अंबादास दानवेंचा आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, “राज्यपालांनी नेहमीच महापुरुषांचा अवमान करण्याचे काम केले आहे. त्यांना तत्काळ महाराष्ट्राबाहेर पाठवावे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. ते नेहमीच आमचे हिरो असतील. राज्यपालांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा असेल तर प्रभू राम आणि भगवान कृष्णही म्हातारे झाले आहेत. मग आपण नवीन देव निवडू का ? राज्यपालांचे हे वक्तव्य निंदनीय आहे.” असेही आनंद दुबे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी