या लेखाचं शिर्षक पाहिल्यानंतर तुमच्या मनात, विशेषत: भाजपवर प्रेम असलेल्या लोकांच्या मनात एक गोष्ट वळवळली असेल. ती म्हणजे, तुषार खरात हे मुद्दामहून देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांच्या विरोधात लोकांमध्ये विष पसरवत आहेत(Devendra Fadanvis good and Bad Politician). पण मी तुम्हांस सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर मला आदर आहे. याची काही कारणं आहेत. महत्वाचं म्हणजे, माझ्या २५ वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दित मी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला सर्वाधिक भेटलोय.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री का झाले नाहीत ?
मी सकाळमध्ये ‘सकाळ इन्व्हिस्टीगेशन टीम’चा म्हणजेच एसआयटीचा प्रमुख असताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या पाच वर्षांच्या कारकिर्दित मी किमान २० – २५ वेळा देवेंद्र फडणविसांना भेटलो असेल. आमचे ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याबरोबर मी फडणवीस यांना नेहमी भेटायला जायचो. त्यामुळं आमच्या सकाळच्या कोणत्याही उपक्रमासाठी फडणवीस यांची अपॉईन्मेट घ्यायची असेल, किंवा त्यांना कार्यक्रमाला बोलवायचे असेल तर ती जबाबदारी माझ्यावर पडायची, आणि देवेंद्र फडणवीस ती लागलीच मान्यही करायचे.
एकदा तर फडणवीस यांनी मला तब्बल एक तासाची मुलाखत दिली होती. अन् त्यावर मी सकाळमध्ये पानभर फिचर केलं होतं. त्याहून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मी छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची आठ थैल्या कागदपत्रे शोधून काढली होती. त्या ठिकाणी मला पोलिसांची मदत हवी होती. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. फडणवीस यांनी त्यावळचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख प्रवीण दिक्षित यांना निरोप देवून पुढच्या १५ ते २० मिनिटांत भुजबळ यांच्या एका गुप्त ठिकाणी पोलिसांची धाड टाकायला लावली होती. त्यात आठ थैल्या सरकारी कागदपत्रे सापडली होती. त्यावर आम्ही सकाळ व साम टिव्हीने जोरदार बातम्यांचा सपाटा लावला होता. आमच्या या कामगिरीची दखल घेवून फडणवीस यांनी त्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तब्बल १४ अधिकाऱ्यांना एका झटक्यात निलंबित करून टाकले होते. राजभवनच्या समोर ‘द लिजेंड’ नावाचा एक टॉवर आहे. हा तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घोटाळा आहे. हा घोटाळाही त्यावेळी माझ्या टीमने उघडकीस आणला होता. माझे सहकारी गोविंद तुपे यांना त्यासाठी प्रेस क्लबचा एक लाख रूपयांचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते मिळाला होता. फडणवीस यांच्या अशा या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्यामुळं व्यक्तीगत माझी, आणि आमच्या ‘सकाळ इन्व्हिस्टीगेशन टीम’ पत्रकारिता क्षेत्रात उंची वाढायला मदत झाली होती.
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ ड्रिम प्रोजेक्टला त्यांच्याच कार्यकाळात लागली घरघर
त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर मला आदर आहे. फडणवीस हे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व आहे. समोरचा माणूस काय लायकीचा आहे, हे ते लगेचच ओळखतात. त्यांच्याकडे आपण एखादा विषय़ मांडला, त्यांना एखादं पत्र दिलं तर त्या विषय़ाची खोली त्यांना चटकन कळते. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. खरंतर, अनेक पत्रकारांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या या ओळखीचा मी यापूर्वीच व्यक्तिगत लाभासाठी फायदा उचलू शकलो असतो, पण मी ते केलं नाही. कारण मी कधीच कोणत्याही व्यक्तीच्या फार जवळ जात नाही. कारण ज्यावेळी मला माझा पत्रकारितेचा धर्म बजावण्याची वेळ येईल, तेव्हा समोरच्या व्यक्तीवर पत्रकारितेचे आसूड ओढण्याचा माझा अधिकार शाबूत राहिला पाहीजे, याची मी काळजी घेतो. देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य कोणताही मोठा नेता असो, मी त्यांच्यावर आसूड ओढण्याचा माझा अधिकार आजही शाबूत ठेवलेला आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे.