32 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकीयफडणवीस खोटारडे, ललित पाटीलवरून राऊतांचा पलटवार

फडणवीस खोटारडे, ललित पाटीलवरून राऊतांचा पलटवार

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस धडधडीत खोटे बोलत असून खोटे बोला, पण रेटून बोला याला जागत आहेत, असा जोरदार पलटवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ड्रगमाफिया ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिकचा शहरप्रमुख होता, असा आरोप काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस हे सर्वात अपयशी गृहमंत्री असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. एवढेच नाही तर नाशिकचा कोण कधी शहरप्रमुख होते, याची यादी आम्ही जाहीर केली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

‘ललित पाटील भुसेंचा खास माणूस’

ड्रगमाफिया ललित पाटील शिवसेनेत असल्याचा दावा केला जातोय. पण शिवसेनेत दादा भुसे त्याला घेऊन आले होते. आपला खास माणूस असे ललित पाटीलचे कौतुक दादा भुसेंनी केले होते, असा पलटवार संजय राऊत यांनी केला. ललित पाटीलवरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ललिता पाटीलला अटक झाली होती मग त्याला कुणी संरक्षण दिले, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज फडणवीसांचा वार परतावून लावला.

ललित पाटील शिवसेनेचा कधी साधा उपशाखाप्रमुख किंवा गटप्रमुखही नव्हता आणि जे लोक आज फडणवीसांंसोबत मंडळात मांडीला मांडी लावून बसले आहेत तेच लोक ड्रगमाफिया ललित पाटीलला पोसत होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

फडणवीस काय बोलले होते?

ललित पाटील शिवसेनेचा शहरप्रमुख होता म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला वाचवले, असा आरोप काल (२१ ऑक्टोबर) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. १० डिसेंबर २०२० रोजी ललित पाटीलला अटक. तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. त्याला अटक झाली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला नाशिकचे शहरप्रमुख केले. अटक झाल्यानंतर ललित पाटीला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर लगेचच ललित पाटील ससून रुग्णालयात दाखल झाला. सरकारी पक्षाकडून तपासणीसाठी अर्जही करण्यात आला नाही. त्यामुळे आरोपीची उलटतपासणीच झालेली नाही. याला जबाबदार कोण? तत्कालीन मुख्यमंत्री की गृहमंत्री? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता.

फडणवीस सर्वात अपयशी गृहमंत्री – राऊत

ललित पाटील प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी केलेले आरोप पाहता फडणवीसांचे त्यांच्या गृहखात्यावर नियंत्रण नाही किंवा गुप्तचर विभाग त्यांना चुकीची माहिती देत आहे, असा दावा करत राऊतांनी केला. एवढेच नाही तर इतका अपयशी गृहमंत्री कधी पाहिला नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

गुंडांना कोण पोसतोय?

अनेक जिल्ह्यांतील गुन्हेगार, ड्रग्जमाफिया, खुनी, चोर, दरोडेखोरांना कोण पोसतंय? ईडी, सीबीआयचे खटले होते ती मंडळी भाजपासोबत गेली. म्हणजेच भाजपच गुंडांचा पोशिंदा आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी पोलीस, ईडी अटक करणार होती ते भाजपसोबत गेले, असा आरोप संजय राऊतांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी