28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीयएकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक, ते शिवसेना सोडणार नाहीत : संजय राऊत

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक, ते शिवसेना सोडणार नाहीत : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची कोणी भाषा करत असेल, तर तसे होणार नाही. यापूर्वी भाजपने एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला नाही. आता दुसऱ्यांदा छातीवर नाही, तर पाठीवर घाव घातला आहे, तो सुद्धा यशस्वी होणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

एकनाथ शिंदे हे कडवट व निष्ठावंत शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या वाईट काळातही ते आमच्यासोबत राहिलेले आहेत. कालच्या निवडणुकीत आमचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे आहेत. त्यांच्या खात्यात कोणी ढवळाढवळ करत होते का? काही गैरसमज असतील तर दूर करता येतील, अशा शब्दांत राऊत यांनी शिंदे यांना साद घातली आहे. भाजपकडून सरकार पाडण्याच्या हालचाली चालू आहेत. मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करण्यासारखे आहे.

मंगलप्रभात लोढा मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा करीत होते. मुंबईवर ताबा मिळविण्यासाठी शिवसेनेवर घाव घालण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेत आईचं दुध विकणारी औलाद निर्माण होणार नाही. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदांसाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर कुणीही खुपसणार नाही. जे बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत आहोत, असे ते म्हणाले.

सुरतमध्ये गेल्याच्या अनेक आमदारांची नावे मी दूरचित्रवाणीवर पाहात आहे. पण प्रत्यक्षात त्यातील अनेकजण आता वर्षा निवासस्थानी आहेत. संजय राठोड हे आता वर्षा निवासस्थानी आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. सुरतमध्ये असलेले अनेक आमदार संपर्कात आहेत. आम्हाला इथं फसवून आणण्यात आल्याचे काही आमदारांनी सांगितले आहे. आमदार पळविण्यासाठी गुजरातचीच निवड का करण्यात आली. त्यांना सुरतमध्येच का ठेवण्यात आलं, असाही सवाल राऊत यांनी केला.

माझे शरद पवार यांच्यासोबत बोलणे झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. राजकारणात अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. भाजपने यापूर्वी प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला नव्हता. आता दुसरा डाव टाकला आहे. एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या अनेक संघर्षात, आंदोलनात आमच्यासोबत होते. जे चित्र निर्माण केलं जातंय त्यात मला तथ्य वाटत नाही.

आजच अनिल परब यांना नोटीस पाठविली आहे. कारण या कठीण काळात आमचा सहकारी आमच्यासोबत राहिला नाही पाहिजे हा भाजपचा हेतू आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू आहे. बाळासाहेबांची निष्ठा आम्हाला शिकवू नका. ठाकरे सरकार असते तर त्यांनीही या सरकारला आशिर्वाद दिले असते. काही मतांचा हिशोब लागत नाही. दोन – तीन मते कुठे गेली हे पाहावे लागेल.

हे सगळे लोकं बाळासाहेबांवर प्रेम करणारे आहेत. अत्यंत वाईट काळातही ही लोकं शिवसेनेसोबत राहिलेली आहेत. आताही त्यांच्या मनात सोडण्याचा विचार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान पॅटर्न इथे यशस्वी होणार नाही. सुरतमधून तिथून अनेकांना परत यायचं आहे. पण त्यांना जबरदस्तीने तिथे ठेवले आहे. त्यांना परत यायचे आहे. सर्व काही ठीक होईल, असे राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

बाळासाहेब थोरातांनी सांगितली भाजपची एक पद्धत…

‘रामराजेंचे एक मत बाद झाले याचा आनंद’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!