विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक रंगात येवू लागली आहे(J.M.Abhyankar Exposed Kapil Patil) . शिवसेनेकडून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील हे यावेळी निवडणूक लढविणार नाहीत. कपिल पाटील यांच्याऐवजी शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत. सुभाष मोरे यांची ‘लय भारी’ने नुकतीच मुलाखत घेतली होती. सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्यामार्फत ज. मो. अभ्यंकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज. मो. अभ्यंकर हे यापूर्वी शालेय शिक्षण खात्यात उपसचिव या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या सहीने शिक्षणसेवक पदाचा शासकीय निर्णय जारी करण्यात आला होता. शिक्षकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करणारा हा निर्णय आहे. हा निर्णय ज. मो. अभ्यंकरांच्या सहीने काढण्यात आला होता, असा आरोप सुभाष मोरे व कपिल पाटील यांनी केला होता. सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्या या आरोपाला ज. मो. अभ्यंकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. शिक्षणसेवक हा प्रकार चुकीचाच आहे. परंतु तो निर्णय मंत्रीमंडळाने घेतलेला होता. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयावर सचिव, उपसचिव अथवा कार्यासन अधिकारी यांच्यापैकी कुणाला तरी सही करावी लागते. मी त्यावेळी उप सचिव होतो, म्हणून मला तिथे सही करावी लागली होती. त्या जीआरची पूर्ण फाईल जर तपासून बघितली नोटींगमध्ये हा निर्णय योग्य नसल्याचे मी माझे मत लेखी मत मांडलेले होते. पण १८ वर्षे आमदार म्हणून काम केलेल्या कपिल पाटील यांना प्रशासनातील काम कसे चालते हे माहिती नाही का ? मुद्दाम शिक्षकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा उपद्व्याप ते करीत असल्याचे अभ्यंकर यांनी म्हटले आहे.