25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयतहसिलदारांचेही पदे कंत्राटी पद्धतीने, काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

तहसिलदारांचेही पदे कंत्राटी पद्धतीने, काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

राज्यात सरकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास विरोध असतानाच दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या जाहिरातीने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. जळगावमध्ये तहसिलदार किंवा नायब तहसिलदार या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती सहा महिन्यांसाठी आहे आणि दर महिन्याला ठराविक रक्कम मानधन म्हणून दिली जाणार आहे. सध्याच्या तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांना मिळणाऱ्या पगारापेक्षा हे मानधन खूपच कमी आहे. त्यामुळे मोठी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची चाचणी असावी, अशी चर्चा आहे. दरम्यान, या भरतीला काँग्रेसने विरोध केला असून ही भरती रद्द करा, अन्यथा युवकांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात ८ तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पदांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज मागवले आहेत. यासाठी ६८ वर्षांच्या वयोमर्यादेची अट टाकली आहे तर मानधन ४० हजार रुपये नमूद केले आहे. तसेच सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडल अधिकारी पदासाठीही ६८ वर्षांची अट असून त्यांना २५ हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.

राज्यात आधीच बेकारी वाढत आहे. त्यातच नोकरभरतीच्या चर्चा होत त्यासाठी कंत्राटी पद्धतीचा अवलंब होणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. असे असताना जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली सेवानिवृत्त तहसिलदार आणि सेवानिवृत्त कारकुनांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून तयारी करणाऱ्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा सरकारने उचलला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य सरकारने आधीच उद्ध्वस्त केले आहे आणि आता तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा निर्धार सरकारने केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

म्हणूनच सरकारने ही जाहिरात तात्काळ रद्द करुन नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

हे ही वाचा

गांधीजींचे विचार शिल्लक नाहीत, गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक

…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी

यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार?

राज्यात वेगवेगळ्या विभागांत लाखो पदे रिक्त आहेत. काही पदांसाठी परीक्षेतील कॉपी प्रकरण, काही पदांच्या परीक्षेचा अद्याप निर्णय न झाल्याने स्पर्धा परीक्षांसाठी दोन-दोन-तीन-तीन वर्षे कसून अभ्यास करणाऱ्या युवकांची मेहनत वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही जाहिरात रद्द करण्याची मागणी केली आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी