मराठा आरक्षणाची धुरा हाती घेतलेले कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज अखेर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. तोपर्यंत सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास अयशस्वी ठरले तर काय करायचे, याची घोषणा जरांगे-पाटील यांनी आज जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी गावात केली. जरांगे-पाटील यांनी दोन टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली असून ही आरपारची लढाई असल्याचे स्पष्ट केले. सरकारला दिलेली मुदत संपण्याअगोदर दोन दिवस आधी आंदोलन कसे असेल, याची घोषणा करू, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे आज आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचवेळी आता वाटाघाटी नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र
राज्य सरकारने २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर जरांगे-पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. २५ ऑक्टोबरपासून हे उपोषण सुरू होईल आणि ते अंतरवाली सराटी गावात होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार आणि तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ न देण्याचा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे. आरक्षणाची लढाई सुरूच राहील पण मराठा समाजातील कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.
दोन टप्प्यांत आंदोलन
मराठ्यांचे हे आंदोलन दोन टप्प्यात असेल. २५ ऑक्टोबरपासून जरांगे-पाटील बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्याचवेळी गावागावातील मराठा समाज सर्कलवर साखळी उपोषण करतील. आणि इतर गावांमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत वैधानिक पदावर असलेल्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रत्येक गावात शांततेत मेणबत्ती मोर्चा काढण्याचेही आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. २८ ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनला सुरुवात होईल. हे आंदोलन कसे असेल, याची दिशा २५ ऑक्टोबरला जाहीर केली जाईल, असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.
‘त्यांच्या’सोबत कोण आहे?
यावेळी जरांगे-पाटील यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना टोला लगावला. ‘मला कळत नाहीत म्हणून माझ्यासोबत एवढे मराठे आलेत. त्यांच्यासोबत कोण आहे?’ शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राला काल विरोध करणारी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून जरांगे-पाटील यांनी ही टीका केली.
हे ही वाचा
जरांगे-पाटलांबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर….
‘मराठा-कुणबी’ संदर्भात काय बोलले रामदास कदम?
फडणवीस खोटारडे, ललित पाटीलवरून राऊतांचा पलटवार
जरांगेंचे काय ठरले?
- २५ ऑक्टोबरपासून जरांगे-पाटील यांचं बेमुदत उपोषण
- मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी
- प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मराठा समाजाचे साखळी उपोषण
- प्रत्येक गावात शांततेच मेणबत्ती मार्च काढणार
- २८ ऑक्टोबरपासून सुरू करणाऱ्या आंदोलनाची दिशा २५ ऑक्टोबरला स्पष्ट करणार
- मराठ्यांचे आंदोलन शांततेत असेल
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध असून आम्ही दिलेला शब्द पाळणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे थोडा धीर धरा, असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.