26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकीयजातनिहाय जनगणनेच धार्मिक उन्माद संपेल - जनता दल (यू)...

जातनिहाय जनगणनेच धार्मिक उन्माद संपेल – जनता दल (यू) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा आशावाद

देशात भाजपाविरोधात लोकशाहीला मानणारे 28 पक्ष इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) राज्यात वेगाने शिरकाव करत असतानाच, नितीश कुमार यांचा जनता दल (यू) राज्यात आपले पाय घट्ट रोवू पाहत आहेत. रविवारी या पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर शाळेच्या हॉलमध्ये पर पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘देशात जातनिहाय जनगणना झाली तर धार्मिक उन्माद समाप्त होईल.’ असा आशावाद त्यांनी व्यक्त करत, ‘बिहारने जातनिहाय जनगणना करून देशाला पुढे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. महाराष्ट्र तर समाजवादाची प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्र मागे राहणार नाही. 2024 ला देशात परिवर्तन होणार. त्यासाठी देशातल्या समाजवाद्यांनी सज्ज राहायला हवे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘केंद्र सरकारने देशातील लोकांचा विश्वास गमावलेला आहे. लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवून केंद्र सरकार जबाब देऊ शकत नाही. प्रधानमंत्री जनतेचे सेवक नसून इव्हेंट मॅनेजर आहेत. या सरकारला लोकलाज नाही. सर्व प्रकारची दडपशाही करत सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, या अघोषित आणीबाणी विरुद्ध आपण लढूयात आणि जिंकूयात. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, मधू दंडवते, मृणालताई गोरे यांच्या भूमीला समाजवादाच्या रंगाने रंगवून टाका,’ असं आवाहनही ललन सिंह यांनी जद(यू.) कार्यकर्त्यांना केलं.

बिहार सरकारचे जलसंधारणमंत्री संजय कुमार झा, ‘मुंबईकर’ असलेले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर, जद(यू.) राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील, प्रदेश अध्यक्ष शशांक राव, प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख यांची भाषणे यावेळी झाली. मुंबई अध्यक्ष अमित झा यांनी सर्वांचे स्वागत केले. जद(यू.) पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते. तिन्ही मान्यवरांचा यावेळी महात्मा फुले यांची पगडी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा
वनविभाग आणि सहकार विभागाच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर! विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
‘कुठेतरी आपलं चुकतंय…’ विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!
कोथरुडमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’, आठवडाभर रंगणार गांधींजींच्या विचारांचा जागर!


संजय कुमार झा यांनी महाराष्ट्रात जद(यू.) ला अनुकूल वातावरण असून आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता परिवार मोठ्या ताकदीने उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.

दक्षिणेतील समाजवादी नेत्यांची भेट
कर्नाटकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ मधील सेक्युलर जनता दलातील प्रमुख नेत्यांनी मुंबईत ललन सिंह यांची भेट घेऊन जद(यू.) मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

मृणालताईंना अभिवादन
मेळाव्यापूर्वी ललन सिंह आणि मान्यवर यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे असलेल्या मृणालताई गोरे यांच्या स्मृती दालनाला भेट दिली. मृणालताई यांच्या आठवणी यावेळी जागवल्या. ट्रस्टच्या विश्वस्त यांनी यावेळी मान्यवरांचे स्वागत केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी