29 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरराजकीयकल्याण -डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार; खासदारकीसाठी कथोरे चर्चेत, महापौर पदावर भाजपचा डोळा

कल्याण -डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार; खासदारकीसाठी कथोरे चर्चेत, महापौर पदावर भाजपचा डोळा

कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विद्यमान भाजपा आमदार किसन कथोरे इच्छुक असून त्यांना शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तशा हालचालींना वेग आला आहे. असे असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदावर भाजपने डोळा ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनाबरोबर युती न करता स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ही बाब त्यांनी काही नामदार मंडळींच्या कानावर घातल्याचे समजते. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक भाजपा एकट्याने लढवते का हे पाहणे, उत्सुकतेचे झाले आहे.

शिवसेनेचे अभ्यासू खासदार प्रकाश परांजपे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत शिवसेनेने त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांना तिकीट देत निवडूनही आणले. त्यानंतर शिवसेनेने आनंद परांजपे यांना कल्याण लोकसभा मतदार संघाचे तिकीट देत निवडून आणले. पण पक्षात होत असलेली कोंडी आदी कारणे देत ते राष्ट्रवादीमध्ये आले.
त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी मंडळीना ही निवडणूक लढवायला सांगितली. पण कोणीही तयार झाले नाही.

अखेर श्रीकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आले आणि ते चांगल्या मतांनी विजयी झाले. तेव्हा शिवसेना आणि भाजपामध्ये सख्य होते. त्यामुळे दोन्ही कडचे कार्यकर्ते यांच्या सहकार्य, मदतीने श्रीकांत शिंदे सहज निवडून आले. पण गेल्या काही वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना भाजपा एकत्र लढले. मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये बिनसले आणि राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर आहे. महविकास आघाडीचा प्रयोग राज्यात होत, उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.

पण महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढू लागले. अर्थमंत्री असलेले अजित पवार आपल्या पक्षाच्या आमदारांना जास्त विकास निधी देतात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करता, ते दाद देत नाहीत, असा आरोप शिवसेना आमदार करू लागले. अखेर एक वर्षापूर्वी अस्वस्थ ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि भाजपाबरोबर सोयरिक केली. नंतर ते मुख्यमंत्री झाले. २ जुलैमध्ये अजित पवार ८ आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आणि राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वजन काहीसे कमी झाले.

हा सगळा इतिहास असताना भाजपला राज्यात आपले पाय रोवायचे आहेत. यासाठी त्यांनी लोकसभानिहाय केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर वर्षभरात दोन तीनदा ठाणे, पालघर जिल्ह्यात येऊन गेले असून ते कार्यकर्त्यांचे मते जाणून घेत पक्षात ऊर्जा निर्माण करत आहेत. असे असताना भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे पक्षावर नाराज आहेत. ही बाब शिवसेना ठाकरे गटाने हेरली आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी भाजपामध्ये एकच वेळी प्रवेश केला. कपिल पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमधले असल्याने त्यांचे पक्षात वजन आहे. यातून त्यांना केंद्रीय मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. पण कथोरे यांना भाजपने काही मोठे केले नाही. वास्तविक कथोरे हे राष्ट्रवादीचे आमदार होते. नंतर ते भाजपामध्ये आले. त्यांना एकदा तरी मंत्री पद मिळेल असे वाटत होते.

पण त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या रवींद्र चव्हाण यांना भाजपने मंत्री केले. दोनदा कथोरे यांची संधी गेली. त्यामुळे ते पक्षावर नाराज आहेत. भाजपामध्ये राहून साहेबांनी खितपत पडण्यापेक्षा कल्याण लोकसभा लढवावी, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. मातोश्रीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत कथोरे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन खासदारकी लढवावी यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. जर कथोरे महाविकास आघाडीतून कल्याण लोकसभेसाठी उभे राहिल्यास विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना ते अडचणीचे ठरू शकते, असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा 
…आणि शरद पवार रमले चित्रात
गणरायासाठी थर्माकोलच्या मखरांऐवजी सजावटीसाठी कोणत्या वस्तू बाजारात मिळतायत ?
दहीहंडीत फुगड्या घालून चार्ज झालेले सोमय्या पुन्हा मैदानात!

तर कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक वर्ष शिवसेना भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदा महापौर पद आम्हाला मिळावे असे भाजपला वाटत आहे. भाजपचे कल्याण डोंबिवलीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनीही ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही काळात कल्याण डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी