30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरराजकीयMaharashtra Politics : आमदारांना राज्य कसे चालवावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज, सत्यजीत...

Maharashtra Politics : आमदारांना राज्य कसे चालवावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज, सत्यजीत तांबे यांचे खरमरीत पत्र

महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी थेट ज्येष्ठ राजकीय नेत्यांना उद्देशून पत्र लिहित सद्यस्थितीतील विस्कटलेल्या राजकीय घडीला पुन्हा सावरून ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सुचवले आहे. जेष्ठ राजकीय नेत्यांचा अनुभव आणि कार्यशैलीची ढालच या संपुर्ण अस्थिरतेला उत्तर ठरू शकते असे सत्यजित तांबे यांना वाटते आहे.

सत्ताकारणाच्या अभुतपूर्व नाट्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. या संपुर्ण घडामोडींनंतर लोकशाहीचा नाश होतोय असा आरोपच आता वारंवार करण्यात येऊ लागला आहे, त्यामुळे सध्याची राजकारणाची दिशा नेमकी कुठे चालली आहे यावर सुद्धा अनेकांकडून विचारमंथन सुरू झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी थेट ज्येष्ठ राजकीय नेत्यांना उद्देशून पत्र लिहित सद्यस्थितीतील विस्कटलेल्या राजकीय घडीला पुन्हा सावरून ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सुचवले आहे, शिवाय पक्षांमधील आमदारांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद घडवून आणण्याचा सुद्धा पर्याय सुचवला आहे. जेष्ठ राजकीय नेत्यांचा अनुभव आणि कार्यशैलीची ढालच या संपुर्ण अस्थिरतेला उत्तर ठरू शकते असे सत्यजित तांबे यांना वाटते आहे.

सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ राजकीय नेत्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. पत्रात तांबे लिहितात, पत्रास कारण की, दोन-तीन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडलेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील आमदारांची बाचाबाचीचा अत्यंत दुर्दैवी प्रसंग पाहण्यात आला. एकंदरीतच गेले दीड-दोन वर्ष राज्यात सुरू असलेलं राजकारणही राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभेसं अजिबातच नव्हतं. गेली 20 वर्षं राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अखेर हे असह्य झालं आणि म्हणूनच हा पत्रप्रपंच! असे म्हणून त्यांनी पत्रामागचे कारण उलगडले आहे.

पुढे सत्यजित तांबे लिहितात, हे पत्र कुठल्याही मागणीसाठी नसून भावना व्यक्त करण्यासाठी आहे. अशा वाईट राजकीय घटनांमुळे युवकांनी व पुढल्या पिढीने लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झालेल्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी हे विचार मांडत आहे. लोकशाहीची गरज खरंच आहे का, सध्या लोकशाही आहे का, लोकशाहीचं भविष्य काय, असे अनेक प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाले आहेत, त्यामुळे खरंच लोकशाहीचे पुढे काय होणार असा चिंताक्रांत प्रश्नच सत्यजित तांबे यांनी यानिमित्ताने विचारला आहे.

राज्यातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील ती बाचाबाची पाहताना महाराष्ट्रातील वादविवादाची आणि मतभिन्नतेतूनही एकमेकांचा आदर करण्याची परंपरा माझ्या डोळ्यांसमोरून तरळत होती. महाराष्ट्राला वादविवाद अजिबातच नवीन नाहीत. साहित्याच्या क्षेत्रात अत्रे-फडके वाद अत्रे-माटे वाद असे अनेक वाद गाजले. राज्याच्या समाजकारणातही टिळक-आगरक वाद या महाराष्ट्राने पाहिला आहे, शिवाय गांधी-आंबेडकर वाद हा तर राजकीय वर्तुळात राष्ट्रीय स्तरावर गाजलेला वाद. या वादाची परिणती पुणे करारात झाली. राजकारणात वाद आधी सुद्धा होते याचे उदाहरणादाखल तांबे यांनी म्हटले आहे.

आंबेडकर आणि गांधी यांच्या वैचारीक वादाविषयी सांगताना सत्यजित तांबे लिहितात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधींचं एवढं मतपरिवर्तन केलं की, दलितांकडे पाहण्याचा महात्मा गांधींचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला. तो एवढा बदलला की, त्यानंतर महात्मा गांधींनी आंतरजातीय विवाह सोडून कोणत्याही विवाहाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत.

त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असोत किंवा वसंतराव नाईक असोत, स्व. विलासराव देशमुख, स्व. बॅ. ए. आर. अंतुले, स्व. गोपीनाथ मुंडे, मा. शरदचंद्र पवार साहेब, आर. आर. पाटील, आणि अगदी स्व. बाळासाहेब ठाकरे या सगळ्याच लोकोत्तर राजकारण्यांनी सुसंस्कृत, सौजन्यशील आणि परस्परांबद्दल मतभिन्नता बाळगतानाही आदर बाळगण्याची थोर परंपरा निर्माण केली आणि जोपासली असे म्हणत पुर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण यात फरक दर्शवला आहे.

राजकारणापलीकडे मैत्री जपणाऱ्या सुसंस्कृत राजकारण्यांचं राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख आहे. या सुसंस्कृतपणातच महाराष्ट्राचं मोठेपण दडलं आहे. एस. एम. जोशी विरोधी पक्षनेता होते त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात वारंवार ठाम भूमिका घेतली. पण जोशी साहेब पायउतार झाले त्या वेळी त्यांनी याच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

 हे सुद्धा वाचा…

Shivsena Crisis : आणखी दोन शिलेदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून नितेश राणेंचे कौतुक म्हणाले, यह आमदार ‘कामदार’ है

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष‍ चंद्रशेखर बावनकुळे 30 ऑगस्टला मुंबईत कार्यकर्त्यांना भेटणार

वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना जांबुवंतराव धोटे त्यांच्या आक्रमक शैलीने नेहमी टीका करायचे. पण आपल्या अकरा वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत वसंतराव नाईक साहेबांनी सुसंस्कृतपणा नेटाने जपला, एकही वावगा शब्द त्यांच्या तोंडून कधीच गेला नाही. एकही वावगा शब्द त्यांच्या तोंडून कधीच गेला नाही. म्हणूनच वसंतरावांचं निधन झाल्यावर जांबुवंतरावांच्या डोळ्यांतही आपसुक अश्रू तरळले होते. त्या अश्रुंचं मोल जाणणारा आपला महाराष्ट्र आहे. असे म्हणून महाराष्ट्राची वैभवशाली राजकीय संस्कृतीचे सत्यजित तांबे यांनी कौतुक केले आहे.

स्व. विलासराव देशमुख आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. शरदचंद्र पवार साहेब आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीही जाहीर सभांमधून एकमेकांवर वाग्बाण सोडले. पण या दोघांमधील मैत्रही महाराष्ट्राने पाहिलं. ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांमधून आचार्य अत्रेंना फटकारे लगावणारे बाळासाहेब अनेक बाबतींत अत्रेंना आपला गुरू मानत होते. एवढंच कशाला विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत सौहार्दाचे संबंध आहेतच की! ही काही उदाहरणं झाली.

आपण महाराष्ट्रात राहणारे सगळेच जण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. जनतेच्या हिताला आणि नितीमूल्यांना प्राधान्य देत छत्रपती शिवरायांनी राजकारण केलं. रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये, अशी त्यांची आज्ञाच होती. शत्रुचाही आदर करण्याची त्यांची नीति होती. शाहू-फुले-आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील असंख्य समाजसुधारकांनी आपल्या प्रगल्भ विचारांतून घडवलेला हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न पडावा, अशी वेळ आमदारांच्या त्या वर्तनाने आणली आहे, हे अगदी खेदाने सांगावं लागत आहे. हा प्रकार कोणी घडवून आणला का, यात चूक कोणाची होती, असे अनेक प्रश्न चघळले जातील. पण मुद्दा हा आहे की, ही अशी लोकशाहीसाठी लांच्छनास्पद गोष्ट आपल्या महाराष्ट्रात घडूच कशी शकते असे म्हणून तांबे यांनी दुःख व्यक्त केले.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी राजकारणात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना या क्षेत्रात येण्यामागचा उद्देश माहीत होता. त्यांच्या परीने तो उद्देश त्यांनी नक्की केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारणात स्वत:ला झोकून दिलेल्यांचं उद्दिष्ट होतं स्वातंत्र्यप्राप्ती! त्यानंतर त्याच स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेते राजकारणात सक्रीय झाले. प्रसंगी विरोधी म्हणूनही एकमेकांसमोर उभे राहिले. पण त्यांचं उद्दिष्ट होतं राष्ट्रउभारणी ! पण आजच्या नेत्यांसमोर हे असं काही ठोस उद्दिष्ट किंवा ध्येय आहे का? हा विचार खूप खोलवर होण्याची गरज आहे.

तो सर्वच पक्षांमधील नेत्यांनी करायला हवा. आपण राजकारणात येण्यामागे नेमकं कारण काय? वैयक्तिक स्वार्थ हा प्रत्येकाकडेच असतो, पण त्या पलीकडे जाऊन काही मोठ्या उद्दिष्टासाठी आपण आपली राजकीय महत्त्वाकांक्षा वापरतो का, हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. पण आज राजकारणातून आणि राजकारण्यांच्या मनातून हा उद्देशच हरवल्याचं चित्र आहे. व त्यामुळेच सरकार कुणाचेही येवो, मुख्यमंत्री कुणीही होवो, सामान्य जनतेचे प्रश्न कधीच सुटत नाहीत व सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.

हा उद्देश हरवला की, राजकारणाची दिशाही भरकटते. त्यातून मग विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडला, तसे प्रकार घडतात. एका योगायोगाची गंमत वाटते. हे अधिवेशन सुरू असतानाच हाकेवर असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सर्वपक्षीय आमदारांच्या चालकांसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, म्हणून विधीमंडळ कार्यालयाने एक प्रशिक्षण घेतले. खरंतर, आमदारांच्या चालकांना गाडी कशी चालवावी ह्यापेक्षा आमदारांना राज्य कसे चालवावे ह्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

आपण सर्वजण ज्येष्ठ आहात, जाणकार आहात. आपल्यामध्ये पवार साहेबांसारखा 55 वर्षीय संसदीय राजकारणात काम केलेला नेता आहे. आपण सर्वांनी एका प्रश्नाबाबत विचार करायची गरज आहे. देशाचं भविष्य असलेली युवा पिढी आपल्या लोकप्रतिनिधींच्या वागण्यातून काय धडा घेणार आहे? या तरुणांवर अशा वर्तनाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. राजकारणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. राजकारण म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं क्षेत्र, असा समज या तरुणांनी करून घेतला, तर त्यात त्यांना दोष कसा देता येईल!

त्यामुळे तुम्हा सर्व ज्येष्ठ नेत्यांना माझं एकच आवाहन आहे, पुढल्या पिढीने लोकशाही, संविधान आणि राजकीय व्यवस्था यांवर विश्वास ठेवावा, असं वाटत असेल, तर पुढाकार घ्या! आपापल्या पक्षांमधील आमदारांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद घडवून आणा! मतभिन्नता फक्त निवडणुकीपुरती मर्यादित ठेवून ती वैयक्तिक पातळीवर जाणार नाही, याची शिकवण नव्या पिढीतील राजकारण्यांना द्या! आपण वेळीच सावरलो नाही, तर महाराष्ट्रच्या राजकारणाचा स्तर उत्तर प्रदेश-बिहार या राज्यांचा सारखा झाल्याशिवास रहाणार नाही व तसं झालं, तर तो आपल्या सगळ्यांसाठीच मोठा काळा दिवस ठरेल असे म्हणून सत्यजित तांबे यांनी भविष्यकालीन भीती दर्शवली आहे.

दरम्यान, तांबे यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळातून आता कोणत्या प्रतिक्रिया उमतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी