‘शिवसेना म्हणजे झंझावात. आडपडदा बिलकूल नाही. जी गोष्ट चुकीची आहे, ती ठणकावून सांगायची. त्यासाठी व्यंगचित्रांचा आधार घ्यायचा. लेखणी तलवारीप्रमाणे चालवायची आणि गरज भासेल तेव्हा रस्त्यावर उतरून लढाई करायची. नाठाळाच्या घरात घुसून कानाखाली आवाज काढायची वेळ आली तरी त्यासाठी मागे-पुढे पाहायचे नाही.’ शिवसेनेची ही ओळख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली.
मुळात शिवसेना स्थापन का करावी लागली यालाही मोठा इतिहास आहे. ही मुंबई मराठी माणसांची आहे. मराठी माणूस मुळातच इमानी, कष्टाळू अन् तितकाच स्वाभिमानी. शिवरायांचा बाणा प्रत्येक मराठी माणसामध्ये दिसतो. मराठी माणूस कधी फाजिल वागत नाही. तो विनाकारण कधी कुणाला त्रास देत नाही. विनाकारण कुणावर अन्याय करीत नाही. पण, समोरच्याने मराठी माणसांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला की, मग मात्र मराठी माणूस ते सहन करीत नाही.
मराठी माणसांच्या या स्वभावामुळेच मुंबईत उद्योग वाढला आणि तो विस्तारला. कारण- उद्योजकांना माहीत आहे की, मराठी माणूस आपला उद्योग लुटून नेणार नाही. उलट मराठी माणसांच्या लोकवस्तीत आपला उद्योग अधिक सुरक्षित राहील म्हणून खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये उद्योग वाढला आणि तो फोफावला.
परप्रांतीय लोकांनासुद्धा मराठी माणसांच्या सान्निध्यात येथे नोकरी करणे सोपे जाऊ लागले. अधिकारी असो अथवा नोकरदार खासगी कंपन्यांमध्येही परप्रांतीय घुसू लागले. विशेषतः दाक्षिणात्य ‘इडू गुंडूं’चे नोकऱ्यांमध्ये मोठे आक्रमण होऊ लागले. हे उपरे मराठी माणसांच्या हक्कांवर गदा आणू लागले. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या. तिथे परप्रांतीय अधिकारी आपल्या गाववाल्यांना ‘चिकटवू’ लागले. परप्रांतीयांची ही दादागिरी बाळासाहेबांना सहन झाली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेची स्थापना केली.
मराठी माणूस होरपळलेला होता. परप्रांतीयांनी त्याच्या हक्कावर गदा आणल्यामुळे तो अगोदरच हताश; पण चिडलेला होता. त्यामुळे परप्रांतीयांची जिथे दादागिरी असेल, तिथे रस्त्यावर उतरण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतली. त्यामुळे अन्यायग्रस्त मराठी लोकांना मुंबईत शिवसेना हाच एकमेव आधार वाटू लागला. त्यातूनच शिवसेना प्रत्येक मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली. मराठी माणसांचे हित जपणे, मुंबईत मराठी माणसाचाच डंका वाजला पाहिजे यासाठी शिवसेना नेहमीच आक्रमक राहिली.
भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्वप्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबरी मशीद प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी पळ काढला. पण, शिवसेनाप्रमुखांनी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता ती जबाबदारी स्वतःकडे घेतली. हिंदुत्ववादी विचारसरणीचा अंगीकार केल्यामुळे शिवसेनेची लोकप्रियता आणखी वाढू लागली. शिवसेनेच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजप शिवसेनेच्या आडोशाला आली. शिवसेनेच्या आडोशाला राहूनच प्रगती करू लागली. शिवसेनेने जर भाजपला हात दिला नसता, तर महाराष्ट्रातच काय; पण देशातसुद्धा भाजप आज दिसतेय तितकी वाढलेली दिसली नसती.
नगरसेवक असो अथवा खासदार… प्रत्येक निवडणुकीत भाजपला शिवसेनेचाच आधार हवा असायचा. शिवसेनेशिवाय त्यांचे पान हलत नसायचे. शिवसेनेचा वापर करायचा आणि शिवसेनेला संपवायचे इतकी हलकट वृत्ती तेव्हाच्या भाजप नेत्यांमध्ये जरी नसली तरी शिवसेनेचा वापर करून आपण वाढायचे हे तेव्हापासून सुरू होते. बाळासाहेबांचेच रक्त श्री. उद्धव ठाकरे आणि श्री. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आहे. २० वर्षांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला आणखी वाढवले.
जिथे कुठे मराठी माणसांच्या भावनांना ठेच पोचेल तिथे शिवसेना आक्रमक भूमिका घेतेच. अशा शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे कौतुक करतात. त्यांचा सत्कार करतात. शोभा डे यांनी वडापावबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर शिवसैनिकांनी काळे फासले होते. उद्धवसाहेबांनी या शिवसैनिकांचे जाहीर कौतुक केले होते. सुधींद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकात पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावर शिवसैनिकांनी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाच उधळून लावला होता.
शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. सामान्य जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे. शिवसेनेवर जीव लावणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर मराठी माणूस संतापलेला दिसत आहे. आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात, असे नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी टीकात्मक बोलत असतात. त्यांचा आम्ही वेळोवेळी निषेध केलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे केले, ते कुणालाही आवडले नाही. त्यांना काही गोष्टी पटत नव्हत्या; तर त्यांनी सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरे यांना भेटायला हवे होते. उद्धव ठाकरे साहेबानंतर एकनाथ शिंदे हेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. त्यांना इथे राहूनसुद्धा मुख्यमंत्रिपद मिळविता आले असते.
हे सुद्धा वाचा
Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक
‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक
सध्या अंधेरी येथील पोटनिवडणूक सुरू आहे. ऋतुजा लटके या शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदेंचा गट शिवसैनिकांविषयी पूतनामावशीचे प्रेम व्यक्त करीत असतो. मग शिंदे गटाने लटके यांना पाठिंबा द्यायला नको का? एका मराठी महिलेच्या विरोधात भाजपने गुजराती व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्या ठिकाणी बहुतांश मराठी मतदार आहेत, त्या ठिकाणी परप्रांतीयांना कशी काय उमेदवारी दिली जाऊ शकते? यावरून भाजपचा मराठीद्वेष दिसून येतो.
एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. जे शिवसेनेसोबत प्रामाणिक राहिले नाहीत, ते एकमेकांसोबतसुद्धा प्रामाणिक राहणार नाहीत. एकनाथ शिंदे हे डमी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची खरी सूत्रे ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय असेल हे आपण समजू शकतो. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेसाहेब, आदित्य ठाकरेसाहेब यांना मराठी माणसांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे येता काळ हा शिवसेनेच्या उत्कर्षाचाच असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे या नावांना मराठी मनामध्ये जे आदराचे स्थान आहे, त्याला शिंदेंसारख्यांच्या बंडामुळे काहीही फरक पडणार नाही. उलट आगामी निवडणुकांमध्ये शिंदेंसह भाजपचे पानिपत होईल आणि शिवसेना जोमाने उभी राहील.
(लेखिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ता आणि विधान परिषदेतील आमदार आहेत.)
‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)