26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकीयराजीनामे देणारे आमदार-खासदार जरांगेंचे ऐकणार का?

राजीनामे देणारे आमदार-खासदार जरांगेंचे ऐकणार का?

कायमस्वरूपी आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. एकीकडे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे काही लोक आरक्षणासाठी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता लोकप्रतिनिधींचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. काल (२९ ऑक्टोबर) हिंगोलीचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला तर आज गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार आणि काँग्रेसचे पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी राजीनामा दिला आहे. लोकप्रतिनिधींचे राजीनामे सुरू असतानाच मनोज जरांगे-पाटील यांनी या आमदार-खासदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

आज बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देताना पक्षनेतृत्वाशी चर्चा केली होती का, याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेले नाही.

तर काल मराठवाड्यातील खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. ते हिंगोलीचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांनी काल लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे मराठीतून राजीनामापत्र पाठवले आहे. पवार आणि पाटील यांचे राजीनामे अजून स्वीकारले नाहीत. दरम्यान, भोरमधील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनीही २५ गावांतील मराठा समाजाच्या साखळी उपोषणात सहभागी मनोज जरांगे-पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

कॉंग्रेसचे पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरक्षणाच्या विविध प्रश्नांची तड लागण्यासाठी आमदारांनी विधानसभेत आपला आवाज बुलंद करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीमुळे महायुती सरकार जेरीस आले आहे. जरांगे-पाटील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत आणि ते कुणालाही बधत नाहीत. शिवाय मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यामुळे त्याची झळ आमदार-खासदारांना बसत आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. दीड महिन्यापासून आंदोलन सुरू असताना त्यावेळी राजीनामा देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे आले नव्हते. आता जरांगे-पाटील यांनी प्रकरण लावून धरल्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गंगेत घोडे धुवून घेण्यासाठी आता राजकीय नेते सरसावले आहेत आणि ते खुलेआम जरांगे-पाटील यांंना पाठिंबा देत आरक्षणाची मागणी करत आहे.

भाजपचे लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. यात महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर मराठा समाजाच्या भावना तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे लिहिले आहे.

हे ही वाचा

मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

जरांगे-पाटील म्हणाले, मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…

मराठा आरक्षण झाले सोपे, १५ हजार कागदपत्रांमुळे आशा पल्लवीत…

दरम्यान, आता राजीनामे देऊन मराठा समाजाचा विधिमंडळातील संख्या कमी करू नका, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे. राजीनामा देण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला वेठीस धरा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे. तसे केल्यास समाज तुमच्या ऋणात राहिल, असेही जरांगे-पाटील म्हणालेत.

आमदार प्रकाश सोळंकी यांचे घर जाळले

बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकी यांचे घर आणि गाड्या जाळण्याचा प्रकार आज घडला आहे. आक्रमक मराठा आंदोलकांनी त्याचे माजलगावमधील घर आणि घराखालील गाड्या जाळल्या आहेत. मात्र, या जाळपोळीत कुटुंबातील कोणीही जखमी झाले नाही, असे आमदार सोळंकी यांनी सांगितले आहे. पण आगीमुळे मालमत्तेचे बरेच नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी