माजी खासदार असलेले किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात सभापतींकडे सादर केला. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला काही राजकारणी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. महामंडळांवर विविध पदांचा प्रलोभने दाखवून, ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.
सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे, या विषयी तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. तसेच या पेनड्राइव्हचे अवलोकलन करून कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. माझी एक व्हिडीओ क्लिप एका मराठी वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आली. मी अनेक महिलांचा छळ केल्याचा दावा केला आहे आणि अशा अनेक व्हिडीओ क्लिप उपलब्ध असून माझ्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. मी कधीही कोणत्याही महिलेचा अत्याचार केला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी यांची चौकशी करावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
हे सुद्धा वाचा:
मंत्री अभ्यास न करता सभागृहात कसे येतात, विरोधकांसह भाजपचे आशीष शेलार देखील संतप्त
नियतीचा खेळ! जीपला भरधाव कंटेनरची धडक, शाळकरी मुलांच्या मृत्यूनं काळीज पिळवटलं…
मेल ट्रेनचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडून मुंबईला येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा उशिराने
देवेंद्र फडणवीस विधिमंडळात बोलताना म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल चौकशी केली जाईल. आम्ही त्याबद्दल काही लपवणार नाही. तुमच्याकडे काही माहिती असल्यास कृपया ती आम्हाला द्या. आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही महिलेची ओळख उघड करू शकत नाही मात्र पोलीस आवश्यक कार्यवाही करेल. विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावत ते म्हणाले की, अनिल परब आणि अंबादास दानवे यांच्या भावना आम्हाला माहीत आहेत. राजकारणात लोकांना अनेकवेळा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.