मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त झाला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर प्रचंड टीका झाली. सर्वोच्च न्यायालय देखील या घटनेने व्यतित झाले या घटनेची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावर भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. त्यानंतर ‘सत्तेच्या मस्तीमुळे सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत होते’, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मैतेई आणि कुकी जमातींमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून हा संघर्ष तेथे सुरु आहे. मात्र राज्य सरकार हा हिंसाचार आटोक्यात आणण्यात निष्फळ ठरले आहे. अमित शाह यांनी देखील मणिपूरचा दौरा केला मात्र त्यानंतर देखील हा संघर्ष अजूनही सुरु आहे. दरम्यान नुकताच मणिपूरमध्ये कुकी जमातीच्या दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास हा व्हिडीओ आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेत राज्य सरकारला कारवाईचा इशारा दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतर भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी एक व्टिट करत ”सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा… कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश सुरळीत चालेल.” असा निशाणा साधला.
सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा…
कशाला हव्यात निवडणुका आणि संसद?
खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल. pic.twitter.com/HpE6lfqtMg— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 21, 2023
हे सुद्धा वाचा
शाळाबाह्य नऊ हजार मुलांना शाळेत आणले – शिक्षणमंत्री
मणिपूर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेसचा सभात्याग
त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार भातखळकर यांचा समाचार घेतला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत कोर्टालाच सुनावणारे ट्वीट केले आहे. सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी राज्यपाल व सरन्यायाधीशांना अवगत करु असे नाना पटोले म्हणाले.