महाराष्ट्रासारख्या राज्यात ड्रग्जची निर्मिती होऊ लागली आहे. तस्करीही केली जात आहे. असे असताना याला आता वेगळ्या स्वरूपात राजकीय रंग चढू लागला आहे. केवळ मुंबई, पुणे नाही तर आता नाशिक, अमरावती सारख्या ठिकाणी ड्रग्जचे आकर्षण वाढू लागले आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी आपण मुलांना शिक्षण देतो, मात्र आता शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे देशाच्या आणि पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. यावर आता कॉँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या ड्रग्ज रॅकेट सुरू आहे. हे महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यासाठी धोकादायक बाब आहे. यावर आता नाना पटोले यांनी सरकारला टार्गेट केले आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारणे गरजेची आहे तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवा. महाराष्ट्राचा उडता पंजाब करु नका असे आवाहन करत राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्ज तस्करी अशक्य आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा
ड्रग्ज माफिया भूषण पाटीलला यूपीमधून अटक, ठाकरे गटाकडून दादा भुसेंवर आरोप
ड्रग्ज माफिया भूषण पाटीलला यूपीमधून अटक, ठाकरे गटाकडून दादा भुसेंवर आरोप
अमरावतीमध्ये प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून फरार करण्यात कोणी मदत केली हे समोर येत आहे. ललित पाटील कसा गायब झाला? त्याला सोडवण्याचा कोण प्रयत्न करत आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, योग्य वेळ आल्यावर आम्ही जाहीर करू परंतु तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोणीही पाठिशी घालू नये. असले प्रकार होऊ नयेत ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. नाशिकमधील ड्रग प्रकरण काही कालचे नाही ते पूर्वीपासूनचे आहे, त्याला कोणा कोणाचा पाठिंबा आहे हे आता बाहेर येत आहे.
आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत.
काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करी करणारा ललित पाटील हा ससून रुग्णालयातून वॉर्ड क्रमांक 16 मधून फरार झाला आहे. या घटनेला काही दिवस झाले असले तरीही पुणे पोलिसांना अद्यापही फरारी ललित पाटील सापडला नाही. या घटनेत आता शिंदे गटाच्या नेत्यांचा हात असल्याचं बोलले जात आहे. तर पुढे माध्यमांनी व्हायब्रंट गुजरातबद्दल प्रश्न केला असता. पटोले म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहोत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेला लुटले होते पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकारमधले लोक गुजरातचे हस्तक आहेत हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे, असा टोला पटोले यांनी लगावला.