29 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरराजकीयपंकजा मुंडे यांना आता शरद पवारांचा आधार!

पंकजा मुंडे यांना आता शरद पवारांचा आधार!

अजित पवार यांच्या बंडानंतर बीड जिल्ह्यातील परळीचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही शरद पवार यांची साथ सोडली. या बदल्यात त्यांना राज्याचे कृषिमंत्री करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड करून एकटे पडलेल्या धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी मदत केली. पण रविवारी बीड येथील उत्तरदायीत्व सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी, ‘बीड जिल्ह्याने शरद पवार साहेबांवर फार प्रेम केलं, मात्र त्याबद्दल साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे.’ असा सवाल करून शरद पवार यांच्याशी थेट पंगा घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात पवार हे मुंडे यांना पर्याय शोधत असून भाजपात असूनही विजनवास भोगत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना शरद पवार यांचा आधार मिळण्याची दाट शक्यता आहे. दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. या अकरा दिवसांच्या दौऱ्यात त्या राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शन करणार आहे. यातून त्या शक्ती प्रदर्शन करणार असून त्यांच्या शिडात शरद पवार गटाकडून हवा भरण्याची तयारी सुरू झाली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्याशी द्रोह केल्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष आहे. ते नात्याने बहीण भाऊ असूनही गेली अनेक वर्ष रक्षाबंधन करत नव्हते. त्यामुळेच की काय राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी त्यांना बहीण मानत दरवर्षी त्यांच्याकडून राखी बांधून घेतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे भाऊ परळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे होते. पण धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केल्याने दोघांमध्ये वैर वाढतच गेले. पंकजा मुंडे या आगामी काळात राजकीय स्पर्धक होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पंख कापायला घेतले. परळीत धनंजय मुंडे चांगल्या मतांनी विजयी झाले. पण त्यांना विजयी करण्यासाठी भाजपचे जिल्ह्यातील नेतृत्व पुढे होते, अशीही चर्चा कार्यकर्त्यात होती.

फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महिला व बालकल्याणमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यासह विविध आरोप झाले होते. दुसरीकडे विधान परिषदेवर त्यांना घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे भाजपने टाळले. राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे राहू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी धनंजय मुंडे यांना बळ पुरवले. त्यामुळे पंकजा मुंडे गेल्या अनेक महिन्यापासून नाराज होत्या. पक्षाच्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसत. भागवत कराड यांना केंद्रात मंत्री करून भाजपने पंकजा मुंडे यांना कात्रजचा घाट दाखवला होता. या सगळ्या घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांची अवस्था हातपाय बांधून मुककयाचा मार देण्यासारखी झाली आहे. त्यामुळेच की काय सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे ब्रेकवर गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या.

दरम्यान आता दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. या अकरा दिवसांच्या दौऱ्यात त्या राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शन करणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. पण पक्षाला आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी ठरवून ही यात्रा काढलेली आहे.
हे सुद्धा वाचा
बाजारपेठेत चांद्रयान आकाराच्या राख्या; किंमत पाहून व्हाल थक्क !
यंदा देशात राखीच्या विक्रीत होणार एवढी मोठी उलाढाल!
रितेशच्या स्वप्नात लग्नानंतरही जिनिलिया… पाहा गमतीशीर व्हिडिओ

 

या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर,पुणे, सातारा., कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आता थेट शरद पवार यांच्याशी पंगा घेतल्याने पंकज मुंडे यांना बळ पुरवण्याची कूटनीती राष्ट्रवादी शरद पवार गट वापरण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे जरी राष्ट्रवादीचे मंत्री असले तरी ते सध्या सत्तेत असल्याने भाजपा त्यांना लगेच वाऱ्यावर काही सोडणार नाही. अशावेळी धनंजय मुंडे यांच्याशी लढण्यासाठी पंकजा मुंडेना आता शरद पवारांचा आधार घ्यावा लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी