27 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरराजकीयराजकारणात अस्पृश्यता पाळली जाते - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही काँग्रेसवर हल्ला

राजकारणात अस्पृश्यता पाळली जाते – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही काँग्रेसवर हल्ला

भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत #INDIAAlliance ची निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या आघाडीत सामील करून घेण्याच्या निमंत्रणावरून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. ‘आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजप-आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.’ अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.

नुकतीच मुंबईत #INDIAAlliance ची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांना या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र सातत्याने भाजप-आरएसएस विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि राज्यातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र मात्र या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते.

यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘निमंत्रण पाठवायला #INDIAAlliance ची बैठक काय सत्यनारायणाची पूजा नाहीये.’असे उत्तर दिले होते. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये ‘#IndiaAlliance मध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात?’ असा थेट सवाल काँग्रेसला विचारला आहे. तसेच ‘लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे.’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याचे समजते.

इंडिया आघाडी येत्या काळात भाजपला पर्याय ठरणार असे बोलले जात आहे.असे असतानाच,  या आघाडीत अजून अनेक उणीवा आहेत, ही बाब  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निदर्शनास आणली आहे. ‘India vs भारत’ वादावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले असून ‘संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले’ असल्याची टीका त्यांनी केली होती.

‘INDIA आघाडीत रणनीतीचा अभाव तसेच कल्पकता आणि ज्ञानाची दिवाळखोरी आहे हे मतदारांना दाखवणे हाच आरएसएसचा अजेंडा आहे. भाजप-आरएसएसला हेच हवे आहे आणि इथेच INDIA हरला आहे, कारण हा भाजप-आरएसएसचाच अजेंडा आहे,’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी  ट्विटद्वारे  केली होती.
हे सुद्धा वाचा
प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली; उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून ऐकल्या व्यथा
देशाचे नाव बदलल्याने परिस्थिती बदलणार का?
बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात

राष्ट्रपती यांनी पाठवलेल्या निमंत्रणावरून देशाच्या नावसंदर्भात नावाचं वाद सुरू झाल्याचे दिसून येते. निमंत्रणावर देशाचं नाव India ऐवजी भारत लिहिल्याने #IndiaAliance च्या नेत्यांनी विविध विधाने करून हे सर्व त्यांच्या आघाडीला घाबरून केले जात असल्याची टीका केली होती. या वादावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक भाष्य केले आहे. ट्विटमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात की, ‘संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले आहे,’ असेही आंबेडकर म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी