बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनाला कधी जातो असे भाऊरायला झाले असताना राज्यातील एक बहीण-भाऊ आहेत, ज्यांच्या रक्षा बंधनाची चर्चा आताच सुरू झाली आहे. हे बहीण-भाऊ आहेत राष्ट्रवादीचे आमदार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे. मध्यंतरी या भावा-बहिणीचे बिनसले होते, पण रक्ताची नाती राजकारणापलीकडची असतात असे म्हणतात त्याचा प्रत्यय हे दोघेही देत असतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांमधून विस्तव जात नव्हता असे बोलले जायचे. पण आपला भाऊ राज्याचा कृषिमंत्री झाल्यावर पंकजा मुंडे यांनी भावाचे औक्षण केले. आणि भाई तो भाई होता है.. याचा प्रत्यय आणून दिला.
गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर कालांतराने न पटल्याने धनंजय मुंडे यांनी काकाची साथ सोडली. पण काकाची साथ सोडल्यावर त्यांना राजकारणात येण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर बीडच्या राजकारणाला नवे वळण लागले. आणि डीएम उर्फ धनंजय मुंडे नावाचा नवा तारा बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात उदयास आला. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय खटके उडू लागले. पण सण आणि घरगुती कार्यक्रमानिमित्त ते भेटतात आणि राजकारण विसरून हे दोघेही रक्ताची नाती निभावतात.
काही वर्षापूर्वी या बहीण भावाचे बिनसले होते, तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी राखी बांधली. तेव्हापासून जानकर त्यांना बहीण मानत दरवर्षी त्यांच्याकडून राखी बांधून घेतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण परळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे होते. पण धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केल्याने दोघांमध्ये फारसे सख्य नव्हते.
पंकजा मुंडे या आगामी काळात राजकीय स्पर्धक होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पंख कापायला घेतले. परळीत धनंजय मुंडे चांगल्या मतांनी विजयी झाले. यानंतर फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महिला व बालकल्याणमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यासह विविध आरोप झाले होते. दुसरीकडे विधान परिषदेवर त्यांना घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे भाजपने टाळले. त्यामुळे पंकजा मुंडे गेल्या अनेक महिन्यापासून नाराज होत्या. पक्षाच्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसत.
हे सुद्धा वाचा
रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची महिलांसाठी भेट; गॅस सिलिंडरच्या दरात घट
जयंत पाटील यांनी सरकारची केली कानउघाडणी!
यंदा देशात राखीच्या विक्रीत होणार एवढी मोठी उलाढाल!
भागवत कराड यांना केंद्रात मंत्री करून भाजपने पंकजा मुंडे यांना कात्रजचा घाट दाखवला होता. या सगळ्या घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांची अवस्था हातपाय बांधून बुककयाचा मार देण्यासारखी झाली आहे. त्यामुळेच की काय सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे ब्रेकवर गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आता थेट शरद पवार यांच्याशी पंगा घेतल्याने पंकज मुंडे यांना बळ पुरवण्याची नीती राष्ट्रवादी शरद पवार गट वापरण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे जरी राष्ट्रवादीचे मंत्री असले तरी ते सध्या सत्तेत असल्याने भाजपा त्यांना लगेच वाऱ्यावर काही सोडणार नाही. अशावेळी धनंजय मुंडे यांच्याशी लढण्यासाठी पंकजा मुंडेना आता शरद पवारांचा आधार घ्यावा लागणार आहे.
पंकजा मुंडे भाजपात पुनः सक्रिय होणार की राष्ट्रवादी पक्ष त्यांना भारी पडणार, याचीच चर्चा बीडमध्ये आहे. राज्यातील राजकारणातील चढउतार पाहून पंकजा मुंडे आगामी काळात आपले नशीब अजमावतील, असे बोलले जाते. उद्या रक्षाबंधन आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने हे बहीण भाऊ पुन्हा एकत्र भेटतात का, हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.