29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयरविंद्र धंगेकरांसाठी 'कामाचा माणूस' ही ओळख त्यांच्या विजयासाठी मोठा फॅक्टर

रविंद्र धंगेकरांसाठी ‘कामाचा माणूस’ ही ओळख त्यांच्या विजयासाठी मोठा फॅक्टर

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने काँग्रेसमधून रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करताच या निवडणूकीची जोरदार चर्चा सुरु झाली होती. भाजपला सुरुवातीला ही निवडणूक सोपी जाईल असे वाटले मात्र अखेर धंगेकरांनी भाजपला घाम फोडत निवडणूक जिंकली. धंगेकर यांचे लोकांधील मिसळणे, अर्ध्यारात्री देखील लोकांच्या अडीअडचणींसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही त्यांच्या विजयातील सर्वात मोठी जमेची बाजू ठरली. (Ravindra Dhangekar’s victory big factor his recognition as a workaholic)

रविंद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना-मनसे आणि आता काँग्रेस असा झाला आहे. ते पुणे महापालिकेत पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. कसब्यात असलेला मोठा जनसंपर्क त्यांच्या विजयाच्या कामाला आला. भाजपचे हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार ०४० इतक्या मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी पराभव केला. सन २००९ साली त्यांचा येथे निसटता पराभव झाला होता. त्यावेळी धंगेकर यांनी मनसेतून भाजपच्या गिरीष बापटांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी अटीतटीच्या लढतीत अखेर बापट विजयी झाले होते.

आताच्या पोटनिवडणूकीत मात्र धंगेकर यांनी कसब्यातून भाजपची सत्ता खेचून आणली. कसब्यात त्यांची मदतीला धावणारा माणूस अशी ओळख कामाला आली. काँग्रेसने योग्य उमेदवाराला तिकीट दिल्याने महाविकास आघाडीला देखील बळ मिळाले. महत्त्वाचे म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची एकगठ्ठा मते देखील धंगेकरांना मिळाली. भाजपचा उमेदवार चुकल्याची चर्चा सुरुवातीपासून या मतदार संघात होती. टिळक घराण्यात उमेदवारी नाकारल्याने तसेच ब्राह्मण उमेदवार न दिल्याने कसब्यात भाजपविरोधात सुरुवातीला नाराजी होती. त्यानंतर भाजपने येथे जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे तळ ठोकून होते. मात्र तरी देखली धंगेकरांना मतदारांनी पसंती दिली.

धंगेकर यांची जनेतत असलेली कामाचा माणूस, मदतीला धावून येणारा माणूस अशी प्रतिमा या निवडणूकीत त्यांच्या कामाला आली. गणेश मंडळांनी देखील धंगेकर यांना या निवडणूकीत मदत केली. गेली अनेक वर्षे धंगेकर यांनी जनेतील नेता ही आपली प्रतिमा जपली, त्यामुळे त्यांना ही निवडणूक यश देऊन गेली. त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी असल्याने त्यांची तिन्ही पक्षांची मते देखील धंगेकर यांना मिळालीच पण कसब्यात बंडखोरी देखील टाळण्यात महाविकास आघाडीचे यश म्हणावे लागेल. शिवसेनेतील फुटीनंतर शिवसैनिकांनी देखील झोकून देवून धंगेकर यांच्यासाठी मतदान केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांनी येथे प्रचार केला. भाजपच्या आक्रमक प्रचाराला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत भाजपला येथे लक्ष घालून देखील विजय मिळवता आला नाही.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी; शिंदे गटाकडून ठाकरेंच्या राजीनाम्यावरच वेधले लक्ष

2023 पासूनच MPSC परीक्षा नवीन पॅटर्ननुसार : राज्य लोकसेवा आयोगाचे ट्विट आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील उत्तरात विसंगती!

अजितदादा, निवडणूक आयोग नाही, MPSC बोललो बरं का – मुख्यमंत्री

धंगेकर यांची प्रतिमा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याचे म्हणावे लागेल. धंगेकर यांच्या रुपाने महाविकास आघाडीला कसब्यात भाजपला टक्कर देऊ शकेल असा चेहरा मिळाला. केवळ प्रचार, जाहिरातबाजी, धनशक्ती, आश्वासने, आमिष असे फंडे निवडणूकांमध्ये सर्रास वापरून मतदारांना आकर्षित केले जाते. मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये असलेला चेहरा, लोकांसाठी पुर्णवेळ झटणारा नेता ही ओळख या सगळ्यापुढे धंगेकरांना घेऊन गेली. मतदारांनी धंगेकर यांच्यावर या निवडणूकीत विश्वास दाखवत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. त्यामुळे मोठी प्रचार यंत्रणा, भरमसाठ जाहिराती, आश्वासनांची खैरात याहून लोकांना आपलासा वाटणारा चेहरा, लोकांसाठी कधीही उपलब्ध असणारा चेहरा मतदारांनी या निवडणूकीत निवडून दिल्याचे म्हणावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी