30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयसंविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर, रोहित पवारांचा तरुणांना सल्ला

संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर, रोहित पवारांचा तरुणांना सल्ला

टीम लय भारी

कर्जत – जामखेड : शिवसेनेच्या आमदारांनी बहुसंख्येने एकत्र येत बंड पुकारला आणि महाविकास आघाडीच्या सरकारला काही कळायच्या आतच नेस्तनाबूत केले आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला ढाल बनवत राज्यात नवे सरकार स्थापन केले. या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली, तर कुणी जोरदार टिका – टिप्पणी केली तर कोणी संविधान, लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत सरळ नव्या सरकारवर आरोप केला. दरम्यान राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी सुद्धा या संपुर्ण घडामोडींकडे लक्ष वेधून घेत आताच्या घडीला लोकशाही विरोधी शक्तींचा पराभव करण्यासाठी युवा वर्गाचा सक्रीय सहभाग हवा असे म्हणून त्यांनी तरुणांना आवाहन केले आहे.

राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यासाठी रोहित पवार यांनी काही मुद्दे मांडले परंतु त्यांचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असल्याचे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे म्हणणे स्पष्टपणे मांडले आहेत. रोहित पवार ट्विटमध्ये लिहितात, “वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते, याचा प्रत्यय काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या पाहून आला. उलट अनेकदा लोकहिताची कामं करताना ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं, पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली जातेच असं नाही”, असे म्हणून त्यांनी माध्यमांवर टीका केली.

 

पुढे पवार लिहितात, “मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही”, असे म्हणून त्यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

“आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रीय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळ हा युवांचा असेल, असं म्हणालो.अनियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहे. अशा परीस्थितीत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवावर्गाच्या सक्रीय सहभागाशिवाय लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही”, असे म्हटल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा…

‘उलटी काळी बाहुली, टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू’, विद्या चव्हाणांनी सुचवले शिंदेगटाला चिन्ह

नव्या सरकारच्या राज्यात चाललंय तरी काय…? 24 दिवसांत तब्बल 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

देशात ‘मंकीपाॅक्स’चा धोका वाढला, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!