29 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरराजकीयAndheri East Bypoll Election : विजय ऋतुजा लटकेंचा मात्र चर्चा नोटाला मिळालेल्या...

Andheri East Bypoll Election : विजय ऋतुजा लटकेंचा मात्र चर्चा नोटाला मिळालेल्या मतांची

अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक नुकतीच पार पडली आणि रविवारी या निवडणुकीचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत विजय झाला. ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत हा विजय निश्चित होता, परंतु या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मिळालेल्या मतांची सर्वाधिक चर्चा झाली.

अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक नुकतीच पार पडली आणि रविवारी या निवडणुकीचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत विजय झाला. ऋतुजा लटके यांचा या निवडणुकीत हा विजय निश्चित होता, परंतु या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मिळालेल्या मतांची सर्वाधिक चर्चा झाली. ऋतुजा लटके यांना या निवडणुकीत 66 हजार 530 मते तर नोटाला दुसऱ्या क्रमांकाची 12 हजार 806 इतकी मते मिळाली. एकंदरीतच काय तर या मतदारसंघातील तब्बल 12 हजार मतदारांना पोट निवडणुकीतील एकही उमेदवार प्रभावी वाटला नाही. ऋतूजा लटके यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. यावेळी नोटाला मिळालेली मते ही भाजपची मते होती. आधी उमेदवार दिलेले नंतर जवळपास सुद्धा फिरकले नाहीत असे उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलण्यात आले.

अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक ही जाहीर झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली. कारण जेव्हा उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा लटकेंच्या राजीनाम्याचा विषय हा इतका महत्वाचा मुद्दा ठरला की हे प्रकरण थेट कोर्टात गेले. कोर्टाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी भाजपकडून 2019 चे अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतल्याने आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केल्यानंतर मुरजी पटेल यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंग झाले आणि भाजप पक्षश्रेष्टींच्या आदेशावरून त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला.

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा तर झाला परंतु इतर सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक घेण्यात आली. असे असले तरी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या त्या पत्नी असल्याने त्यांचा या निवडणुकीतील विजय हा निश्चितच होता. पोटनिवडणुकीत 86 हजार 570 मतदारांनी म्हणजे केवळ 31.74 टक्के मतदारांनी मतदान केलं. उलट 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाख 47 हजार 117 मतदारांनी म्हणजे 53.55 टक्के मतदान केलं होतं आणि रमेश लटके यांना त्यापैकी 62 हजार 773 मतं मिळाली होती. म्हणजे तब्बल 60 हजार इतकं कमी मतदान होऊनही ऋतुजा लटके यांनी रमेश लटके यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवली. ऋतुजा लटके यांना 66 हजार 530 मतं मिळाली. याचा अर्थ रमेश लटकेंपेक्षा त्यांनी 3 हजार 757 अधिक मतं मिळवली.

परंतु तरी देखील आता वाढलेले नोटाचे मतदान याला नेमके जबाबदार कोण ? मतदार कि राजकीय पक्ष असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेत सर्वाधिक टक्का हा मराठी मतदारांचा आहे. त्यानंतर गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा या मतदार संघात प्रभाव दिसून येतो. जर का या निवडणुकीत मुरजी पटेल उभे असते तर कदाचित ही निवडणूक आणखी रंगतदार झाली असती. परंतु असे न झाल्याने ऋतुजा लटके या विजयी झाल्या असल्या तरी त्यांच्यापेक्षा अधिक आता नोटाला मिळालेल्या मतांची चर्चा अधिक होताना दिसतेय.

हे सुद्धा वाचा

Andheri East Bypoll Election : निवडणुकीत विजयी होताच ऋतुजा लटकेंचा भाजपला टोला

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रंगला ऋतुजा लटके विरुद्ध ‘नोटा’चा सामना

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटकेंना सहा उमेदवारांचे आव्हान; गुरुवारी होणार मतदान

परंतु या सर्वात एक गोष्ट मात्र नक्की की भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मतदार जागरूक होत चालल्याने त्यांना उमेदवार प्रभावी वाटले नाही तर ते थेट नोटाला देखील आपले बहुमूल्य मत देऊ शकतील. एकेकाळी अंधेरी पूर्व विधानसभेतील कोणत्याच राजकीय पक्षाकडे न वळणारी काँग्रेसची मते या निवडणुकीत ठाकरे गटाच्या पारड्यात पडलेली आहेत. असे असताना आता मात्र अप्रत्यक्षपणे का असेना पण मनसे समोर महापालिकेत मोठे आव्हान उभे राहणार आहे, हे मात्र नक्की. कारण महाविकास आघाडी हे सूत्र आता तुटक तुटक का असेना पण जुळून आल्याने आगामी निवडणुकांमध्ये या तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून निवडणूक लढवली तर यांचा विजय जवळपास निश्चित होईल. तर मनसेने ‘एकला चलो रे’ चा नारा दिला तर हे त्यांना अवघड होऊन बसेल. ज्यामुळे मनसेला भाजप किंवा शिंदे गट यांच्याशी हातमिळवणी करूनच निवडणुकीत उतरावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी