30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकीयइडा पिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे ...! (माजी मंत्री...

इडा पिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे …! (माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा विशेष लेख)

'लय भारी'च्या दिवाळी विशेषांकामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद इतिहासामध्ये नाही. रयतेचा राजा ही उपाधी शेतकऱ्यांनी त्यांना बहाल केली. अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे अनेक निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले. शेतकऱ्यांचे खळे लुटणाऱ्यांचा बंदोबस्त शिवरायांनी केला. दुष्काळाच्या काळामध्ये गुराढोरांना चारापाणी, शेतकऱ्यांना अन्नधान्य, बी-बियाणे यासाठी मदत केली. म्हणूनच रयत शिवरायांच्या बाजूने प्राणपणाने लढली. त्यांच्यानंतरचा जो कालखंड सुरू झाला, तो लुटालुटीचाच आहे. प्रत्येक जण स्वतःला राजा म्हणून घोषित करू लागला. रयतेला लुटणे हा एक त्या काळामध्ये व्यवसाय झाला.

राजेशाहीचा काळ ओसरू लागल्यानंतर ब्रिटिश काळाला सुरुवात झाली. ब्रिटिश काळातला शेतकरी हा शेतकरी नव्हताच; तर तो शेतमजूर होता. कसत असलेल्या शेतीच्या खरेदी-विक्रीचा त्याला अधिकारच नव्हता. शेतकऱ्यांच्या पाचवीलाच संकटं पुजलेली आहेत; मग दुष्काळ असेल, रोगराई असेल. या सगळ्या संकटांच्या सावलीत शेतकरी आणि त्यांच्या पिकाची वारंवार मातीच होत होती. या इंग्रजी राजवटीच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीबद्दल अनेक शेतकऱ्यांनी उठाव केले.
खान्देशामध्ये तंट्या भिल्लाचे बंड, वडगावच्या सखाराम बापूचे बंड, वासुदेव बळवंत फडके यांनी केलेले बंड, साताऱ्याच्या सरहद्दीवरती उमाजी नाईक यांनी केलेले बंड, यातून ब्रिटिश राजवटीच्या शोषण नीतीविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे उठाव झालेले पाहायला मिळतात आणि या उठाव करणाऱ्यांना अमानुष अशा शिक्षादेखील ठोठावल्याचे दिसते.
सन १८६८ मध्ये शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली गेली. त्यामुळे बाजारामध्ये धान्याचे दर कोसळले. शेतकऱ्यांच्या जमिनी सावकार हडप करू लागले. १८७३-७४ ला दख्खनच्या शेतकऱ्यांनी एक उठाव केला. त्यावेळी त्यांनी सावकारांच्या घरांवर हल्ले केले; अनेक कागदपत्रांची होळी केली. याच काळात लोकमान्य टिळकांनीही ‘केसरी’मधून शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध हल्ले केले. तुकडामधील खोत-कुळवाडी संघर्षामध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. हळूहळू स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व टिळकांकडून महात्मा गांधींकडे आले. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह अशी शस्त्रे शोधून ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये अनेक लढे उभे केले. बिहारमधल्या निळीच्या शेतकऱ्यांचा उठाव झाला आणि लढा उभा राहिला. तो त्यापैकी एक आहे.

शेतीची आणि शेतकऱ्यांची दुरवस्था पाहूनच महात्मा गांधींनी १९२० साली ‘खेड्याकडे चला’ ही घोषणा केली. बारडोली येथे साराबंदीचा उठाव केला. पुढे १९२६ ते १९३२ या काळामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक शेतकरी परिषदा घेतल्या. १९२६ ला पुणे येथे त्यांनी शेतकऱ्यांची परिषद घेतली. २५ व २६ जुलै १९२८ रोजी त्यांनी मुंबई इलाख्यात शेतकऱ्यांची परिषद भरवली.
Sadabhau Khot's article in Lay Bhari Diwali issue
३ जानेवारी १९३२ ला तेरडा येथे त्यांनी शेतकऱ्यांची परिषद घेतली आणि या प्रत्येक परिषदेतून शेतकरी संघटन हे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लढे होत असताना कोल्हापूर, सांगली, सातारासुद्धा या लढ्यामध्ये पाठीमागे नव्हता. भाई माधवराव बागल हे परिषदेच्या माध्यमातून मोठे कार्य करीत होते. तांदळवाडी, शिरगाव, अंकली अशा ठिकठिकाणी त्यांनी जनजागृतीसाठी सभा घेतल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे बंड उभे राहिले. २५ डिसेंबर १९३८ ला बागल यांनी कोल्हापूरला शेतकऱ्यांचा एक विराट मोर्चा काढलेला दिसतो.

याचवेळी साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील लढत होते. त्यांचे खंडकरी शेतकऱ्यांचे लढे फार गाजले. तुळशीदास जाधव, शंकरराव जेधे, दत्ता देशमुख, विठ्ठलराव विखे-पाटील ही सगळी मंडळी नानासाहेबांबरोबर त्या वेळेला काम करीत होती. सत्यशोधक चळवळीनेसुद्धा समाजामध्ये मोठी कामगिरी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे कार्य केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी विभागांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले. पंजाबराव देशमुख यांनी ‘भारतीय कृषक समाजा’ची स्थापना करून मोठे काम केले. डॉ. लोहिया यांनी भारतीय भू-सेना या नावाची संघटना काढली आणि भूमी बचाव आंदोलन यशस्वी केले. १९५१ मध्ये तेलंगणा येथे भूमिहीन शेतकरी व जमीनदारांमध्ये हत्याकांड झाले. त्याच वेळी विनोबाजी भावे यांनी तेलंगणामध्ये ‘भूदान’ चळवळीला प्रारंभ केला. ८० लाख एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना मिळवून दिली. ऑगस्ट १९४८ ला शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली आणि शेतकरी कामगार पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी हिताची काही आंदोलने केलेली पाहायला मिळतात.

१७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत `चलो नागपूर` ही ७०० किलोमीटरची दिंडी प्रा. एन. डी. पाटील व गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघाली आणि तिला मोठ्या प्रमाणामध्ये यशही मिळाले. दिल्ली येथे चरण सिंग यांनी ऐतिहासिक किसान संमेलन घेतले. त्यानंतर १९८० ला शरद जोशी नावाचे वादळ शेती क्रांतीमध्ये उतरले. शरद जोशींनी सोयाबीन परिषद, कापूस परिषद, धान परिषद, तंबाखू परिषद व ऊस परिषद अशा परिषदांतून सगळ्या पट्ट्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यांनी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन केली. त्यामध्ये निपाणीच्या एका आंदोलनामध्ये १२ शेतकरी शहीद झाले. शरद जोशींनी खऱ्या अर्थाने शेतकरी चळवळीला एक चेहरा दिला. एका बाजूला बौद्धिक मांडणी आणि दुसऱ्या बाजूला लाखो सामान्य शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाची भूमी नांगरली. शरद जोशींच्या मुशीत तयार झालेले अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आजही आपल्याला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना दिसत आहेत.
हे सुद्धा वाचा
Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !
Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

त्यानंतरच्या काळामध्ये राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, पाशा पटेल, रविकांत तुपकर अशा अनेक शेतकरी नेत्यांचा उदय झाला. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जागृतीने शेतकरी संघटनेला बळकटी मिळाली. त्या माध्यमातून त्यांनी ठिकठिकाणी ऊस असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल अशा अनेक परिषदा घेऊन शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृतीचे काम केले. आज खरे तर आंदोलनाचे एक प्रमुख हत्यार म्हणून सगळ्याच पक्षांनी शेतकरी हा अजेंड्यावर घेतलेला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या सगळ्याच पक्षांना शेतकरी ही आंदोलनासाठी चांगली कसदार भूमी वाटू लागली. त्या अनुषंगाने खरे तर वेगवेगळ्या पक्षांनीसुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याचे आपल्याला दिसते. अलीकडच्या काळामध्ये शेतकरी चळवळीचा आणि शेतकऱ्यांचा त्यांच्या सर्व पक्षांनी आपापल्या सोईनुसार वापर करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. राजकारणाच्या माध्यमातून प्रश्न सोडवता येऊ शकतात, हे जरी खरे असले तरी शेतकऱ्यांची व्होट बँक अशी तयार होऊ शकली नाही. राजकारणाच्या पटलावरती जातींना महत्त्व आले अन् मातीला मात्र तिलांजली दिली गेली. त्यामुळे कोणताही पक्ष जरी सत्तेवर आला तरी लुटीची व्यवस्था मात्र जशीच्या तशीच राहिली.

‘भीकवादाच्या’ योजना सत्तेवर आलेल्या पक्षांनी राबवल्या; परंतु शेतमालाच्या भावाचा प्रश्न हा अडगळीतच ठेवला. शेतमालाला भाव मिळू नये, अशी धोरणे सगळ्याच पक्षांनी आजपर्यंत राबवली आहेत. कधी निर्यातबंदी, आवकबंदी, बाजारात भाव पाडण्याचे कटकारस्थान हे सरकारच्या माध्यमातून सातत्याने होत राहिले. अन् त्यामुळे शेतकरी आत्महत्या करू लागला. शेतकऱ्यांचा सगळा इतिहास जर पाहिला, तर शेतकऱ्यांच्या बाजूने पुराण काळामध्ये बळीराजा उभा राहिला म्हणूनच गावगड्यातील आमची माय माऊली घर धन्याला ओवाळताना म्हणत असते, “इडा पिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे……!!!”

(लेखक महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, विधान परिषदेचे माजी सदस्य असून, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)

Video : असा रंगला ‘लय भारी’चा उद्घाटन सोहळा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!