33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयपक्ष गेले, चिन्ह गेले..! आता शिवसेना भवनासाठी होणार 'सामना'? सविस्तर वाचा

पक्ष गेले, चिन्ह गेले..! आता शिवसेना भवनासाठी होणार ‘सामना’? सविस्तर वाचा

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन, स्थानिक पक्ष कार्यालये अर्थात शाखा आणि पक्ष निधी यावर आता शिंदे गटातील नेते आपला दावा सांगतील, अशी भीती ठाकरे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केल्याने शिवसेना भवन आणि शाखांवरील नियंत्रणावरून ठाकरे आणि शिंदे गटात हिंसक संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवसेना भवन मुख्यालय हे ‘शिवाई ट्रस्ट’ ची इमारत असल्याने मुख्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिंदे गट पुन्हा एकदा कोर्टात उतरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत दादरमधील शिवसेना भवन कोणाकडे, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. (Shiv Sena Bhavan)

शिवसेना भवन ही इमारत ही शिवसेना पक्षाच्या नावावर नाही. शिवसेना भवनची इमारत ही शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. यामुळे शिवसेना भवनची इमारत ही अधिकृतपणे पक्षाच्या मालकीची नाही. यामुळे शिवसेना भवनवर शिंदे गट दावा करू शकणार नाही, अशी माहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या विशाखा राऊत यांनी दिली.

याप्रमाणेच ‘सामना’ हे पक्षाचे मुखपत्र प्रबोधन प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केले जाते. यामुळे त्याचाही पक्षाशी थेट संबंध नाही. मात्र शिवसेनेच्या विविध शाखा घेण्यावरून वादावादी होऊ शकते. काही ठिकाणी शिवसेनेच्या शाखा वेगवेगळ्या नावांवर आहेत. मात्र कोणाच्या नावावर नसलेल्या शाखांच्या इमारतींवर शिंदे गट दावा करेल. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कोकणात शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे व ठाकरे गटात संघर्ष झाला. असाच संघर्ष राज्याच्या विविध भागांमध्ये होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेना भवन ताब्यात घेणे ही काही मोगलाई आहे का? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

या अनुषंगाने कायदेतज्ज्ञ आणि माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या माहितीनुसार, जर सेना भवन ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केले गेले, तर ट्रस्टचे संचालन करणाऱ्या कायद्यानुसार हा वाद मिटविला जाईल. ‘पक्षाच्या कार्यालयांची मालकी काही महत्त्वाची नसली तरी त्यांचे भावनिक आणि राजकीय मूल्य हे फार महत्वाचे आहे,’ असे ते पुढे म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयानंतर, उद्धव ठाकरेंच्या छावणीतील नेत्यांना भीती आहे की, शिंदे गट शिवसेना भवन, स्थानिक पक्ष कार्यालये अर्थात शाखा आणि पक्ष निधी यावर आता आपला दावा सांगतील. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “जर ते आमचे चिन्ह चोरू शकतात, तर ते काहीही करू शकतात. परंतु आम्हाला हे अमान्य आहे. मतदान पॅनेलच्या हालचालीला विरोधी पक्षाचे एक षडयंत्र उभे आहे.

यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील नेत्यांनीही आपले मत मांडले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला सेना भवन ताब्यात घेण्यात रस नाही. “परंतु आम्हाला कायदेशीररित्या त्या सर्व गोष्टी हव्या आहेत,” असे त्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले. शिंदे गटाच्या एका नेत्याने सांगितले की, “ठाकरे गटाच्या मुख्य चिंतेपैकी एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी वापरला जाणारा पक्ष निधी. ते सावध आहेत की आम्ही ते देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तांत्रिकदृष्ट्या, ते आमच्यापर्यंत येऊ शकते. पण अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Mumbai, India - February 17, 2023: Sena Bhavan wears a deserted look after the Election Commission of India (ECI) gives the verdict in favour of Eknath Shinde faction, at Dadar, in Mumbai, India, on Friday, February 17, 2023. (Photo by Satish Bate/Hindustan Times) (Satish Bate/HT PHOTO)

दरम्यान शिवसेना पक्षावरून चालू असणाऱ्या या प्रकरणानंतर सद्यपरिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचे दंगे अथवा वाद घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सेना भवनाभोवती चोख बंदोबस्त वाढवला.

हे सुद्धा वाचा : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

एकनाथ शिंदेंनी ओळखले ‘जबाबदारीचे भान’

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा; निवडणूक आयोगाने ‘हे’ मुद्दे घेतले विचारात

ठाकरे गटाला ‘शिवसेना’ नाव वापरता येईल?
काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर संघटनात्मक काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस अशा विविध पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेसचा उल्लेख करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव शिवसेना’ किंवा अशा पद्धतीने आधी कोणते तरी नाव वापरून अखेरीस शिवसेना नाव वापरता येऊ शकेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका पार पडेपर्यंतच वापरता येईल. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडे असलेले ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव गोठविण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला अशा आशयाचे नाव वापरता येणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी