27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयशिवसेनेची काँग्रेससोबत होती 18 वर्षे घट्ट मैत्री, पण बाळासाहेबांनी ‘या’ कारणास्तव तोडले...

शिवसेनेची काँग्रेससोबत होती 18 वर्षे घट्ट मैत्री, पण बाळासाहेबांनी ‘या’ कारणास्तव तोडले संबंध

शिवसेना हा हिंदूत्ववादी पक्ष आहे. शिवसेनेची भाजपसोबत नैसर्गिक मैत्री आहे. 30 पेक्षा जास्त वर्षे शिवसेना – भाजप यांचे मैत्रीसंबंध राहिलेले आहेत, अशी प्रतिमा अनेकांच्या मनावर ठसलेली आहे ( Shivsena and BJP had 30 years friendship ).

वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात सत्तेत एकत्र आले. भाजपसोबत असलेल्या जुन्या मैत्रीचे संबंध तुटल्याच्या भावना त्यावेळी व्यक्त झाल्या. नव्याने काँग्रेस व शिवसेना यांचे वैचारिक सूत कसे जुळणार अशीही मते व्यक्त करण्यात आली.

वास्तवात, शिवसेनेचे जन्मापासूनच काँग्रेससोबत मैत्रीसंबंध होते. इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीला तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीररित्या पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या समर्थनार्थ मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता. ‘इंदिराजींना मजबूर करू नका’ असे त्या अग्रलेखाचे शिर्षक होते ( Shivsena supremo Balasaheb Thackeray was openly supported to Indira Gandhi in emergency period).

आणीबाणीच्या विरोधात जवळपास सगळ्या राजकीय, सामाजिक, कामगार संघटना मैदानात उतरल्या होत्या. तरीही शिवसेनेने इंदिरा गांधी यांना जाहीररित्या पाठींबा दिला होता. शिवसेनेच्या या भूमिकेवर आजही टीका केली जाते. शिवसेनेचे काँग्रेससोबत मैत्रीसंबंध होते. त्यातूनच शिवसेनेने ही भूमिका घेतली होती. शिवसेनेने सन 1982 पर्यंत बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेसशी मैत्री केली होती.

Shivsena - Congress friendship
बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसशी संबंध तोडल्यानंतर दोनच वर्षांत इंदिरा गांधी यांची हत्या झाली

सन 1974 मध्ये मुंबईत लोकसभेची पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसकडून रामराव आदिक, जनसंघाकडून, म्हणजे आताच्या भाजपकडून वसंतकुमार पंडित व कम्युनिस्ट पक्षाकडून रोझा देशपांडे हे उमेदवार रिंगणात उतरलेले होते. महागाईचा मुद्दा त्यावेळी ऐरणीवर होता. त्यामुळे काँग्रेसविरोधात वातावरण होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला पाठींबा देणार नाहीत, असे त्यावेळी सर्वांना वाटले होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी जाहिररित्या काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांना पाठींबा दिला. शिवसेनेमधील अनेकांना ही भूमिका पटली नाही. लालबागमधील मातब्बर शिवसैनिक बंडू शिंगरे यांनी त्यावेळी उघडपणे जनसंघाच्या उमेदवाराला पाठींबा दिला ( Balasaheb Thackeray supported to Congress in 1974 Loksabha by election ).

शिवसेनेमध्ये पक्ष शिस्त महत्वाची मानली जाते. शिवसेनाप्रमुख म्हणतील तीच पूर्वदिशा असे शिवसेनेमध्ये समीकरण होते. परंतु बंडू शिंगरे यांनी सेनाप्रमुखांच्या आदेशालाच हारताळ फासल्याने शिंगरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या रोझा देशपांडे यांचा विजय झाला. काँग्रेस व जनसंघाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला.

सन 1976 – 77 या कालावधीसाठी मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी जनता पक्षाकडून सोहनसिंग कोहली व काँग्रेसकडून मुरली देवरा महापौरपदाच्या रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेसह सगळ्या विरोधी पक्षांनी कोहली यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला.

मतदान करताना काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी मतदान करावे असे आदेश सेनाप्रमुखांनी दिले. त्यावेळी शिवसेना महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचा उमेदवार निवडून आला ( Balasaheb Thackeray supported to Congress in 1976 for Mumbai Mayor election ).

सन 1980 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. याच निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुलोद’ उतरला होता. ‘पुलोद’ अंतर्गत ‘समाजवादी काँग्रेस,’ भारतीय जनता पक्ष, समादवादी जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष एकत्रित आले होते.

हे सुद्धा वाचा

गोपीनाथ मुंडे यांचे दोन विश्वासू ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये सर्वोच्च पदावर

‘’किरीट सोमय्या पाणचट माणूस’’; रवींद्र वायकर संतापले

PM Modi : पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘निवडणुका जिंकण्याचे रहस्य आणि मुख्यमंत्री कोण होणार’

‘पुलोद’च्या विरोधात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘इंदिरा काँग्रेस’ हा पक्ष निवडणुकीत उतरला होता. शिवसेनेने जाहीररित्या ‘इंदिरा काँग्रेसला’ पाठींबा दिला. त्यावेळी शिवसेनेने एकही उमेदवार रिंगणात उतरवला नाही, आणि इंदिरा काँग्रेसचा मात्र जोरदार प्रचार केला ( Shivsena supported to Congress in 1980 Vidhansabha Election ).

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी ‘इंदिरा काँग्रेसला पर्याय नाही’ या शिर्षकाखाली ‘मार्मिक’मध्ये अग्रलेख लिहिला होता, अन् इंदिरा काँग्रेसचे जोरदार समर्थन केले होते ( Balasaheb Thackeray written editorial ).

त्यावेळी ‘इंदिरा काँग्रेस’ला दणदणीत विजय झाला. तब्बल 186 जागा मिळाल्या ‘इंदिरा काँग्रेस’ला मिळाल्या. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले ( A. R. Antule became Chief Minister after Congress’ huge victory in Vidhansabha election 1980 ). शिवसेनेने केलेल्या मदतीची जाण ठेवून ‘इंदिरा काँग्रेस’ने शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन जागा दिल्या. या दोन्ही जागांवर वामनराव महाडीक व प्रमोद नवलकर यांना संधी मिळाली ( Congress was given 2 seats to Shivsena in Vidhanparishad at 1980 ).

Shivsena Congress friendship
बाळासाहेब ठाकरे व तत्कालिन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले एकाच व्यासपीठावर

इंदिरा गांधी यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास ठेवला. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींचे समर्थन केले. विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत समझौता केला. पण अशी एक वेळ आली की, ज्यामुळे शिवसेनाप्रमुख संतापले.

शिवछत्रपतींना वंदन करून काँग्रेससोबतची दोस्ती तोडत आहे : बाळासाहेब ठाकरेंनी केली होती घोषणा

सन 1982 मध्ये ऐतिहासिक असा गिरणी कामगारांचा संप झाला. डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा संप झाला होता ( Historical mill workers strike in 1982 ). कामगारांच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासारख्या नव्हत्या. परिणामी या बेमुदत संपामुळे महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली. कामगार पूर्णतः देशोधडीला लागला. गिरण्या बंद पडल्या. कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. बंद पडलेल्या गिरण्यांमुळे मालक मंडळींचे फारसे बिघडले नाही. काही वर्षानंतर गिरण्यांच्या जमिनीला सोन्याचे भाव आले. मालकांचे भले झाले, पण कामगार पुरता उद्ध्वस्त झाला. त्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांनाही भोगावा लागला.

तत्पुर्वी गिरणी कामगारांचे प्रश्न सुटावेत यासाठी शिवसेनेनेही जोरदार आंदोलने केली होती. 1981 मध्ये झालेल्या एक दिवसीय संपात शिवसेनेनेही भाग घेतला होता.

Shivsena Congress friendship
तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेची स्थापना करायला लावली होती असे म्हटले जाते

पण डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 1982 साली ‘त्या’ ऐतिहासिक बेमुदत संपाची हाक देण्यात आली. हा संप कामगारांना उद्धवस्त करेल अशी धारणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

सिमेंट घोटाळ्यामुळे त्यावेळी ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते ( A. R. Antule was resigned due to Cement scam ). बाबासाहेब भोसले नुकतेच मुख्यमंत्रीपदावर आले होते. संप मिटावा यासाठी शिवसेनाप्रमुखांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला. एप्रिल 1982 मध्ये बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यात एक बैठक झाली. हा संप लवकर संपवा नाहीतर मी काँग्रेससोबतचे मैत्रीचे संबंध तोडून टाकेन, अशी तंबी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यासाठी 1 मे ही मुदत दिली.

मुख्यमंत्री भोसले यांना संपावर तोडगा काढण्यात यश आले नाही. परळच्या कामगार मैदानात बाळासाहेब ठाकरे यांची 9 सप्टेंबर 1982 रोजी जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे यांनी काँग्रेससोबतची मैत्री तोडत असल्याची घोषणा केली.

त्या भाषणात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘ आता बरोबर 8 वाजून 10 मिनिटे झाली आहेत. कुणा ज्योतिषाला कुंडली मांडायची असेल तर मांडा. 8.10 वाजता आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी या दिवशी शिवछत्रपतींना वंदन करून शिवसेना इंदिरा काँग्रेसशी दोस्ती तोडत आहे, असे मी जाहीर करीत आहे.’ ( Shivsena broke friendship with Congress in 1982 ). त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मध्ये काँग्रेससोबत तोडलेल्या मैत्रीच्या समर्थनार्थ भाष्य केले.

शिवसेनेने ‘इंदिरा काँग्रेस’सोबत 1982 मध्ये मैत्रीचे संबंध तोडले. त्यानंतर दोनच वर्षांत 31 ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे शिवसेनेसोबतचे तुटलेले काँग्रेसचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले नाहीत.

शिवसेना – भाजप युतीचा उदय

सन 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे राजीव गांधी यांच्या हातात काँग्रेसची सगळी सूत्रे आली ( Rajiv Gandhi taken charge of Congress after India Gandhi’s assassination ).

सूत्रे हातात येताच राजीव गांधी यांनी मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. डिसेंबर 1984 मध्ये निवडणुका पार पडल्या.

या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढविली. मुंबईतील चार जागा भाजपने व दोन जागा शिवसेनेने लढविण्याचा निर्णय झाला. उर्वरीत महाराष्ट्रात शिवसेनेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. भाजपचे जिथे उमेदवार असतील, तिथे शिवसेनेने त्यांचा प्रचार केला.

अटलबिहारी वाजपेयी व बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत झाल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेसच्या मागे लोकांची सहानुभूती होती. ही सहानुभूती इतकी मोठी होती की, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला देशात तब्बल 404 जागा मिळाल्या. महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा काँग्रेसला मिळाल्या. शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसला 2, जनता पक्षाला 1, शेकापला 1 व अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या. शिवसेना व भाजपला भोपळाही फोडता आला नाही. एवढेच नव्हे तर, भाजपला संबंध देशभरातून अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या.

आंध्र प्रदेशमधील ‘तेलगू देसम पार्टी’ने मात्र कमालच केली. त्यावेळी तब्बल 30 खासदार त्यांनी निवडून आणले होते. सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून तेलगू देसम पक्ष उदयाला आला होता.

प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी, सुप्रिया सुळे यांनाही पाठींबा

सन 1984 नंतर शिवसेना व भाजप युतीचा उदय झाला. पण त्यानंतरही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अपवादात्मक पण मोक्याच्या ठिकाणी भाजपला डावलून काँग्रेसला उघड पाठिंबा दिला होता.

सन 2007 मध्ये प्रतिभा पाटील व सन 2012 मध्ये प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने पाठींबा दिला होता. सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभा खासदार निवडणुकीतही शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता ( Shivsena was supported to Pratibha Patil, Pranav Mukharji and Supriya Sule ).

Shivsena Congress relation
बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती पदाच्या निवडुकीत पाठींबा दिला होता

तब्बल 37 वर्षानंतर पुन्हा काँग्रेसशी मैत्री

सन 1982 मध्ये शिवसेनेचे काँग्रेससोबत मैत्री संबंध तुटले होते. ते पुन्हा प्रस्थापित व्हायला तब्बल 37 वर्षे लागली. गेल्या वर्षी, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आले. 1982 पर्यंत इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेना व काँग्रेसमध्ये मैत्रीसंबंध होते. 2019 मध्ये मात्र उद्धव ठाकरे व सोनिया गांधी यांच्यामुळे शिवसेना – काँग्रेसचे मैत्रीसंबंध पुन्हा निर्माण झाले. हे मैत्रीसंबंध निर्माण करण्यामध्ये शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, अशोक चव्हाण अशा नेत्यांचाही मोठा वाटा आहे.

शिवसेना व भाजप यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे, असे अनेक हिंदुत्ववादी म्हणतात. परंतु शिवसेना व इंदिरा काँग्रेस यांच्यात जन्मतःच मैत्रीसंबंध होते. हे जुने मैत्रीसंबंध अनेकांना ठाऊक नाहीत. शिवसेना – काँग्रेसचे नव्याने सुरू झालेले मैत्रीसंबंध हा जुन्याच नात्याला दिलेला उजाळा आहे, असेही म्हणता येईल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!