29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजपने आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले, आता ज्योतिर्लिंगही...

भाजपने आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले, आता ज्योतिर्लिंगही…

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील लाखो कोटींचे उद्योग गुजरातमध्ये पळवल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. भाजपच्या गुजरात प्रेमावर विरोधकांनी सडकून टीका केली होती. मात्र, आता उद्योगांसोबत महाराष्ट्रातील देवस्थानेही पळवण्याचा उद्योग भाजप करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. (Supriya Sule criticize BJP on Bhima Shankar) देशात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. पुण्यातील भीमाशंकर हे त्या तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातूनन भाविक येत असतात. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे सहावे ज्योतिर्लिंग आहे. परंतु आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा हे महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग खरे नसून सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. त्यामुळे आता खरोखरच ‘हे महादेवा’ असे म्हणायची वेळ आली आहे.

आसाममध्ये भाजपशासित सरकार सत्तारूढ आहे. त्यामुळे आसाम सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींवरून आता राजकीय पक्षांमध्ये धर्मयुद्ध पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असं सरकारच्या या अजब दाव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला लक्ष्य केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….! राज्याचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. आसाम सरकारच्या या आगळिकीविरोधात आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

हा घ्या पुरावा
खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.”

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सावंत यांनी ट्विट करत याचा निषेध केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहेत. आता भाजपाच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकर येथील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.” भाजपचे आमदार राम कदम यांनी काँग्रेसला ‘दिशाभूल सम्राट’ म्हणत रिट्विट केले आहे. त्यावर सचिन सावंत यांनी कदम यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, “राम कदम जी, कधीतरी अभ्यास करून बोला! माझा प्रश्न भाजपाशासित आसाम सरकारच्या आजच्या जाहिरातीबद्दल आहे. ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ६वे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाममध्ये आहे. नावही बदलले आहे. याने आपले पित्त खवळले नाही,आश्चर्य वाटते. कदाचित नेहमीप्रमाणे विषय समजला नसेल.”

हे सुद्धा वाचा

रोहित पवार यांनी मानले विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे आभार !

Supriya Sule : ‘श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करा!’ सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule : आता गावागावात विचारतात ताई 50 खोक्यांचे काय झाले?, यावर मी म्हणते…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी