29 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरटेक्नॉलॉजीकौटुंबिक नात्यांची वीण सैल करणाऱ्या फेसबूकचे विसाव्या वर्षात पदार्पण!

कौटुंबिक नात्यांची वीण सैल करणाऱ्या फेसबूकचे विसाव्या वर्षात पदार्पण!

फेसबुकमुळे कौटुंबिक तणावाला बढावा मिळतोय. सायबर गुन्हेगारीही फोफावतेय. त्यामुळे फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचं व्यसन लागलेल्या तरुणाईला याची खबरदारी घेत, सोशल मिडियाच्या वापरावर मर्यादा घातली पाहिजे.

आज जगभरातल्या तरुण-तरुणींपासून लहानथोरांपर्यंत सर्वांनाच वेड लावणाऱ्या फेसबुकचा (facebook) आज 19 वा वाढदिवस आहे! मार्क झुकरबर्ग (Mark Zukerberg) ने वयाच्या 19व्या वर्षी निव्वळ एक गंमत म्हणून एक छोटेखानी सॉफ्टवेअर तयार केलं होतं. आपल्या कॉलेजमधली ‘सगळ्यात आकर्षक तरुण-तरुणी कोण’ हे मतदानाद्वारे शोधण्यासाठी त्यानं ‘फॅस मॅश’ (face mash) नावाची वेबसाईट तयार केली. फक्त 8 तासांत तयार झालेल्या त्याच्या या वेबसाईटनं काही तासातच धुमाकूळ घातला. पुढे जाऊन झुकरबर्गनं याच कल्पनेतून अनेक कॉलेजकुमारांना आणि कुमारीना एकत्र आण्याच्या स्वतःकडचे 1000 डॉलर्स घालून आणि एदुआर्दो सॅव्हेरिन या आपल्या व्यवसायाची जाण असलेल्या मित्राला सोबतीला घेऊन 4 फेब्रुवारी, 2004 रोजी फेसबुकची निर्मिती केली आणि हळूहळू या लहानशा कल्पनेचा वटवृक्ष झाला. (Facebook become 19 year old!)

या सोशल मीडियाचे (social media) अनेक फायदे झाले. आज या दोन्ही माध्यमांनी जगभरातल्या अनेक लोकांना एकत्र आणलं आहे. पूर्वी फेसबुक फक्त डेटिंगची वेबसाईट आहे असं मानलं जायचं. पण या वेबसाईटचा उपयोग लक्षात यायला लागला आणि फेसबुक विविध कामांसाठी उपयोगात येऊ लागला आहे. आपले फोटो/व्हीडिओज/गाणी शेअर करणं किंवा डॉक्युमेंटस् शेअर करणं अशाही गोष्टी आपण फेसबुकमुळे आता सहज करू शकतो. एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं म्हणून अनेक व्यावसायिक फेसबुकचा फायदा घेतात. अनेक कंपन्या किंवा लहान लहान व्यावसायिक, सामाजिक संस्था, इन्श्युरन्स कंपन्या आपल्या जाहिराती फेसबुकवर टाकतात. फेसबुकचा विक्रीवर अतिशय चांगला परिणाम होतो असं अनेकांचं मत आहे. नाटक किंवा सिनेमा यांच्याही जाहिराती ‘फेसबुक’वर आपल्याला बघायला मिळतात.

फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप (whatsapp) यांचा एक चांगला आणि वेगळा फायदा कोणता असेल, तर लोक स्वत:ला व्यक्त करायला शिकली आहेत. ही दोन्ही माध्यमं मोबाईलवरही घेता येतात. त्यामुळे आपल्या कविता असोत, लेख असोत किंवा आपलं एखादं मत असो ते या माध्यमांतून जगासमोर सहजपणे मांडणं शक्य व्हायला लागलं आहे. कित्येकांना प्रकाशक मिळणं, त्यांनी आपलं पुस्तक लवकर छापणं अशा गोष्टी शक्य होत नाहीत. अशांना आता व्यक्त व्हायला फेसबुक किंवा व्हॉटस्अ‍ॅप ही चांगली माध्यमं मिळाली आहेत. शिवाय एखाद्यानं आपल्या कवितेचं पुस्तक जरी छापलं तरी ते वाचणाऱ्यांची संख्या कमी असते. पण इथे मात्र एका झटक्यात अनेक लोकांना आपली कविता/लेख पाठवता येतात आणि तेही कमीत कमी खर्चात! या सगळ्यामुळेच कदाचित फेसबुक घराघरात पोहोचलं आहे.

मात्र फेसबुकचा दुरुपयोगही प्रचंड होतोय. आजची तरुणाई या दोन्ही माध्यमांत इतकी गुंतली आहे की, तिला खरं जग आणि आभासी जग याचं भानही उरलं नाहीये. सतत आपले फोटो फेसबुकला अपलोड करणं, त्याला लाईक किती मिळताहेत हे बघत राहणं, जास्त लाईक मिळाले नाहीत की निराश होणं, अनेकदा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी झाल्यामुळे नैराश्यात जाणं, वेळप्रसंगी आत्महत्याही करणं, फेसबुकवर मित्र-मैत्रिणींची संख्या जास्त होण्यासाठी अनोळखी लोकांशीही मैत्री करणं अशा सगळ्या विश्वातच आजची तरुणाई रमली आहे.

मुलगा असून मुलगी असल्याचं भासवून ‘फेक अकाऊंट’ तयार करणं, मुलींबरोबर मैत्री करणं, आधी मैत्री करून प्रेमाचं नाटक करून फसवणं, फेसबुकच्या मैत्रीचा फायदा घेऊन पैशांची मागणी करून फसवणं, एखादीने मैत्रीस नकार दिला की तिचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड करून तिची बदनामी करणं असे अनेक फसवाफसवीचे प्रकार आपल्याला सहज बघायला मिळताहेत. अनेक दहशतवादी संघटना द्वेष पसरवण्यासाठी ‘फेसबुक’चा वापर करतात हेही तितकच खरं आहे.

अनेकांची ‘फेसबुक फ्रेंड’ची यादीही बरीच मोठी असते. अनेकदा या यादीतली मंडळी एकमेकांना कधी भेटलेलीही नसतात. अनेकांचे हजारो फेसबुक फ्रेंड्ज असतात, पण अडीअडचणीच्या वेळी धावत येईल किंवा विश्वासानं ज्याच्या खांद्यावर अश्रू ढाळता येतील असा एकही मित्र किंवा मैत्रीण नसते. त्यामुळे लोक एकाकी पडायला लागले आहेत. अनेक जण नैराश्याच्या गर्तेतही गेले आहेत. ‘फेसबुक’वर ‘आपण किती खुश आहोत, यशस्वी आहोत’ हे दाखवणं आणि खऱ्या आयुष्यात मात्र नैराश्यात जगणं असं दुट्टपी आयुष्य अनेकजण आज जगताहेत.

हे सुद्धा वाचा : Facebook Bug : फेसबुकवर अचानक सर्वांचे फॉलोवर्स कमी झाल्याने एकच खळबळ!

तब्बल ७ तासांनी WhatsApp, Facebook, Instagram सेवा सुरु

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

अनेक जणांना फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचं व्यसन लागलं आहे. अशा तरुणांवर एक प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यापासून २ दिवस मोबाईल आणि लॅपटॉप लांब ठेवला गेला. एखाद्या दारूचं किंवा ड्रग्जचं व्यसन लागलेल्या माणसाला दारू किंवा ड्रगज दिले नाहीत, तर तो जसा अस्थिर होतो किंवा थरथर कापतो, तशीच या फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचं व्यसन लागलेल्यांची अवस्था झाली होती. शेवटी हा एक मनोविकार असून त्याचा फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर (FAD) या नावानं मनोविकारांच्या यादीत समावेश करण्याचा विचार झाला. या दोन्ही माध्यमांमुळे वाचनसंस्कृतीलाही प्रचंड फटका बसलाय. पुस्तकं घेऊन वाचण्यापेक्षा फेसबुक किंवा व्हॉटस् ॲपवरच्या लहान लहान पोस्ट्स वाचण्यात आणि ती फोरवर्ड करत बसण्यातच आजचे तरुण धन्यता मानतात.

हे सगळं भयंकर आहे. पण झुकरबर्गनं आपल्याला जी संपर्काची मध्यमं दिली आहेत, त्या माध्यामांचा आपण कसा उपयोग करायचा याचा विचार आपणच केला पाहिजे. आपण या माध्यमांना नियंत्रित करायचं की त्यांना आपल्याला नियंत्रित करू द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी