वर्क फ्रॉम होम नकोच, अशा स्पष्ट शब्दांत ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुण पिढीचे कान उपटले आहेत. घरून काम करण्यात पुरेसे गांभीर्य राहत नाही, शिवाय त्यामुळे लोकं आळशीही होतात, असे त्यांनी म्हटले आहे. (No Work From Home) विशेषत: कोविड काळात घरून काम करायला सोकावलेल्या आयटीतील तरुणांना मूर्ती यांनी मूनलायटिंगविरुद्धही इशारा दिला आहे. मूनलायटिंग म्हणजे एकाच वेळी दोन संस्थांसाठी कामे करणे.
परराष्ट्र मंत्रालयातर्फे दिल्लीत आयोजित आशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये नारायण मूर्ती बोलत होते. यावेळी त्यांनी तरुण कर्मचाऱ्यांना मूनलायटिंगच्या भानगडीत पडू नये, असे बजावले. यापुढे घरातून काम करू नका, असेही ते म्हणाले. मूर्ती यांनी तरुण कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम निवडण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, की घरातून काम म्हणजे आनंदीआनंदच! कुटुंब, पोरं-बाळं या सर्वात कामावर लक्ष केंद्रीत करणे कठीण असते. मनोरंजन आणि टिवल्या-बावल्या करत कामे होतात. त्याचा एकूणच कार्यक्षमता आणि उत्पादकतेवरही परिणाम होतो.
काय आहे ही मूनलायटिंगची भानगड?
अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश आणि मूनलायटिंग म्हणजे चंद्राच्या प्रकाशात किंवा अंधारात केले जाणारे काम! याला मूनलायटिंग का म्हणतात, तर अनेक लोकं पूर्वी दिवसा पूर्णवेळ काम करून संध्याकाळी-रात्री दुसरं एखादं पार्ट टाईम काम करायचे. आता साहजिकच दुसरे काम हे रात्री केले जात असल्याने त्याला मूनलायटिंग असा शब्दप्रयोग रूढ झाला. आजकाल, फ्री लान्सिंगमुळे तर दोन ठिकाणी कामे करणे किंवा दुसरे काम मिळणे फार सोपे झाले आहे. बदलत्या काळात अनेक लोकांच्या नोकरीच्या वेळाही शिफ्टनुसार बदलत असतात. त्यामुळे नियमित रात्रीची कॉलसेंटर किंवा इतर कोणतीही ड्युटी करणारा व्यक्ती सकाळी किंवा दुपारी दुसरे काम करतो. त्यांचे मुख्य काम रात्री आणि मूनलायटिंगचे काम दिवसा होते. तात्पर्य काय तर, आपले नियमित असे मुख्य काम सांभाळून केल्या जाणाऱ्या इतर दुसऱ्या कोणत्याही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ किंवा फ्रीलान्स कामाला मूनलायटिंग म्हटले जाते. अनेक जण सध्या स्वीग्गी, झोमाटो वैगेरे फूड डिलिव्हरी किंवा इतर जिओ, अमेझोन सारखे पार्सल अथवा ओला-उबर अशी अर्धवेळ कामे आपले नियमित काम सांभाळून करतात, तेही मूनलायटिंगच! वाढत्या महागाईच्या काळात घरखर्चाला हातभार, अतिरिक्त उत्पन्न म्हणून केल्या जाणाऱ्या काही मूनलायटिंग कामात खरे तर फसवणूक किंवा अनैतिक असे काही नसते. मात्र, गलेलठ्ठ पगार घेणारी आयटीतील तरुणाई जेव्हा असे काही करते, तेव्हा नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होणे साहजिकच आहे.
विशेष म्हणजे, नारायण मूर्ती यांनी वर्क फ्रॉम होम हे तरुणांना आळशी बनवत असल्याची चिंता व्यक्त केली. याशिवाय, मूनलायटिंग सारख्या प्रकारांमुळे संस्थेशी बांधिलकी, निष्ठा राहत नाही. त्यामुळे तरुण पिढीला नैतिकता जपण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘माझी उत्कट इच्छा आणि तरुणांना नम्र विनंती आहे, की कृपया मी मूनलायटिंग करीन, मी घरून काम करीन, मी आठवड्यातून फक्त तीन दिवस कार्यालयात येईन, या फंदात कृपया पडू नका.’’ इन्फोसिसने सुरुवातीपासूनच मूनलाइटिंग संस्कृतीला विरोध केला आहे आणि त्यापायी अनेक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे.

अलीकडेच काही आयटी कंपन्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे कमवायचे आहेत, त्यांच्यासाठी गोष्टी सुलभ करण्याचे उपाय जाहीर केले आहेत. त्यांना अनेक सोयी-सुविधा आणि सवलती देऊ केल्या आहेत. इन्फोसिस, विप्रो, आयबीएम वैगेरे बड्या आयटी कंपन्यांनी मात्र मूनलाइटिंगबाबत नापसंती दर्शविली आहे. तर, फ्रीलान्सिंग गिगचा भाग होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी फर्मची परवानगी घ्यावी, अशी इन्फोसिसची इच्छा आहे.
दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान नारायण मूर्ती म्हणाले की, भारताला प्रामाणिकपणाच्या संस्कृतीची गरज आहे, जिथे पक्षपात नसेल. याशिवाय, देशाला लवकर निर्णय घेण्याची आणि समृद्धीसाठी त्रासरहित व्यवहारांचीही आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले, “आपल्याला जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, कमी त्रास, व्यवहारात प्रामाणिकपणा, पक्षपात न करण्याची कार्यसंस्कृती निर्माण करण्याची गरज आहे.”

देशात प्रामाणिक, कठोर परिश्रम करणारे, चांगल्या कामाची नीतिमत्ता आणि शिस्त असणारे फारच थोडे लोक असल्याची खंतही नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली. 2006 मध्ये शांघाय येथे आलेला अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. शांघायच्या महापौरांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोणत्याही चिरीमिरीशिवाय अवघ्या एका दिवसात इन्फोसिसला 25 एकर जमीन वाटप केली होती. अशी प्रामाणिक आणि जलद कार्यसंस्कृती भारतात येणे आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून मूनलायटिंगसंदर्भात चर्चा होत आहे. याच मुद्द्यावरून इन्फोसिसने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना नोटीसही पाठवली होती. नारायण मूर्ती यांच्या कठोर भूमिकेने हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इन्फोसिसच्या नियमांनुसार मूनलायटिंगची परवानगी नाही. याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग कारवाई केली जाईल, याअंतर्गत नोकरीवरूनही काढले जाऊ शकते, असा इशारा इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना या ई-मेलमधून दिला आहे.
हे सुद्धा वाचा :
लवकरच महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’
Rishi Sunak: सुधा मूर्तीं म्हणाल्या काँग्रॅच्युलेशन्स ऋषी!
विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनीही काही दिवसांपूर्वी मूनलायटिंगला विरोध करणारी भूमिका जाहीर केली होती. हा प्रकार म्हणजे एक प्रकारची धोकेबाजी आणि शुद्ध फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले होते. एकाच वेळी कुणी दोन कामे कसे करू शकते, असा सवाळंही त्यांनी उपस्थित केला होता. आयबीएम या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीनेही मूनलायटिंग करणे पूर्णत: अनैतिक असल्याचे म्हटले होते.