30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूज“पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता ते शेतक-यांना गुलाम बनवायला निघालेत”

“पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता ते शेतक-यांना गुलाम बनवायला निघालेत”

टीम लय भारी

नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले असून, न्यायालयाकडून यासाठी चार सदस्यीय समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने नागपूर येथे राजभवनला घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

“आपले पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेले आहेत व ते आता शेतक-यांना गुलाम बनवायला निघाले आहेत. परंतु आपण त्यांचे गुलाम होणार नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याचा हक्क कायम ठेवणार आहोत व हे कायदे नष्ट करण्यास सरकारला भाग पाडणार आहोत.” असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटलं.

तसेच, “लोकसभेत, राज्यसभेत चर्चा न करता केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले. आज पंजाब, हरियाणासह सर्व ठिकाणचे शेतकरी या कायद्यांविरोधात का पेटले आहेत? ५२ दिवस आंदोलन करणं सोपं नाही. महिलांसह सर्व वयोगटातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार आहे. तुमच्या पिकांचा आधारभूत भाव नष्ट होणार आहे. धनदांडगे, हजारो कोटींचे मालक शेतक-यांचा माल स्वस्तात खरेदी करणार, त्याची साठवणूक करणार नंतर टंचाईची परिस्थिती निर्माण करून, तो माल शहरात जास्त भावात विकणार. अशाप्रकारे नफेखोरीसाठी हे सर्व चालेलं आहे, यासाठी त्यांना केंद्र सरकार आधार देत आहे. त्यामुळे हे कायदे रद्द झालेच पाहिजे, असा आपल्या सर्वांचा आग्रह आहे.” असं देखील थोरात यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“राज्य सरकार म्हणून आमची एक समिती गठीत झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. एक- दोन बैठका देखील झाल्या आहेत. आम्ही त्यावर अभ्यास करत आहोत. आमचा जो प्रस्ताव असेल, कायदा असेल तो शेतक-यांच्या बाजूचा असेल. आम्ही शेतक-यांसाठी अगोदर काम करतो व नंतर बोलतो.” असे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.a

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी