30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeटॉप न्यूजतोंड काळे झालेले वाचाळ चंद्रकांत पाटील यांची बेताल बडबड; म्हणे, आंबेडकर जयंती,...

तोंड काळे झालेले वाचाळ चंद्रकांत पाटील यांची बेताल बडबड; म्हणे, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्रात कार्यकर्ते भीक मागतात!

काही हेकेखोर माणसे आजिबात सुधारायला तयार नसतात. यातीलच एक म्हणजे भाजप नेते चंद्रकांत पाटील. तोंड काळे झालेले वाचाळ चंद्रकांत पाटील बेताल बडबडतच आहेत. आता म्हणे, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्रात कार्यकर्ते भीक मागतात! काय म्हणावे या माणसाला? पश्चातापाचा आजिबात लवलेश नाही. जनभावना इतक्या तीव्र, संतप्त होऊनही ते आपलेच म्हणणे पुढे दामटण्याचा हेका काही सोडत नाहीत. आधी महापुरुषांचा अवमान आणि आता कार्यकर्ते जयंती-उत्सवाला भीक मागण्याची बाष्कळ बडबड! यामुळे राज्यभरातील आंबेडकरी आणि गणेश मंडळ कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही यामुळे कोंडी झाली आहे. आधीच अकलेचे दिवाळे वाजलेल्या भाज्यपालांनी तोडलेल्या ताऱ्यांमुळे राज्यातील जनमानस संतप्त आहे, त्यात चंद्रकांत पाटील यांचे हेकेखोर, अढयताखोर उपद्व्याप सुरूच आहेत. यामुळे भाजपातही कमालीची नाराजी आहे. शिंदे गटातील आमदारांना मतदारसंघात तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे वृत्त न्यूज 18 लोकमत या वाहिनीने औरंगाबादमधून दिले आहे. पिंपरीत एका संतप्त आंबेडकरी कार्यकर्त्याने शाईफेक करून चंद्रकांत पाटील यांचे तोंड काळे केले होते. त्यानंतर याच न्यूज 18 लोकमत वाहिनीच्या पुण्यातील वार्ताहराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राज्यभरातून पत्रकारांनी त्याचा जोरदार निषेध करताच भानावर आलेल्या शिंदे सरकारने पोलिस ठाण्यात अडकवून ठेवलेल्या वार्ताहर गोविंद वाकडे यांना रात्री उशिरा सोडण्यात आले होते. महापुरुषांचा अवमान करूनही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून आपला हेका कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेतून 100 वर्षांपूर्वी आत्मनिर्भर होण्याचा स्वावलंबी मंत्र देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी अनुचित विधानाबद्दल रयत शिक्षण संस्थेनेही चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध केला आहे. तरीही पाटील आपला मुद्दा रेटून पुन्हा-पुन्हा जनभावना दुखावतच सुटले आहेत.

हे सुद्धा वाचा

26 दिवस चंद्राभोवती फेरफटका मारणारे ‘नासा’चे अंतराळयान पृथ्वीवर परतले

‘दृश्यम 2’ पूर्वी अजय दिवगणच्या ‘या’ सिनेमांनी केली 200 कोटींची कमाई, वाचा सविस्तर

तुमचे पॅन कर्ड लवकरच होणार निष्क्रिय; जाणून घ्या कारण

एकीकडे आपल्या मनात महापुरुषांबद्दल श्रद्धा आहे, आदर आहे म्हणायचे, आपल्या रक्ता-रक्तात फुले-आंबेडकर आहे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी लोकवर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांना म्हणायचे, की तुम्ही भीक जमा करता! काय चाललेय काय, चंद्रकांत पाटलांचे? आधी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अजरामर कार्याची त्यांनी भीक मागितली म्हणून हेटाळणी करायची. त्याचा पश्चात्ताप नाही, चुकीची जाणीव नाही, दिलगिरीत फुसकाट स्पष्टीकरणे देत आपलाच हेका रेटायचा. काय अर्थ आहे याचा? महापुरुषांनी भीक मागितली म्हणायची आणि नंतर त्यांच्या विचारांच्या उत्सवासाठी कार्यकर्ते करत असलेल्या प्रयत्नांची, लोकवर्गणीचीही भीक म्हणून कुत्सित अवहेलना करायची? चंद्रकांत पाटलांची खरेच या महापुरुषांवर श्रद्धा आहे का? त्यांना खरेच त्यांचा सन्मान वाटतो का, असा सवाल आता संतप्त आंबेडकरी आणि गणेश मंडळ कार्यकर्ते करू लागले आहेत.

“बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या.ते सगळे सरकारवर अवलंबून राहिले नाही. भीक म्हणजे काय? गणपती, आंबेडकर जयंतीला जाऊन जे मागतो तेच ना? आम्हाला जयंती साजरी करायची आहे, आम्हाला वर्गणी द्या.”

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या अवमनाबाबात आपल्या स्पष्टीकरणात पुन्हा आपल्याच हेक्याचे घोडे दामटले. ते म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या.ते सगळे सरकारवर अवलंबून राहिले नाही. भीक म्हणजे काय? गणपती, आंबेडकर जयंतीला जाऊन जे मागतो तेच ना? आम्हाला जयंती साजरी करायची आहे, आम्हाला वर्गणी द्या.” याउपर आणखी, “कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर… मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या अवमानाबाबत स्पष्टीकरण दिले. म्हणजे त्यांना अजूनही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्याचे वाटत नाही. असतील काय आहेच; संपूर्ण देशातील जनमानसांच्या भावना अतिशय दुखावल्या गेल्या आहेतच! त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी संघाच्या बौद्धिक हुशारीचे शाब्दिक खेळ न करता, महापुरुषांच्या अवमनाबाबत मनापासून पश्चात्ताप वाटत असल्यास प्रायश्चित्त घ्यावे, असे राज्यातील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

महापुरुषांचे विचार जागविणाऱ्या जयंती आणि इतर उत्सवाबाबत संघ, भाजपला पूर्वीपासूनच अनादर आहे. ते अशा उत्सवांची नेहमीच कुत्सित हेटाळणी करत आलेले आहेत. 5-7 वर्षांपूर्वीही शिवजयंतीसाठी संघ वर्गणी मागत नाही, असले विधान करण्यात आले होते. मग गुरुदक्षिणा आणि 200 रूपये काय आहे? तीही भीकच का? वार लावून जेवणे म्हणजे काय भीक मागून जेवणे का? दक्षिणा मागणे म्हणजे काय भीक मागणे का? मंदिरांसाठी निधी मागणे म्हणजे भीक का? चार लाख स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन मागितली तीही भीकच का? असे सवाल संतप्त आंबेडकरी आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. भाजप नेत्यांनी आता आपली भिकार भाषा आणि भिकारडे धंदे बंद करावेत, प्रतिष्ठेचा मुद्दा न करता शुद्ध अंतःकरणाने अन् स्वच्छ मनाने महाराष्ट्राची माफी मागावी, प्रायश्चित्त घ्यावे! महापुरुषांचा अवमान यापुढे महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही, अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी