29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटॉप न्यूजउत्साह, चैतन्याचा झरा : सौ. मनिषा संजय काळविंट

उत्साह, चैतन्याचा झरा : सौ. मनिषा संजय काळविंट

पराग शरदकुमार वेदक

निखिलची आई म्हणजे एक सालस, प्रेमळ, खानदानी व्यक्तिमत्व. सतेज, नितळ कांती आणि देखणा चेहरा. एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत प्रेमळ आईची किंवा मोठ्या बहिणीची व्यक्तिरेखा लिलया पेलतील अशा.

माहेरच्या नागपूरच्या कोकणस्थ पेंडसेंच्या घरच्या. गिरगावात काळविंटांच्या देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात आल्या, आणि दुधात साखर विरघळावी तशा विरघळून गेल्या. काळविंट पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे. आईंचे बाबा एअर फोर्स मध्ये होते. हेलिकॉप्टर मधून पॅराशूट पहिल्यांदा बाहेर टाकलं गेलं होतं. त्या टीममध्ये ते होते.

उत्साह, चैतन्याचा झरा : सौ. मनिषा संजय काळविंट

निखिलची आई म्हणजे मूर्तिमंत उत्साह, चैतन्याचा झराच. जितक्या प्रेमळ तितक्याच करारी, वेळेला कोकणस्थी खाक्या दाखवणाऱ्या. एकदा त्यांनी निखिल व सौरभला मारत मारतच शाळेतून घरी आणलं होतं. अर्थात ही दोन द्वाड काळविंटं सांभाळायची म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे, त्याला पाहिजे जातीचे…

निखिलचे आजोबा सी. एस. होते, आणि बाबा सी. ए. आहेत. एकदम कलंदर व्यक्तिमत्व. मनस्वी तेवढाच हळवा स्वभाव. तितकेसे सोशल नाहीत असं त्यांना स्वतःलाच वाटतं, पण एखाद्याच्या अडी अडचणीला धाऊन जाणारे शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. निखिलच्या आईने आजी आजोबांची खूप सेवा केली, ती सुद्धा अत्यंत आत्मियतेने.

मी गावाहून मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा काही दिवस शैलेशभाई रायचुरांच्या मालिनी ब्लॉक मधील घरात राहायचो. शैलेशभाई गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पवित्र आत्मा. एकदा त्यांच्या परवानगीने त्यांच्या पोटमाळ्यावर गेलो, तर एकदम प्रसन्न वातावरण होते. तिकडे महाराजांचा फोटो, काही पोथ्या, प्रवचन के. व्ही. बेलसरेंचं पुस्तक असं बरच काही होतं. समीर गाजरे दक्षिण मुंबईत अभाविपच पूर्णवेळ काम करायचा. त्याने मला कॉलेजला असताना हे पुस्तक वाचण्याचे सुचवले होते. नंतर जप करताना राम मंदिरातूनच स्वर्गारोहण करणाऱ्या बडेकाकांच्या स्मरणार्थ काकूंनी हे पुस्तक मला दिले. माझ्या आजारपणाच्या कठीण काळात या पुस्तकाने मला खूप सपोर्ट केला. निखिल, सौरभशी परिचय होऊन बरींच वर्षे झाली होती. पण त्याने मला कधी घरी जपाला बोलावलं नव्हतं. यावेळी पहिल्यांदाच त्याने जपाला बोलावलं. मी जपाला नाही पण संध्याकाळी दर्शनाला गेलो. घरी खूप प्रसन्न वतावरण होतं. भगर, दाण्याच्या कुटाची आमटी आणि साबुदाण्याच्या खिचडीचा अत्यंत रुचकर प्रसाद आम्ही ग्रहण केला. त्या वर्षीपासून दरवर्षी आम्ही सगळे जास्तीत जास्त वेळ जपाला जातो. यावर्षी किडनी ट्रान्सप्लान्टमुळे मला बाहेर काही खायचं नव्हतं. तशी कल्पना मी त्यांना आधीच दिली होती. तरीही महाप्रसाद ग्रहण न करताच आम्ही दोघं निघालो. तेव्हा त्यांचा चेहरा इवलासा झाला. माझाही तिथून पाय निघत नव्हता.

आगरकर काकूंकडे जप असतो तेव्हाही त्या सगळी मदत करतात. अगदी वेळेला भांडीही घासतात. त्याही पाठीच्या कण्याच्या  आजारातून ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्या पाठीच्या कण्याची सर्जरी झाली आहे. ही सर्जरी यशस्वी झाली नाही तर माणूस लोळागोळा होऊन बेड रीडन होतो. त्या कसोटीच्या काळात त्यांनी महाराजांची पोथी अपार श्रद्धेने त्यांच्या उशीखाली ठेवली. तीच पोथी माझ्या आजारपणात त्यांनी मला दिली. या पोथीने मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी दिली. त्यांच्या पाठीच्या कण्याची सर्जरी झाली असली तरी त्या ताठ कण्याच्या महिला आहेत. त्यांची सून नव्हे लाडकी लेक त्यांचं वर्णन ‘फॅमिलीचा बॅकबोन’ असा करते.

प्रतिभा हॉस्पिटलला असताना रोज किमान चार पास तरी तिच्या सोबत बसायच्या. जीवनगौरव पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी घरी पडल्या, तर या मुलांनीच त्यांना ऍडमिट केलं होतं. आता त्यांची मुलगी अमेरिकेहून येईपर्यंत निखिलच्या आईनेच त्यांची काळजी घेतली.

त्यांचं घर म्हणजे ध्वज पथकाच प्रतिकार्यालयच. ध्वजाचे पोल, शेले सगळच त्यांच्या घरात. पाडवा, नवरात्र, गणपती मुलांचा मोठा गोंधळ. पाडव्याला मुलींचे मेंदीचे कार्यक्रम, नट्टापट्टा सगळं यांच्याच घरी.

त्या ठामपणे पाठीशी होत्या म्हणून कुंजीका नोकरी करू शकली आणि चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत प्रवेश करू शकली. कुंजीका त्यांना आपली दुसरी आईच मानते. कुंजीका श्रावण क्वीन झाली तेव्हाही तिच्याबरोबर सगळीकडे जायच्या.

निखिलने राजकारणात जावं अस मला आणि खुद्द निखिललाही मनापासून वाटतं. पण त्यांचं मध्यमवर्गीय मन या गोष्टीला लगेच तयार होत नाही. त्या सगळ्यांचीच खूप काळजी घेतात. सौरभचं लग्न हाही त्यांच्या चिंतेचा विषय आहे. सूनमुख (नव्हे दुसऱ्या लेकीचं मुख) बघण्याचं भाग्य त्यांना लवकरात लवकरच लाभो आणि त्यांना आयुरोग्य लाभो हीच आदिशक्ती चरणी प्रार्थना.

उत्साह, चैतन्याचा झरा : सौ. मनिषा संजय काळविंट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी