32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeटॉप न्यूजPM Modi : पंतप्रधान मोदींनी सांगितले, 'निवडणुका जिंकण्याचे रहस्य आणि मुख्यमंत्री कोण...

PM Modi : पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘निवडणुका जिंकण्याचे रहस्य आणि मुख्यमंत्री कोण होणार’

टीम लय भारी

नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशवासियांचे आभार मानले. निवडणुकीत यश मिळाले यासाठी नाही तर लोकशाहीचा उत्सव साजरा केला याबद्दल मी आभार मानत असल्याचे मोदींनी सांगितले. मंगळवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वांच्या नजरा टीव्ही आणि ट्विटरवर होत्या. लोकशाहीबद्दल भारतीयांचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पहायला मिळत नाही. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे, असे मोदींनी सांगितले.

बिहारमधील विकासकामांचा हा विजय आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे बिहार निवडणुका जिंकण्याचे रहस्य आहे. बिहारमध्ये सत्य जिंकले. बिहारमध्ये विश्वास जिंकला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या विजयाचे विश्लेषण करताना सर्व मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बिहार विधानसभा निवडणूक तसेच विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीतील यशाबद्दल भाजपाकडून दिल्लीतील मुख्यालयात बुधवारी सायंकाळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.

बिहार आमच्यासाठी सर्वात खास आहे. जर तुम्ही मला बिहारमधील निकालाबद्दल विचारले तर माझे उत्तरही निकालाप्रमाणे साफ आहे. बिहारमधील यशाचे रहस्य सांगायचे झाले तर हा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय झाला आहे. बिहारमध्ये सत्य जिंकले आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे. तरुण, गरीब जिंकला आहे, शेतकरी जिंकला आहे. अपेक्षांचा विजय झाला आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

बिहारमध्ये यापूर्वी निवडणूक झाली की किती मतदारसंघ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतमोजणी होणार अशा बातम्या येत असत. पण आता मतदान किती वाढले अशा बातम्या येतात. एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झालेली नाही ही देशाची ताकद आहे. कोरोनाच्या संकटात ही निवडणूक करणे सोप्पे नव्हते. पण आपण जगाला भारताची ताकद दाखवली आहे, असे मोदींनी यावेळी म्हटले. मोदींनी भाजपाध्यक्ष नड्डा यांना विजयाचे श्रेय देत ‘जे. पी. नड्डाजी आगे बढो, हम आपके साथ है’ अशी घोषणाही दिली.

जो निकाल आला आहे त्याचा मोठा अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले होते त्याचा हा व्यापक विस्तार आहे. भाजप एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचा झेंडा संपूर्ण देशवासियांनी देशभर फडकावला आहे. कधी काळी आपण दोन जागांवर होतो. दोन खोल्यांमधून पक्ष चालवला जात होता. आज भारताच्या प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. प्रत्येकाच्या हृदयात आपण पोहोचलो आहोत. याचे उत्तर कालच्या निकालाने दिले आहे, असे मोदींनी सांगितले.

देशाच्या विकासाचे काम करेल त्यालाच सेवा करण्याची संधी मिळेल हे देशवासियांनी सांगितले आहे. इतर राजकीय पक्षांनाही देशहिताचे काम करण्याचा संदेश दिला आहे. विकास हाच मुख्य मुद्दा आहे, असेही मोदींनी म्हटले. देशाचा आणि राज्याचा विकास हाच निवडणुकीचा मुख्य आधार असून भविष्यातही राहणार आहे. ज्या लोकांना अद्यापही हे कळले नाही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, असा टोला मोदींनी लगावला.

कार्यकर्त्यांच्या तप, त्याग आणि तपस्येमुळे भाजपचा विकास झाला. तरुणांनी भाजपमध्ये यावे आणि देशसेवा करावी. आपली स्वप्ने आणि संकल्प पूर्ण करावी, असे आवाहन करून मोदी म्हणाले की देशातील एका मोठा ऐतिहासिक राजकीय पक्ष आता फक्त घराण्यापुरताच मर्यादीत झाला आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत राजकीय पक्षांच्या घराणेशाहीचे जाळे लोकशाहीसाठी धोका बनत आहे. हे देशातील तरुण जाणून आहेत.

भाजपा, एनडीएने देश, लोकांच्या विकासाला मुख्य ध्येय ठरवले आहे. देशहिताची प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आणि प्रत्येक निर्णय घेणार, असा निर्धार नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाजपा एकमेव पक्ष आहे जो प्रत्येकाची गरज समजून त्यांच्यासाठी काम करत आहे. देशातील तरुणांचाही भाजपावर जास्त विश्वास आहे. दलित-शोषित यांचा आवाजही भाजपाच आहे. मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कोणी प्रयत्न करत असेल तर तो भाजपा आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले.

मी कालपासून बातम्यांमध्ये सायलेंट वोटरसंबंधी वाचत आहे. भाजपाला सायलेंट वोटर मतदान करत आहेत असे सांगितले जात आहे. वारंवार त्यांचा उल्लेख केला जात आहे. देशातील नारी शक्ती याच आमच्या सायलेंट वोटर असल्याचे मोदींनी सांगितले. भाजप सरकारमध्ये महिलांना सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. जनधनच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम गेली. उज्ज्वला योजनेतून मिळणा-या सिलेंडरमुळे त्याच्या स्वयंपाकघरातला धूर दूर झाला. शौचालयांची बांधणी, वीज पुरवठा, १ रुपयात सॅनिटरी पॅड यामुळे महिलांना मोठा फायदा झाला. याच महिला मतदार भाजपच्या सायलेंट वोटर आहेत. महिलांचा आशीर्वाद कायम भाजपला मिळतो. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं मोदी म्हणाले. ग्रामीण ते शहरापर्यंत महिला मतदार भाजपाचे सायलेंट वोटर ठरले आहेत, असे मोदींनी यावेळी सांगितले. देशातील तरुणांनी पुढे येऊन भाजपाच्या माध्यमातून देशसेवा करावी असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले.

दरम्यान, आपल्या नागरिकांचे कष्ट आहे, आपल्या देशाच्या मातीचा सुगंध आहे अशा स्थानिक वस्तू विकत घ्या. ‘लोकल फॉर व्होकल’ व्हा, असे आवाहन करत मोदींनी आपले भाषण संपवले.

बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?

 

बिहारमधील निकाल एनडीएसाठी आनंदाचा असला तरी नितीश कुमार यांच्यासाठी मात्र चिंतेचा विषय आहे. एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या त्यांना ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख करत जागा वाढणारा भाजपा एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याचे सांगितले आहे.

बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपला मिळायला हवे, अशी विधाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. मात्र त्यावर मोदींनी थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. बिहारमध्ये भाजपाला जेडीयूपेक्षाही जास्त जागा मिळाल्या असल्याने महाराष्ट्राप्रमाणे मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र मोदी यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असे स्पष्ट केले आहे.

बिहारच्या जनतेने विकासाला प्राधान्य देत एनडीएच्या बाजूने अतिशय स्पष्ट कौल दिल्याचे मोदी म्हणाले. आत्मनिर्भर बिहारचा संकल्प आपण केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आपण त्यात अजिबात कमी पडणार नाही. भाजप, एनडीएचे कार्यकर्ते पूर्णपणे सरकारच्या पाठिशी उभे राहतील, असे मोदींनी म्हटले आहे. बिहारला लोकशाहीचे जमीन का म्हटले जाते हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवले आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे सांगत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, हे स्पष्ट केले आहे.

ममता बॅनर्जींना गर्भित इशारा

 

जे लोक आमचा सामना करत नाही त्यांनी नवा मार्ग अवलंबला आहे. देशात भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. देशातील काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. आपले मनसुबे पूर्ण होतील असे त्यांना वाटत आहे. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मला इशारा देण्याची गरज नाही कारण ते काम जनता करेल. विजय पराभव होत असतो पण लोकशाहीत हे चालणार नाही. मृत्यूचा खेळ खेळून मत मिळणार नाहीत, असा गर्भित इशाराही मोदींनी यावेळी दिला.

बिहार विधानसभा : एकूण जागा २४३

राष्ट्रीय जनता दल – ७५
भाजप – ७४
जेडीयू – ४३
काँग्रेस- १९
सीपीआय माले – १२
एमआयएम – ५
विकासशील इन्सान पार्टी – ४
हिंदुस्तानी अवाम मोर्चा – ४
सीपीआय – २
सीपीएम – २
लोजपा – १
बसप – १
अपक्ष – १

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी