28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeटॉप न्यूजचित्रलेखाच्या शेवटच्या अंकातही महारावांनी 'संघ-भाजप'ला बदडून धुवून काढले!

चित्रलेखाच्या शेवटच्या अंकातही महारावांनी ‘संघ-भाजप’ला बदडून धुवून काढले!

'संघ-भाजप' परिवारात बेताल नागड्या-वेड्या वाचाळांची चढाओढ लागलेली दिसते. म्हणजे त्यांच्या सत्तेचा शेवटचा अंक अपेक्षेआधीच सुरू झालाय! पाटीलबुवांनी 'डेक्कन एज्युकेशन'वाल्या टिळक-आगरकरांच्या 'भीक' मागण्याचे उदाहरण का दिले नाही? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधांशु त्रिवेदी ही संघाच्या खास संस्कारातून राजकारणात आलेली 'गुणी' बाळं! RSS BJP Beaten in Marathi Chitralekha by Editor Dnyanesh Maharao

मराठी साप्ताहिक चित्रलेखाच्या शेवटच्या अंकातही संपादक ज्ञानेश महारावांनी ‘संघ-भाजप’ला नेहमीप्रमाणे बदडून धुवून काढले आहे. “शेवटचा अंक: त्यांचा-आमचा” हा लेख म्हणजे अभ्यासू महारावांच्या बिनधास्त आणि बेधडक लेखणीचा अप्रतिम फटकारा आहे. (RSS BJP Beaten in Marathi) हे असे फटकारे यापुढे निर्लज्ज आणि कोडग्या राजकारण्यांना बसणार नाहीत. राजकीय गेंडे, गेंडयाच्या कातडीचे अधिकारी या सर्वांनी नक्कीच सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. एखाद्याला कामाख्या देवीला जाऊन, नवस बोलून, रेडयाचा बळी देऊन जे काम झाले नसते, ते झाले. बेरडांच्या मानगुटीवर बसून त्यांची पिसे काढणारे महाराव नावाचे लेखणीतले भूत तूर्तास चित्रलेखातून थंडावत आहे. मात्र, झपाटलेली ही लेखणी यापुढेही सोशल मीडियात झंझावाती ठरेलच.

एकवेळ 50 खोके देऊन बेइमान आणि गद्दार आमदार विकत घेणे सोपे आहे; पण महाराव गेल्या तीन दशकात कुणाला शरण गेळे नाहीत. अलीकडच्या काळातील पत्रकारिता, समाजकारण, प्रबोधनातील ज्ञानेश महाराव हा प्रचंड फॉलोअर्स असलेला मोठा ब्रॅंड आहे. शेवटचा अंक हातावेगळा करून ते इंदुरीकर प्रतिष्ठानच्या कामासाठी आज पुणे जिल्ह्यात आहेत. महाराव नावाची ही वावटळ प्रबोधनाची यात्रा आणि जागर सुरूच ठेवेल. दुर्दैवाने, त्यांच्या ताकदीचा आणि जिगरबाज असा दुसरा उत्तराधिकारी नसल्याने चित्रलेखा व्यवस्थापनाचा मराठीबाबत नाईलाज झाला असावा. अर्थात संस्थेचा गुजराती चित्रलेखा सुरूच राहणार आहे.

महाराव यांच्या लिखाणाची ताकद शेवटच्या अंकातील, शेवटच्या संपादकीय लेखातूनही दिसून आली. चित्रलेखाच्या शेवटच्या अंकातही महारावांनी ‘संघ-भाजप’ला बदडून धुवून काढताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘संघ-भाजप’ परिवारात बेताल नागड्या- वेड्या वाचाळांची चढाओढ लागलेली दिसते. म्हणजे त्यांच्या सत्तेचा शेवटचा अंक अपेक्षेआधीच सुरू झालाय! पाटीलबुवांनी ‘डेक्कन एज्युकेशन’वाल्या टिळक-आगरकरांच्या ‘भीक’ मागण्याचे उदाहरण का दिले नाही? हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. संघ आपण घडवलेली काही प्यादी ‘भाजप’मध्ये घुसवतो आणि आपल्याला हवे तसे राजकारण हलवतो, हे सांगतानाच अलीकडच्या काळातील भाजप नेत्यांची बेताल विधाने ही मुद्दाम, जाणीवपूर्वक, ठरवून केली गेलेली असल्याचा मुद्दा महारावांनी शेवटच्या लेखातून अधोरेखित केला आहे.

छत्रपती शिवराय, महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानाची भाषा करणारे राज्यपाल कोश्यारी, सावरकरांच्या माफीनाम्याची बरोबरी शिवरायांनी औरंगजेबाशी केलेल्या तहनाम्यांशी करणारे ‘भाजप’चे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी; त्यांना ‘क्लीन चिट’ देणारे देवेंद्र फडणवीस किंवा महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा-कॉलेज निर्माण करण्यासाठी व चालवण्यासाठी ’लोकवर्गणी’ जमा केली; त्याला ‘भीक’ म्हणणारे ‘भाजप’चे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील; ही संघाच्या खास संस्कारातून राजकारणात आलेली ‘गुणी’ बाळं आहेत. त्यांच्या वा कुणाच्याही लिहिता-बोलताना चुका ह्या होणारच! पण त्या करताना सातत्याने आपल्या आदरस्थानांना टाळून बहुजनांच्या आदरस्थानांना, महामानवांना का लक्ष्य केले जाते? असा सवाल महारावांनी उपस्थित केला आहे.

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकात जाऊन ’भीक’ मागितली,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ह्यातला ‘भीक’ हा शब्द अपमानकारक आहे. कारण ह्या तिघांनीही आपल्या बुद्धी- शक्ती प्रमाणेच आपला पैसा, संपत्ती, कुटुंबाचे दाग-दागिने हेदेखील शिक्षण संस्थांसाठी खर्च केले होते. हेच विदर्भात बहुजनांसाठी शिक्षणसंस्था काढणारे पंजाबराव देशमुख, बार्शीचे मामासाहेब जगदाळे, सांगलीचे बापूजी साळुंके, रायगडचे नागूअण्णा पाटील, मुंबईतील ‘मराठा मंदिर’चे बाबासाहेब गावडे, नाशिकचे दादासाहेब गायकवाड़ आणि शांताबाई दाणी यांनी केले आहे. याच्यापेक्षा वेगळं काही पुण्याच्या ‘डेक्कन एज्युकेशन’ सोसायटीची स्थापना (1884) करताना विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी केलं नव्हतं. त्यांनीही ‘लोकवर्गणी’च जमवली होती. मग फुले-आंबेडकर- कर्मवीर अण्णा यांचे दाखले देताना टिळक-आगरकर यांची नावं घेण्याचे का टाळायचे? का, त्यांची ती ‘लोकवर्गणी’ आणि इतरांची ती ‘भीक’ अशी घरगुती पंगत पाटीलबुवांना मांडायची होती का ? आजचे शिक्षण संस्था चालक ‘शिक्षण सम्राट’, ‘डोनेशन किंग’, ‘फॅमिली ट्रस्ट चालक’ म्हणून बदनाम झालेले आहेत. तरीही त्यांना फुले-आंबेडकर- भाऊराव यांच्या सेवाभावी प्रतिष्ठेचं उदाहरण द्यायचं, कारणच काय ? उदाहरणच द्यायचं होतं, तर ‘संघ-भाजप’ परिवारातल्या कुणी ‘भीक’ मागून शाळा-कॉलेज निर्माण करून चालवली असतील, तर त्यांचं द्यायचं होतं. पण तसं काय सांगितलं, तर लोक खोदकाम करून ‘बोगस भिडे गुरुजी’ दाखवतील ना? मुळात, जी अवमानकारक विधानं होतात, ती निश्चितपणे जाणीवपूर्वक होतात, हे स्पष्ट आहे.

‘सार्वजनिक गणेशोत्सव’, ‘आंबेडकर जयंती’ हे लोकोत्सव आहेत. त्यासाठीच्या लोकवर्गणीला ‘भीक’ म्हणायची; तर संघ जी ‘समर्पण राशी’ जमा करतो, तीही ‘भीक’च ना? आणि भट- भिक्षुकांची दक्षिणा. त्याला काय म्हणायचं ? त्याला महात्मा फुले यांनी ‘लाच’ म्हटलंय. त्याचाच सूड उगवण्याची सुपारी दादांनी ‘लोकवर्गणी’ला ‘भीक’ म्हणून घेतलीय काय? कारण, दारी आलेल्या ब्राह्मण विधवेचं बाळंतपण करून, तिच्या मुलाला दत्तक घेऊन, डॉक्टर बनवून, आपल्या मालमत्तेचा वारसदार बनवणाऱ्या महात्मा फुले यांना ‘रा.स्व.संघा’च्या सनातनी पिलावळीने कधीच धर्मद्रोही- देशद्रोही ठरवलंय. अशांची पाठराखण करणाऱ्यांनी, त्यांच्या आज्ञेनुसार वागणाऱ्यांनी महात्मा फुले आणि त्यांच्याच विचार कार्याला व्यापक करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाऊराव पाटील यांना ‘भीक’मागे ठरवलं, तर त्यात आश्चर्य ते काय ? कारण, हत्यारांना डोकं नसतं; ते हत्यार चालवणाऱ्यांना असतं.

चंद्रकांतदादांनी छाती बडवून ”मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. मी धनंजय कीर यांनी लिहिलेलं महात्मा फुले यांचं चरित्र वाचलंय,” असे ‘मीडिया’पुढे ओरडून सांगितलं. परंतु, त्यांनी ह्या चरित्राच्या शेवटी संदर्भासाठी वापरलेल्या पुस्तकाच्या यादीतील खुद्द महात्मा फुले यांनी लिहिलेलं एखादं पुस्तक अथवा ‘मी पाहिलेले फुले’ हे पंढरीनाथ पाटील यांचं पुस्तक वाचलं असतं, तर त्यांनी ‘लोकवर्गणी’ला ‘भीक’ म्हणण्याचा बिनडोकपणा केला नसता. जोतिराव फुलेंनी भटी हरामखोऱ्यांवर नेमके घाव घातल्याने पिसाळलेल्या सनातनी ब्राह्मणांनी जोतिबांना संपवण्याची सुपारी दोघांना दिली होती. घरात रात्रीच्या मंद प्रकाशातल्या सावल्यांमुळे जोतिबा सावध झाले. त्यांनी मारेकऱ्यांना रोखले. त्यांना आपले गरीब- कष्टकरी बहुजनांच्या शिक्षणाचे काम सांगितले. ‘मला मारून तुम्हाला पैसा मिळणार असेल तर मारून टाका !’ असे सांगताच दोघांनी आपल्या हातातील कुर्‍हाडी खाली टाकल्या. जोतिबांनी त्यांच्या हातात लेखण्या दिल्या. त्यांना आपल्या रात्रशाळेत दाखल करून शिक्षित केले. त्यातला रोढे मांग हा जोतिबांचा अंगरक्षक आणि सत्यशोधक ‘शाहीर’ झाला; तर धोंडीराम नामदेव कुंभार हा जोतिबांच्या सुचनेनुसार काशीला गेला आणि तो ‘संस्कृत पंडित’ झाला. तो ब्राह्मणेतरांचे शोषण करणाऱ्या पुराण- पोथ्यातल्या कर्मकांडी हरामखोर्‍या सांगू-लिहू लागला.

हे जोतिबांनी मारेकऱ्यांचे केलेले परिवर्तन आहे. ते चंद्रकांतदादांनी वाचलं असतं तर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे व दोन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे ‘कलम 307’ लावणाऱ्या पोलिसांना वेळीच रोखलं असतं. शिवाय, ‘फुले-आंबेडकर- भाऊराव यांच्या लोकोद्धाराच्या कार्याचे अवमूल्यन करणाऱ्याला शाईफेक करून नव्हे, तर दगडफेक करून रोखा,’ असं सांगून शाई फेकणाऱ्यांना खजील करता आलं असतं. त्याऐवजी त्यांनी संघाच्या नकली समरसतेचं प्रदर्शन घडवलं.

हे सुद्धा वाचा :

चित्रलेखाने घेतला निरोप; ज्ञानेश महारावांनी लिहिले, राम राम अमुचा घ्यावा!

जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!

VIDEO : चंद्रकांत पाटील खुर्चीतून खाली कोसळतात तेव्हा ..

महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘आता नको भीक, शिक!’ हा संदेश देत दलितोद्धार केला. भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ या सूत्रानुसार, गरजू, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या करोडो मुलांना आजवर उच्च शिक्षणाबरोबर स्वाभिमानही दिला. शेठजीची लाखो रुपयांची देणगी नाकारून छत्रपती शिवरायांचेच नाव हायस्कूल- वसतिगृहाला ठेवले. याउलट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाचे कार्य ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ तथा ‘एसएनडीटी विद्यापीठ’ म्हणून कसे व का मिरवते, ते सांगितल्यावर अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबतात.

‘कर्मवीर’ भाऊराव पाटील यांनी रुजवलेल्या- वाढवलेल्या ‘रयत शिक्षण संस्थां’चा वृक्ष 550 हून अधिक शाळा-कॉलेजांनी महावृक्ष झाला आहे. गरीब घराच्या मुलांना दोन वेळच्या जेवणासाठी ‘ओम भवती भिक्षां देही’ म्हणायला लावत पाच घर फिरायला लावायचे. त्याला ‘माधुकरी’ असे गोंडस नाव द्यायचे. नारळाला ‘श्रीफळ’ म्हणायचे. तो ‘फोडला’ असे न म्हणता ‘वाढवला’ म्हणायचे. ‘भटमान्य’ला ‘लोकमान्य’ करायचे. ही चलाखी आता ‘लोकवर्गणी’ला ‘भीक’ करण्यापर्यंत आणि त्याद्वारे महामानवांचा अपमान करण्यापर्यंत पोहोचली आहे. यासाठी वाचाळांची सरकारमान्य फौज तयार करण्यात आलीय.

संघ स्वयंसेवक घडवण्यासाठी शाखांप्रमाणे शिबिरं, बौद्धिकं, वर्ग- परीक्षा आदि सोपस्कार असतात. ह्या चाळण्यांतून चंद्रकांत’दादा’ पार झालेत. ते ‘भाजप’मध्ये येण्यापूर्वी संघाच्या ‘अ.भा.विद्यार्थी परिषद’चे प्रमुख होते. असो. तर संघाच्या बौद्धिकांत ‘भारतीयांच्या औदार्याच्या परिसीमेमुळे भारत ही कशी एक मोठी धर्मशाळा बनली आहे,’ ते विस्कटून सांगताना ‘द्वितीय सरसंघचालक’ गोळवलकर गुरुजी यांचं नाव घेत एक गोष्ट हटकून सांगितली जाते. ”एका गावात एक वेडा नागडा फिरायचा. लोक त्याला हटकत. प्रसंगी दगड मारून पिटाळीत. हे फक्त लंगोटी घातलेल्या माणसाने पाहिले. त्याने तिरमिरीत आपली लंगोटी सोडली आणि नागव्या वेड्याकडे भिरकवीत म्हणाला, ‘तुला नागवं फिरायला लाज नाही वाटत. घे ही लंगोटी, आणि नेस!’ असं सांगून ‘गुरुजी’ श्रोत्यांना विचारीत, आता खरा वेडा कोण, ते तुम्ही ठरवा!” ही गोष्ट ‘संघ-भाजप’ परिवारांत एव्हाना सार्वत्रिक झाली असावी. त्यामुळेच ‘संघ-भाजप’ परिवारात बेताल नागड्या- वेड्या वाचाळांची चढाओढ लागलेली दिसते. म्हणजे त्यांच्या सत्तेचा शेवटचा अंक अपेक्षेआधीच सुरू झालाय! अशा शब्दांत चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी संघ-भाजपच्या हेतूत: बदनामीचा बुरखा टरकावत त्यांना शेवटच्या अंकात झोडपून काढले आहे.

RSS BJP Beaten in Marathi Chitralekha by Editor Dnyanesh Maharao

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी