काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर पार पडले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन या शिबिराला हजार राहिले होते. परंतु या शिबिराला अजित पवार गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. तर शिंदे गटातील राज्याचे कृषिमंत्र अब्दुल सत्तर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पण तेव्हा देखील अजित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ज्यामुळे अजित पवार यांच्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा करण्यात आल्या. पण आता याबाबत अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी म्हटले की, खोकला सुरू झाला होता, त्यानंतर परदेशात गेलो होतो. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला. मावळ येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी जाहीरपणे चर्चांना पूर्णविराम लावला. अजित पवार यांनी म्हटले की, गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले. काहीही बातम्या सुरू होत्या. वारेमाप चर्चा करायची. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची. असं म्हणत गायब असणाऱ्या आणि नाराजी मागचं गूढ अखेर स्वतःच समोर आणलं.