कुठलीही गोष्ट ठळकपणे तेव्हाच कळते जेव्हा त्यावर सविस्तर वार्तांकन केले जाते, त्याविषयी सविस्तरपणे माहिती सादर करण्यात येते, मात्र कोणतेच साधन उपलब्ध नसताना हातात प्लास्टिकची बाॅटल घेऊन एक लहान मुलगा वार्तांकन करीत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न्यूज 24 ने याबाबत दखल घेऊन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील घडलेला प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असला तरीही तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये 12 वर्षांचा मुलगा चक्क रिपोर्टिंग (Reporting) करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शाळेची दुर्दशा आणि तेथील लहान मुलांना काय वाटते या सगळ्यांबाबत त्यांनी वार्तांकन केले आहे.
या वार्तांकनानंतर या चिमुरड्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. या लहानग्यांना वार्तांकन काय हे माहित नसले तरीही त्यांनी दाखवलेली शाळेच्या दुर्दशेचे वास्तव भयावह आहे. शाळेतील पाण्याची व्यवस्था, शाळेच्या अवतीभोवती वाढलेले गवत, बसण्याची व्यवस्था, खराब भिंती असे सारंच दाखवून ही अशी कशी शाळा असा सवालच त्या मुलाने यावेळी केला आहे. या व्हिडिओनंतर आता तरी तेथील प्रशासन शाळेबाबत लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.