मुंबईकरांच्या हक्काचे एक कोटी लिटर पाणी रोज ठाण्यातील गटारातून वाहून जात आहे, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. त्यांनी अनेक धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधले. ठाणे वागळे इस्टेट येथे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जपानी तंत्रज्ञानाच्या बोगद्यात बोगदा झाला आहे. या भगदाडामुळे मुंबईला गढूळ आणि कमी पाणीपुरवठा होत आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही समस्या सोडवावी आणि मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे पाणी द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वागळे इस्टेट परिसरात रोज दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी लिटर पाणी वाया जात आहे. नोव्हेंबर 2022 पासून ही गळती सुरू आहे. मुंबईकरांचे कोट्यवधी लिटर पाणी ठाण्यातील गटारीत वाहून जात आहे. दुसरीकडे मुंबईला मात्र रोज पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. वागळे इस्टेट रोड नंबर 16 वर बोअरिंग करून कुणी तानसा-भांडुप पाणी बोगद्याला भगदाड पाडले, असा सवाल डॉ. आव्हाड यांनी केला.
आव्हाड यांच्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वागळे इस्टेट रोड नंबर 16 येथे एका जागेला बोअरिंग मारण्यात आले. MIDCकडून या कामाला परवानगी मिळाली होती की नाही, हे कळायला मार्ग नाही. याच ठिकाणाहून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मुंबईला पाणीपुरवठा करणारा एक बोगदा तानसा ते कापूरबावडी आणि पुढे भांडुप फिल्टरेशन प्रकल्पात जातो. कुठलीही परवानगी न घेता वागळे इस्टेट परिसरात त्या बोगद्यावर बोअरिंग मारण्यात आले. यात त्या बोगद्याला भोक पडले. तिथे तळे निर्माण झाले आहे. ते कुणाला समजू नये म्हणून तिथे सक्शन पंप लावण्यात आले आहेत. ते पाणी उपसून गटारात सोडले जात आहे. या उद्योगामुळे भांडुप शुद्धीकरण प्रकल्पात गढूळ पाणी पोहोचत आहे.

यापूर्वी कधीतरी अशी समस्या उद्भवली होती तेव्हा 8 कोटींचा दंड ठोठावला गेला होता. हा दंड भरायला लागू नये म्हणून ठाणे महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांवर चालढकल करून हा उद्योग दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. या बोगद्याला पडलेले भागदांड बंद करायचे असल्यास शटडाऊन घ्यावा लागेल. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा 15 दिवस बंद करावा लागेल. जमिनीखाली काही मीटर खोल हा बोगदा आहे. त्यांचे दुरुस्तीकाम जपानी तंत्रज्ञानाशिवाय होणारच नाही. त्याला दोन महीने लागू शकतील, असा तंत्रज्ञांचा अंदाज आहे. हजारो कोटी रुपये खर्चून हा बोगदा निर्माण करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा :
भातसा विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात
शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही ; भाजपा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याला बोअरिंग करताना भगदाड पाडले गेल्याने, या बोगद्यातून जाणाऱ्या पाण्याच्या प्रचंड दबावाने वागळे इस्टेट परिसरात रस्ता फुटून वर येण्याचा किंवा मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे, अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त केली. यापूर्वी या परिसरात एक जलवाहिनी फुटली होती, तेव्हा संपूर्ण वागळे इस्टेट परिसरात तीन फूट पाणी साचले होते, याची आठवण जितेंद्र आव्हाड यांनी करून दिली. तानसा-भांडुप बोगद्याला वागळे इस्टेट परिसरात पडलेला बोगदा त्वरित बुजविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावें अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.