27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरजागतिकअमेरिकेतील मेरिलँडमध्ये उभारला जातोय बाबासाहेबांचा 'इतका' उंच पुतळा, लवकरच होणार अनावरण...

अमेरिकेतील मेरिलँडमध्ये उभारला जातोय बाबासाहेबांचा ‘इतका’ उंच पुतळा, लवकरच होणार अनावरण…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासह संपूर्ण जगाला समानतेची शिकवण दिली. समाजातील बहिष्कृत वर्गाला त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा या महामानवाचा भारताबाहेर सर्वाधिक उंच पुतळा उभारला जातोय. आणि या पुतळ्याचे अनावरण येत्या 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता तुम्ही विचाराल, हा कोणता देश आहे, जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा उभारला जातोय. तर याचं उत्तर आहे अमेरिका. उत्तर अमेरिकेत तब्बल 19 फूट उंचीच्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून आंबेडकरप्रेमी उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेतील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर म्हणजे ‘एआयसी’ या संस्थेने या कामी पुढकार घेतला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा भारतात तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये आहे. शिवाय जगातील अनेक देशांतही डॉ. आंबेडकरांचे पुतळे आहेत. त्या सर्वांमध्ये सर्वाधिक उंच पुतळा उत्तर अमेरिकेतील मेरिलँडमध्ये उभारण्यात आला आहे. मेरिलँडमधील अकोकीक शहरात (Accokeek) उभारलेल्या या पुतळ्याचे अनावरण 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच या दिनाचे औचित्य साधून भारताबाहेरील डॉ. आंबेडकरांच्या सर्वात उंच अशा 19 फूट पुतळ्याचं अनावरण केले जाणार आहे.


अकोकीक शहरातील (Accokeek) तब्बल 13 एकर जागेवर डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याचे शिल्पकार आहेत विख्यात शिल्पकार राम सुतार. भारताची घटना बनवण्याच्या कामात डॉ. आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. शिवाय देश स्वतंत्र झाल्यानंतर ते देशाचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते. कायदेपंडित ही खरी बाबासाहेबांची ओळख आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या अनावरणासाठी जगभरातून आंबेडकरप्रेमी येणार असल्याची माहिती आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर यांच्याकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा 

नरेंद्र मोदींनी शिक्षकांना लिहिली मराठीतून पत्रे, कारण…

‘या’ हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली… मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

नांदेड रुग्णालयातील घटनेनंतर आता घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 मृत्यू…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगाताली सर्वात उंच पुतळा सध्या तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये आहे. हा पुतळा तब्बल 125 फूट उंच असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यंदा 14 एप्रिल रोजी या पुतळ्याचं अनावरण केले आहे. 100 टन ब्रॉन्झ आणि 360 टन स्टीलपासून बनवलेल्या या पुतळ्यासाठी 145 कोटींचा खर्च आला आहे. तर पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील सर्व 119 मतदारसंघातून दलित प्रतिनिधी आमंत्रित केले होते.

मुंबईतील दादरमधील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचेही काम सुरू आहे. येथे डॉ. आंबेडकरांचा तब्बल 137 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होईल, तेव्हा मुंबईतील डॉ. आंबेडकरांचा पुतळा जगातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी