संपादकीय

Lockdown : माजी अधिकाऱ्याचे पोलीस बांधवांना पत्र

मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,

जयहिंद

तुम्ही सर्व मंडळी सध्या फारच बिझी आहात. जे कर्तव्य तुम्ही पार पाडत आहात ते फारच वेगळ्या पद्धतीचे आहे. तुमच्या सर्व्हिसमधील हा ( Lockdown ) पहिलाच असा वेगळा जागतिक पद्धतीचा बंदोबस्त आहे. कदाचित अशा प्रकारचा बंदोबस्त शेवटचाच असावा अशी आपण निसर्गाजवळ प्रार्थना करूया. सुरूवातीला तुम्ही करीत असलेल्या कर्तव्याला एक कडक सॅल्युट.

पहिल्यांदाच मी हे स्पष्ट करू इच्छितो की, माझे हे पत्र फक्त पोलीस शिपाई ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदापर्यंतच्याच मंडळींसाठी आहे. कारण फक्त आणि फक्त याच मंडळीचा सर्वसामान्य जनतेशी ‘डायरेक्ट’ संबंध येतो. बाकी फक्त AC गाडी ते AC ऑफिस इतकाच संबंध. यातील काही सन्माननीय अपवाद वगळावे लागतील. पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच निघेल. असो.

मित्रांनो, सध्या आणीबाणीची ( Lockdown ) परिस्थिती आहे. तुम्ही लोकांना त्यांच्या पार्श्वभागावर आणि इतरत्र अंगावर काठीने फटके मारून पळवत आहात. हे सर्व आम्ही घरबसल्या टी. व्ही. आणि व्हॉट्सअपवर पाहात आहोत. सर्वसामान्य लोकांना हे पाहताना फारच मजा येत आहे. ते हसत आहेत.  आनंद घेत आहेत. टिक टॉक तयार करीत आहेत.

Lockdown मुळे पोलीस सामान्य लोकांना मारत आहेत, अशी फोटोसह बातमी परदेशी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

मीडियावाले पोलीस खात्याच्या कोणत्याही एका चुकीवर त्यांच्यावर तुटून पडत होते ते सर्व मीडियाकर्मी पोलिसांची वाहवा करू लागले आहेत. कधी नव्हे ते गृहमंत्र्यांनी पोलिसांच्या काठीला सपोर्ट केला आहे. काठीला तेल लावण्याचे सुद्धा त्यांनी जाहीर आदेश दिले आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये आनंदी आनंद आहे.

आता पहा, गेल्या दोन दिवसांपासून पोलीस जनतेचा मार खात आहेत अशा व्हिडिओ क्लिप्स बाहेर येत आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया लगेचच चेंज ! ‘ पोलीस पण लय अती करतात. फक्त चौकशी करून सोडा ना. मारता कशाला ? कोण कुठे चाललाय, कोणत्या परिस्थितीत चाललाय याचे यांना काहीही देणे घेणे नाही. उचलली काठी आणि हाणली पार्श्वभागावर. ‘

मित्रांनो, जनता कधीही पोलिसांसोबत नसते. फारच अपवादात्मक प्रसंगाच्या परिस्थितीत जनतेने पोलिसांना साथ दिली आहे. नाहीतर नेहमीच आपण टीकेचे धनी असतो.

मित्रांनो, दंगलीचा बंदोबस्त वेगळा आणि हा ‘कोरोना’ ( Lockdown ) बंदोबस्त वेगळा. तुम्ही भर रस्त्यात उन्हातान्हात उभे आहात. त्या ‘कोरोना’शी निधड्या छातीने, हातात फक्त काठी घेऊन मुकाबला करीत आहात. परंतु लोकांना काय त्याचे ? घरात सुरक्षित बसून, गरम पदार्थ हातात घेऊन ते तोंडात टाकत टाकत टी.व्ही पाहत पोलिसांवर जोक करायला काय जाते त्यांचे ?

तुमचे ही घर आहे. तुम्हालाही पत्नी, मुले, आई वडील आहेत. तुम्हीही कोणाचे काका, मामा, भाऊ आहात. तुम्ही सर्वसाधारण गरीब कुटुंबातून आलेला आहात. तुम्ही जर श्रीमंत कुटुंब, मोठा बागायती जमीनदार , मंत्री, उद्योगपती यांच्या घरात जन्माला आला असता, तर कशाला पोलीस खात्यात भरती झाला असता ? नाही का … ??

‘लॉकडाऊन’चे उल्लंघन करणाऱ्यांना मारहाण करण्याऐेवजी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेलीच बरी

मित्रांनो, तुमच्या युनिफॉर्मवर जे कोणी माथेफिरू हात उगारत आहेत ना, ते दृश्य पाहताना खरं सांगतो रक्त सळसळत. पुन्हा एकदा पोलीस खात्यात भरती व्हावंसं वाटतं. खूप अस्वस्थ होऊन डोकं ठणकायला लागतं.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे पत्र लिहिण्याचा एकमेव उद्देश असा आहे की, नका मारू ह्या मूर्खांना. मारण्यापेक्षा त्यांच्यावर कायदेशीर कलमांनुसार गुन्हे दाखल करा. आता व्यवहारीकपणे पाहिले तर गुन्हा दाखल केल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करावे लागणार. सध्या कोर्टसुद्धा चालू बंद ( Lockdown ) अवस्थेत आहेत. म्हणजे पुन्हा एकदा कायदेशीर पेच निर्माण होणार. शेवटी पुन्हा पोलीस दोषी. मग अशा वेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कलम १५१ अन्वये २४ तास लॉकअपमध्ये टाकता आले तर टाकावे. मला तरी आजच्या घडीला हाच एक सर्वोत्तम उपाय वाटत आहे .

मित्रांनो, तुम्हाला हे यासाठी सांगतोय की, तुम्ही मारण्याच्या नादात एखादं दुसरा गाडी चालविणारा पडला आणि तो मेला तर तुमच्यावरच केसेस होणार. या काळात ( Lockdown ) काठी मारताना वाकडी तिकडी फिरली आणि नाही त्या ठिकाणी लागली तर नसते उद्योग होऊन बसायचे. तेव्हा सावधान. काठीचा वापर करू नका. कायद्याने वागा.

असे काही विपरीत घडले तर आपल्याला वाचवायला कोणीही वरिष्ठ, मंत्री, मीडिया, जनता येणार नाही. शेवटी ते आपल्यालाच शेवटपर्यंत भोगावे लागणार आहे. कर्तव्य करीत असताना ( Lockdown ) दोन क्षणासाठी भावनिक होऊन आयुष्य बरबाद करून घेऊ नका. आपण गरीब घरातून आलोय. आपल्या अंगावर केसेस पडल्यावर, चौकशा चालू झाल्यावर आपल्याला ते परवडणार नाही. या केसेस, चौकशा याची थोडीफार आपल्याला माहिती असते. परंतु आपल्या घरच्यांना त्याची काहीही माहिती नसते.

मित्रांनो,  आजच केंद्र सरकारने डॉक्टर आणि तत्सम लोकांचा ५० लाखांचा विमा काढण्याचे घोषित केले आहे. आम्हाला साधी एक जादा इनक्रिमेंट तरी द्या.  कसला विमा आणि कसलं काय ? एका वेळचं ‘घरचं’  जेवण जरी मिळालं तरी आपल्यासाठी मोठ्या लाइफ इन्शुरन्ससारखंच असणार आहे ते. असो.

ही जी मंडळी गावभर फिरत आहेत ना. फिरू द्या त्यांना बोंबलत. त्यांच्या आजूबाजूचे लोकच बघतील त्यांचं काय करायचं ते. आपल्या चाळीतील, बिल्डिंगमधील जी व्यक्ती योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडेल सध्या आणीबाणीची ( Lockdown ) परिस्थिती आहे. त्या कुटुंबावर बहिष्कार टाकावा लोकांनी. वाळीत टाकावे त्यांना. कारण शेजारी नसून आजच्या परिस्थितीत ते राष्ट्रद्रोही आहेत. मला वाटते हा बहिष्कार कामाला येईल.

मित्रानो, मी पोलीस खात्यात असताना आम्ही बऱ्याचवेळा हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांविरुद्ध नाकाबंदीचे कर्तव्य करायचो. आताही अशा नाकाबंदी होतात. आम्ही विदाऊट हेल्मेट इसमावर कारवाई करायचो. हे कर्तव्य करीत असताना माझ्या मनात नेहमी प्रश्न यायचा की, हा माणूस विदाऊट हेल्मेट गाडी चालवतोय. याला स्वतःची काळजी नाही का ?  याचा  अपघात झाला आणि तो मेला तर मला काय त्याचे ? तो मरेल त्याच्या कर्माने. मला काय देणे घेणे त्याचे ? त्याच्या आयुष्याचा ठेका काय मी घेतलाय का ? कदाचित हेल्मेट कंपन्या आणि संबंधित लॉबी आमच्या मार्फत काही ‘हात’ तर मारत नसेल ना ? उगाचच एक शंका मनात डोकावून जायची. असो.

असाच प्रश्न मनात येतोय. बाहेर विनाकारण बोंबलत फिरणाऱ्या गाढवांना कोरोना झाला तर पोलिसांना त्याचे काय देणे घेणे आहे ? त्या गाढवांचे शेजारी बघून घेतील की त्यांना. आम्ही का म्हणून आमचा जीव आणि आमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून यांना सुरक्षितपणे ( Lockdown ) त्यांच्या घरी पाठवून द्यायचे ? कारण हे कृत्य जरी गुन्हेगारी स्वरूपाचे असले तरी ते कृत्य सामाजिक स्वरूपाचच भाग अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा समाजानेच अधिक लक्ष द्यावं हेच उत्तम ठरेल.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सध्या एवढेच. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या जीवावर तुमच्या घरातील मंडळी सुखी आहेत. आपल्याला त्यांच्याशिवाय आणि त्यांना आपल्याशिवाय कोणीही नाही. आपण गरीब घरचे आहोत हे पक्के नेहमी लक्षात असू द्या.

जयहिंद !

तुमचा बंधू,

ॲड. विश्वास काश्यप,

माजी पोलीस अधिकारी,

मुंबई

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

CoronaVirus : रेल्वेतून प्रवास केला, अन् ‘कोरोना’ झाला

Covid-19 lockdown: Man out to buy milk in West Bengal beaten up by police, dies, claims family

Police in India use force on coronavirus lockdown violators

तुषार खरात

Recent Posts

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

2 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

2 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

3 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

6 hours ago

Dhangar Reservation | पंढरपूरमधील उपोषणकर्त्यांचा शिंदे सरकारला इशारा | फडणवीस यांच्यावर संताप

पंढरपूर मध्ये धनगरपंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Strikers in Pandharpur…

7 hours ago