एज्युकेशन

बौद्धांनो स्वतःचे कठोर आत्मपरीक्षण करा…

अ‍ॅड. विश्वास काश्यप

दुसऱ्या जातीला दोष आणि शिव्या देऊन आता काहीही साध्य होणार नाही . ते आमच्या बरेच पुढे गेलेत . आणि आम्ही होतो तिथेच आहोत . फेसबुक, व्हाट्सउपमुळे समाजाची प्रगती, उन्नती होत नाही . फार फार तर प्रचार आणि प्रसार होतो . ते पण दिर्घकालीन नाही तर फक्त क्षणिक .

सध्या आपल्यावर होणाऱ्या जातीय हत्याकांडाची चर्चा सर्वत्र होत आहे . चीड , संताप, राग , द्वेष , इतिहास , भूगोल , राजकीय मतमतांतरे अशी सगळी एकंदर परिस्थिती आहे .

*अमेरिका आणि भारत*

अमेरिकेतील काळ्या गोऱ्यांचा सामाजिक संघर्ष आणि आपल्या भारत देशातील जातीय संघर्ष ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही . अमेरिका खरी लोकशाहीवादी आहे . आम्ही कागदोपत्री लोकशाहीवादी आहोत . आमच्या देशाचा अमेरिका व्हायला अजून कमीत कमी १०० वर्षे तर नक्कीच लागतील .

माझ्या धम्म बंधू भगिनींनो , गेली कित्येक वर्षे आमच्या समाजातील व्यक्तीवर दररोजच हल्ले होत आहे. सर्वेक्षणानुसार संपूर्ण भारतात दर आठवड्याला तेरा दलितांचे खून होतात . पाच ते सहा कुटुंबांची घरे जाळली जातात . दररोज बलात्कार आणि अपहरण होत असतात . आमच्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास वर्षातून असा एखादा तरी जीवघेणा हल्ला होतोच . घटनेनंतर फार फार आठवडाभर चर्चा होते . मोर्चे, निदर्शने, निवेदने इत्यादी इत्यादी सोपस्कार पार पाडले जातात . सध्या कोरोना महोत्सवामुळे हे काही प्रमाणात बंद जरी असले तरी फेसबुक, व्हाट्सउप, ट्विटर, ह्यावर जोरदार चर्चा होत आहे . जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी सगळी व्यवस्था आहे .

*मूळ मुद्दा तसाच …*

आठवड्यानंतर किंवा महिन्याभरानंतर पुढे काय ? तर काहीही नाही . अन्याय अत्याचाराचा मूळ मुद्दा पुन्हा तसाच राहतो आणि पुढची घटना घडत नाही तोपर्यंत तो तसाच अडगळीत पडून राहतो . प्रश्न असा आहे की, आम्ही कधीतरी ह्या मूळ मुद्द्याला भिडणार आहोत की नाही ? आंबेडकरी समाजाची इतकी प्रचंड मोठी वैचारिक ताकद असताना असे कसे होते ?

*स्वतःच्या घराकडे लक्ष ….*

मित्रांनो, काही छोट्या छोट्या गोष्टी आपण कराव्यात असे मला वाटते. पहिल्यांदा आम्हाला वैयक्तिकरित्या स्वतःच्या घराकडे लक्ष दिले पाहिजे . आपले घर सुरक्षित असेल तरच तुम्ही बाहेर समाजकारण ,राजकारण आणि इतर सर्व काही गोष्टी करू शकता . बाहेरच्या शक्तीशी लढू शकता .

*आर्थिक स्थिती मजबूत करा …*

आम्ही मुळातच गरीब घरातील असल्याने आमची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे . ती आर्थिक स्थिती कशी सुधारेल ह्याकडे लक्ष दिलेच पाहिजे . मित्रांनो, पैसा हाच सर्वस्व आहे . पैसा नाही तर कोणीही नाही . त्यामुळे पैसे कमवून आपले घर मजबूत करा . पैसेवाल्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघत नाही . पैसा हीच त्याची जात तयार होते . त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होत नाही . पैशाने तुम्ही कोणतीही यंत्रणा विकत घेऊ शकता .

*गुजराती मारवाडी …..*

मारवाडी, जैन , गुजराती बघा . त्यांच्याही संघटना आहेत . परंतु ते आपल्यासारखे मोर्चे , निदर्शने काढत बसत नाहीत .वैयक्तिकरित्या किंवा संघटितरित्या ते पैशाने संपूर्ण समस्याच मिटवून टाकतात .

*आंबेडकरी समाज पैसेवाला समाज ….*

आमच्याकडे आर्थिक ताकद नसल्याने आम्ही जागोजागी मार खात बसलोय . त्यामुळे भरपूर पैसे कमवा . ते योग्य ठिकाणी गुंतवा . पैश्याची बचत करा . पैसेवाले व्हा . आंबेडकरी समाज पैसेवाला आहे असे दुसऱ्या समाजाने तुम्हाला म्हटले पाहिजे .

*व्यवसायच करा …..*

पैसे कमविण्यासाठी व्यवसायच केला पाहिजे . नोकरीत पैसा नाही . नोकरीत तुम्ही दोन वेळचं पोटभर खाऊ शकता परंतु श्रीमंत होऊ शकत नाही . सध्या नोकऱ्या तरी कुठे आहेत म्हणा . तुम्ही कमीत कमी वडापावची का होईना गाडी टाका . लघु ,अतिलघु उद्योगापासून आपण सुरू करू . रुपये ५०००/- च्या भांडवलावर तो धंदा आपण तीन ते चार मुले घेऊन करू शकतो . प्रत्येकी दीड हजार रुपये भांडवलावर हा व्यवसाय सुरू होऊ शकतो . पोलीस आणि महानगरपालिका तुम्ही आरामात मॅनेज करू शकता .

*मोर्चे , निदर्शने व्यवसायासाठी ….*

आता आपण आपली ओळख बदलू या . आरक्षणासाठी आता आमचे मोर्चे निघणार नाहीत . आता आमचे मोर्चे , निदर्शने होतील ते व्यवसायासाठी . बस झाल्या नोकऱ्या बिकऱ्या .

*कमीत कमी पदवीपर्यंतचे शिक्षण …*

आता दुसरे म्हणजे आमच्या मुलामुलींनी कमीत कमी पदवीपर्यंत चे शिक्षण घेतलेच पाहिजे . आपल्या मुलांना कमीत कमी पदवीचे शिक्षण देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या पालकांची . जर तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण देणार नसाल तर तुम्हाला बाबासाहेबांचे नाव घेण्याचा काहीएक अधिकार नाही . माझे तर असे म्हणणे आहे की , ह्यापुढे आपण एकमेकांशी संबंध ठेवताना ज्या घरात मुलगा किंवा मुलगी कमीतकमी पदवीधारक आहेत किंवा शिकत आहेत अशाच कुटुंबाशी संबंध ठेवावेत . नाहीतर त्या कुटुंबाशी संबंध ठेऊ नयेत . अशा प्रकारच्या कडक उपाययोजना केल्याशिवाय ह्यांना शिक्षणाचे महत्व समजणार नाही . आमच्या अजून किती पिढ्या अर्धवट शिक्षण घेतलेल्या , शिक्षणच न घेतलेल्या राहणार आहेत ? जगातील सर्वोत्तम विद्वान असलेल्या बाबासाहेबांना आम्ही आमचा बाप मानतो आणि त्यांची लेकरं अर्धशिक्षित ? लाज वाटायला पाहिजे आम्हा लोकांना .

*शिका …..*

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ह्यातील पहिले शिका हे आम्हा बऱ्याच जणांना न समजल्यामुळे आम्ही ना संघटित झालो, ना उत्कृष्टपणे संघर्ष केला . सगळंच कसं अर्धवट .

*बडे अधिकारी / बडे व्यावसायिकांना विनंती …..*

आमची बौद्ध समाजातील बड्या अधिकाऱ्यांना आणि काही बड्या व्यावसायिकांना नम्र विनंती आहे की , त्यांनी एकत्रित येऊन जिल्ह्या जिल्ह्यात शिक्षण संस्था उभाराव्यात . मोठ मोठ्या शिक्षण संस्था उभारल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणे शक्य नाही . तुम्ही मोठे अधिकारी आणि व्यावसायिक आहात त्यामुळे समाजाप्रती तुमचे असलेले उत्तरदायित्व सुद्धा मोठे आहे .

*शिक्षण संस्था उभ्या करा ….*

उगाचच प्रवचन देण्यापेक्षा विधायक काम करून दाखवा . समाजाला सध्या त्याची फार गरज आहे .तुमच्या कुटुंबाचा आणि मुलांचा तुम्ही विचार कराच परंतु आपल्या समाजाचा सुद्धा कृतीशील विचार आपण केलाच पाहिजे . एकट्या बाबासाहेबांनी अनेक शिक्षण संस्था उभारल्या . आपण मोठे अधिकारी आणि व्यावसायिक मिळून शिक्षण संस्था का उभारू शकत नाही ? आय . टी . आय. सारख्या शिक्षण संस्था उभारून आपल्या मुलामुलींना आर्थिक सक्षम आपण का बनवू शकत नाही ? व्यावहारिक दृष्ट्या काही अधिकाऱ्यांना शासकीय नियमाबाबत प्रत्यक्ष काम करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात . पण त्यात अवघड असे काहीच नाही .

*जिल्हा कमिटी बनवा …..*

आता अन्याय अत्याचाराबाबत बोलायचे झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात एक कमिटी बनवावी . त्या कमिटीत निवृत्त अधिकारी, पोलीस अधिकारी , वकील, पत्रकार, डॉक्टर , समाजसेवक असले पाहिजेत . नमूद कमिटीची महिन्यातून एक तरी मिटिंग झाली पाहिजे . ती कमिटी जिल्ह्यात ज्या ठिकाणी घटना घडेल त्याठिकाणी भेट देऊन सगळी सूत्रे आपल्या हातात घेईल .

*जातीअंताची लढाई ….*

जातीअंताची लढाई लढणाऱ्या आमच्या ऍड . बाळासाहेब आंबेडकर सरांची फार वर्षापासूनची एक मागणी आहे की, शाळेच्या रजिस्टर मधून जातीचा कॉलम काढून टाकावा . ही मागणी १०१ % बरोबर आहे . आपण सर्वांनी मिळून शासन दरबारी लेखी पाठपुरावा करून ती मागणी मान्य करून घेतली पाहिजे .

*खेडी सोडा , शहरात या …*

आमचे पत्रकार मित्र दिवाकर शेजवळ लिहितात की, बाबासाहेबांनी सांगितले की खेडी सोडा , शहरात या . १००% सत्य . यु. पी ., बिहारचे भैये त्यांचे गाव सोडून मुंबईत आले . एस .आर .ए . योजनेत तीन तीन प्लॅट मिळाले . आता ते करोडपती आहेत . आणि आम्ही बसलोय गावात, खेड्यात मार खात . बाबासाहेबांचे अजूनही ऐका, खेडी सोडा , शहरात या .

*ब्राह्मणांना अजून किती ठोकणार ?….*

फक्त ब्राह्मणांना शिव्या देऊन काहीही फायदा नाही . आतापर्यंत झालेल्या हत्याकांडात किती आरोपी ब्राह्मण समाजाचे आहेत ? तर जवळ जवळ नाहीच . आता कोणी म्हणेल की त्या हत्याकांडामागे ब्राह्मणी ब्रेन आहे त्याचे काय ? अरे पण ज्याने हा ब्रेन वापरायला दिला त्याची काहीच जबाबदारी नाही का ? ब्राह्मणांना आम्ही अजून किती दिवस ठोकणार आहोत ?

*कोणत्याही क्षेत्रात मजबूत संघटन नाही …..*

आमची सगळी एनर्जी आर . एस . एस . ला नावे ठेवण्यात जात आहे . परंतु त्यांच्या सारखी संघटना काढण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का ? आमचे कोणतेच संघटन मजबूत नाही . ना राजकीय, ना धार्मिक , ना सामाजिक, ना शैक्षणिक , ना सांस्कृतिक , ना आर्थिक ,ना बौद्धिक , कोणतेच नाही . खरं तर आमच्याकडे प्रचंड विद्वत्ता आहे . मोठे मनुष्यबळ आहे . कष्ट करण्याची ताकद आहे . सामाजिक भान आहे . सगळं काही आहे . फक्त अतिशहाणपणामुळे सगळं घोडं अडलय . प्रत्येकजण बाबासाहेब समजायला लागलाय . नम्रता नाही , त्यागाची भावना नाही , कोणाला मोठे मानण्याची दानत नाही . मी म्हणेल तेच खरं . मला एकट्यालाच बाबासाहेब समजला आहे . बस .

*वेगवेगळ्या राजकीय पक्षातील आपल्या बंधूंचा सन्मान करा ….*

प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, खासदार व्हायचंय . नक्कीच व्हा . स्वप्ने मोठीच पहिली पाहिजेत .पण एक लक्षात ठेवा . प्रत्येकाची राजकीय विचारसरणी वेगळी असू शकते . आमचा एखादा बंधू अनेक आंबेडकरी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात काम करीत असेल तर लगेचच त्याला टार्गेट का म्हणून करता ? तुझ्या काँग्रेसने काय केले ? तुझ्या शरद पवार ने काय केले ? असे कुचके, फुकटचे प्रश्न विचारून त्याला नुसते हैराण करून का सोडता ? तुम्हाला सांगतो प्रत्येक राजकीय पक्षात वरच्या पातळीवर ब्राह्मण समाजाचा माणूस काम करीत आहे . म्हणून त्याला इतर ब्राह्मण त्रास नाही देत . ते एकमेकांशी अतिशय चांगले संबंध ठेऊन असतात . एकमेकांना ते मदतच करतात . आम्ही मात्र एकमेकांना शत्रु मानतो .

*नवीन नेतृत्व तयार करा …*

सध्या दुर्दैवाने आम्हाला आमचा नेताच नाही . जसे तिकडे अंधभक्त आहेत तसे किंबहुना त्यापेक्षा अधिक कट्टर अंधभक्त आमच्याकडे सुद्धा आहेत . आता जुनं नेतृत्व मार्गदर्शकपर भूमिकेत ठेवुन नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे . नव्या नेतृत्वाने सुद्धा त्याची लायकी ही त्याच्या कामातून , सामाजिक बांधिलकीतून , शिक्षणातून , आचरणातून दाखविली पाहिजे . नेतृत्व फक्त फेसबुक व्हाट्सउप वर पोस्ट करून तयार होत नाही .

*आम्ही बाबासाहेबांना संकुचित ठेवलंय ….*

आम्ही विश्वनेते बाबासाहेबांना इतकं संकुचित करून ठेवलंय की काही विचारू नका . इतक्या वर्षात प्रत्येक समाजाने बाबासाहेबांना मनातून स्वीकारायला हवे होते परंतु तसे झाले नाही . ह्याला संपूर्णपणे आम्ही संकुचित विचारांचे, कट्टर म्हणविणारे आंबेडकरवादीच कारणीभूत आहोत . दुसऱ्या जातीत बाबासाहेब आम्ही जाऊच देत नाही . चला एकवेळ आपण हे मान्य करू की बाबासाहेब हे फक्त तुमचेच आहेत . तर मग तुमचे आचरण त्या महापुरुषाच्या विचारांशी सुसंगत आहे का ? तर ते शंभर टक्के नाही . मुखी बाबासाहेब आणि कृती भलतीच . आता हे चालणार नाही . बाबासाहेबांचे नाव घ्यायचे असेल तर तुमचे वागणे , बोलणे , भाषा , संस्कार सगळेच ” आंबेडकर ” ह्या नावाला शोभेल असेच पाहिजे . आंबेडकर नाव इतके छोटे वाटले का तुम्हाला ? आंबेडकर म्हणजे स्वाभिमान, कष्ट, जीवनाशी लढाई , प्रामाणिकपणा, उच्च शिक्षण आणि बरेच काही …

*बुद्धाला सुद्धा संकुचित ठेवले ….*

आम्हाला हिंदूच्या देवी देवतांवर टीका करायला फार आवडते . आम्ही त्यांच्या देवळातल्या गर्दीवर टीका करतो . अरे ते काही का असेना ते श्रद्धेने ,कोणत्या तरी विचाराने आठवड्याच्या एक ठराविक दिवशी वेळात वेळ काढून देवळात जातात तरी . का हो तुम्ही जाता का कधी बुद्ध विहारात ? ( काही सन्माननीय अपवाद वगळता ) तुम्ही कधी दुसऱ्या जातीतील आपल्या मित्रांना विहारात घेऊन जाता का ? बुद्धाला सुद्धा तुम्ही बाबासाहेबांसारखेच संकुचित का करून ठेवले आहे ?

*आता आक्रमकपणा सोडा ….*

आम्ही आता आमचा आक्रमकपणा थोडासा सोडावा . लेखणीने काम करावं . बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीने हजारो वर्षाचा अन्यायी इतिहास मोडून काढला . तुम्ही बाबासाहेबांची लेकरं लेखणी चालवू शकत नाही ? पँथरचा क्रांतिकारक आक्रमकपणा त्याकाळी योग्यच होता . त्या पँथर्सना कोटी कोटी प्रणाम . परंतु आताची परिस्थिती ही त्या काळाच्या कितीतरी पटीने चांगली आहे हे आम्हाला मान्य करावेच लागेल .

*आतंरराष्ट्रीय विवाह करा ….*

आता मित्रांनो आणि मैत्रिणींनो शेवटचे . तरुण मुलामुलींना एकच सांगणे आहे की , तुम्हाला भविष्यात आंतरजातीय विवाह करायचाच असेल तर तुम्ही तो करू नका . तुम्ही आता आंतरराष्ट्रीय विवाह करा . आंतरराष्ट्रीय विवाह ….पक्के डोक्यात ठेवा . आणि फक्त डोक्यात ठेऊन काही फायदा आहे का ? तर नाही . मग त्यासाठी उच्च दर्जाचे चांगले शिक्षण घ्या . उच्च पदाच्या नोकरीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा . छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय कसा करता येईल ह्याचा विचार करा . उच्च पदाच्या नोकरीमुळे , व्यवसायाच्या प्रगतीमुळे मला परदेशात कसे जाता येईल आणि त्याच बरोबर परदेशातील मुलामुलींबरोबर कसे लग्न करता येईल ह्याचा विचार करा . आता विचार ग्लोबल आणि लग्न ही ग्लोबल .

आता किती दिवस मोर्चे, आंदोलने , निवेदने ? आता फक्त आपल्या घराची प्रगती , मग समाजाची आणि मग देशाची …. बघा पटतंय का !!

*आपला धम्म बंधू ,*
*अ‍ॅड. विश्वास काश्यपअ‍ॅड. विश्वास काश्यप*
*मुंबई .*

अभिषेक सावंत

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

18 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

20 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

21 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago