महाराष्ट्र

शिवरायांचा आठवावा प्रताप !

1666 मध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज व युवराज छत्रपती संभाजी महाराज ह्या मान्यवरांना नजर कैद.आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली(Shivaji Maharaj and Yuvraj Chhatrapati Sambhaji Maharaj caught sight).
महाराज आग्र्यापासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर जाऊन पोहोचले. औरंगाबादेनंतर येथे पोहोचेपर्यंत कोणताही खटकणारा प्रकार प्रवासात घडला नाही. पण महाराजांच्या मनाला भीमानदी ओलांडल्यापासून ते थेट आग्र्यात पोहोचेपर्यंत एकच गोष्ट सतत खटकत असली पाहिजे. जळजळीत पित्त उफाळून यावं तशी त्यांची मनस्थिती होत असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे या भूमीची आणि भूमीपुत्रांची दुर्दशा , गुलामगिरी , लाचारी आणि तरीही मोगली तख्तापुढे कमरेपर्यंत वाकणारी मुजरेगिरी. १२ मे बादशाहाचा वाढदिवस उगवला. सामान्यपणे सकाळी १० चे सुमारास हा वाढदिवसाचा कार्यक्रम आग्रा किल्ल्यात सुुरू होणार होता. म्हणजेच महाराज आणि संभाजीराजे यांना किल्ल्यात सुमारे १० वाजता पोहोचणे जरूर होते. पण बादशाहाने सलीमगडची गस्त सोडून रामसिंगला आणि मुखलिसखानला महाराजांच्या स्वागतास जाण्याची अनुज्ञा दिलीच नाही. त्याला महाराजांचा एक वेगळाच नाटकी देखावा करून घेण्याची इच्छा होती. ती म्हणजे शिवाजीराजे दरबारात उशीरा यावेत. ते आलेले दरबाऱ्यांना जाणवावेत.तेथे महाराजांनी आणि संभाजी राजांनी आपणास केलेले मुजरे आणि अर्पण केलेले नजराणे सर्वांस दिसावेत. शिवाजीसारखा माणूस तख्तापुढे कसा वाकतो याचे कौतुक लोकांनी पाहावे ही औरंगजेबाची खरी इच्छा आणि योजना होती.

महाराजांना घेऊन रामसिंग समोर आला. अकीलखान नावाच्या सरदाराने महाराजांना अदबीने ‘ यावे ‘ असे म्हटले. महाराज आणि संभाजीराजे अन् सत्कार नजराण्याची ताटे घेतलेले दोन नोकर असे औरंगजेबाच्या पुढे गेले. शाही आसनापासून महाराज बहुदा सात- आठ फुटांवर पोहोचले. बादशाहाने त्यांच्याकडे बघितलेसुद्धा नाही. एका शब्दानेही बोलणे , चौकशी करणे , निदान चेहऱ्यावर स्मित व्यक्त करणे हे सुद्धा औरंगजेबाच्या विचित्र स्वभावाला यावेळी परवडले नाही. तो जपमाळ ओढीत होता. महाराजांनी आणि संभाजीराजांनी रिवाजाप्रमाणे बादशाहास तीन वेळा मुजरा (कुनिर्सात) केला आणि सत्कानजराण्याची ताटे बादशाहापुढे सादर केली. बादशाह काही बोलतील अशी स्वाभाविक अपेक्षा होती. पण तो अगदी ठप्प होता. नंतर लगेच त्याने अकिलखानास फर्मावले की , यांना जागेवर सुपूर्द करा.
हा साराच शाही वर्तनाचा प्रकार अपमानकारक होता. पाचशे कोसावरून आपल्या भेटीस आलेल्या एका दिलदार समशेरबहाद्दराचं कालपासून आतापर्यंत हे असं स्वागत होत होतं. आश्चर्यच! महाराजांना समोरच्या सरदारांतील जरा मागच्या रांगेत अकीलने नेऊन उभे केले. शंभूराजे शेजारीच. नंतर बादशाहाने एकमागोमाग एक अशा चौघा बड्या दरबाऱ्यांना मानाची खिलत (आहेर) सुपूर्द केली. त्यात महाराजांना अजिबात वगळले. हाही केवढा अपमान होता!

आग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्या त्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ‘ हा सारा कसला प्रकार चालविला आहे ? अपमान! याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे.हे मी सहन करणार नाही ‘ आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली. शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले.ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची , तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.बादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे.
ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव-औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की , ‘ महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ‘ तेव्हा महाराज एकदम म्हणाले , ‘ तुमच्या बादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं ते ?’मग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.आपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

7 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

8 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago