लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल लोकरे हे प्रचारफेरीत भावुक झाले. मतदारसंघातील एका चाहत्याने बनविलेले रॅप गीत ऐकून लोकरे यांना अश्रू अनावर झाले आणि उपस्थित सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्यासमोरच त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
शिवसेना-भाजप-आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजी नगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविणारे विठ्ठल लोकरे बुधवारी मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीत प्रचार करत होते. यावेळी, जाफर शहा या एका चाहत्याने, लोकरेंना सुखद धक्का दिला. शिवाजी नगर येथे राहणाऱ्या जाफर आणि त्याच्या मित्रांनी, लोकरेंची आजवरची राजकीय कारकीर्द अधोरेखित करणारं एक रॅप गाणं लोकरेंना ऐकवलं. ‘बोलो शिवसेना, ना डरे किसीं के बाप से, बोलो शिवसेना विठ्ठल लोकरे के साथ में’ असे बोल असणाऱ्या या रॅप मध्ये विठ्ठल लोकरे यांनी आपल्या 22 वर्षांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामांचा समावेश आहे. मानखुर्दचा पाणीप्रश्न सोडविला, पहिला सब वे, पहिली बस सेवा अशा अनेक पायाभूत सुविधांचा उल्लेख यात आहे. जाफर आणि त्याच्या मित्रांनी, प्रचार फेरी दरम्यान हे रॅप विठ्ठल लोकरे यांच्यासमोर सादर केलं आणि चाहत्यांचं प्रेम पाहून लोकरे यांना अश्रू अनावर झाले. लोकरेंच्या डोळ्यांतील अश्रू पाहून सारेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी भावनिक झाले.
“रॅप हा गीत प्रकार सध्या खूप लोकप्रिय आहे आणि यातून विठ्ठल लोकरे साहेबांची कामे जनतेसमोर आणावीत या उद्देशाने आम्ही स्वतः हुन हे रॅप बनवलं. हे रॅप ऐकून साहेबांच्या डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे आमच्या रॅप ला त्यांनी मनापासून दिलेली दाद आहे.” अशा शब्दांत जाफर शहा ने आपली प्रतिक्रिया दिली. मानखुर्द-शिवाजी नगर परिसरात सध्या हे रॅप चांगलंच गाजतंय.
गेल्या 22 वर्षांपासून जनतेसाठी केलेल्या कामाची पावती या रॅप गीताच्या निमित्ताने मिळाली. जनतेचं हे प्रेम पाहून गहिवरून आलं आणि आणखी जोमाने लढण्याची प्रेरणा मिळाली.
– विठ्ठल लोकरे, उमेदवार
मानखुर्द- शिवाजी नगर विधानसभा