टॉप न्यूज

Corona : कोरोनाचा पुन्हा उद्रेक, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाउननंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच केरळ आणि राजधानी दिल्लीत कोरोनाची लाट (Corona) आली आहे. राजधानी दिल्ली सध्या कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करत आहे. दिल्लीबरोबरच महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन दिवसांत राज्यातील रुग्णांच्या संख्येतही चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळेच मुंबई पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार वेळीच सावध होऊन पावले टाकताना दिसत आहे.

केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या आधीच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत कोरोना नियंत्रणात आल्यानंतर २८ ऑक्टोबरपासून अचानक स्थिती बदलली आहे. २८ ऑक्टोबर रोजी दिल्लीत दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या ५ हजारावर जाऊन पोहचली. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत असून ११ नोव्हेंबर रोजी ८ हजार ५०० इतकी विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. काल दिवसभरात दिल्लीत तब्बल ७ हजार ५४६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिल्लीतील एकूण रुग्णसंख्या ५ लाख १० हजार ६३० वर पोहचली आहे. आरोग्य विभागाच्या मते काल ६ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण ४ लाख ५९ हजार ३६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. मात्र मागील दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात ५ हजार रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजीही ५ हजार ५३५ रुग्ण एक दिवसात आढळून आले.

महाराष्ट्रात सलग तिस-या दिवशी ५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात सलग तिस-या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांच्या घरांमध्ये होती. आता सलग तिस-या दिवशी महाराष्ट्रात ५ हजार ६४० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ६ हजार ९४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ४ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७८ हजार २७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ५ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ९१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मोदी सरकारलाही चिंता! केंद्राची आरोग्य पथके सज्ज

देशातील दिल्ली, हरयाणा, मणिपूर, गुजरात, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळीच्या दिवसांत देशातल्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली होती. त्यावेळी आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांत देशातल्या काही राज्यांमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर हरयाणा, मणिपूर, गुजरात आणि राजस्थानात केंद्राने आरोग्य पथके पाठवली आहेत. आता आणखी काही राज्यांमध्येही वैद्यकीय पथके पाठवण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असा सल्ला याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. कोरोनाचे रुग्ण जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याआधी आरोग्य यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यादृष्टीने पावले उचला. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभियान राबवा, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत.

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन), हरयाणा आणि राजस्थानातही दिसू लागला आहे. या भागांमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर महाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थिती केंद्रासाठी चिंताजनक ठरत आहे.

मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा थांबवणार!

दिल्लीत कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली जात आहेत. दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून दिल्लीशी तूर्त संपर्क तोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली – मुंबई विमानसेवा आणि रेल्वेसेवा पुढचे काही दिवस बंद ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली-मुंबई विमानसेवा तसेच रेल्वेसेवा बंद ठेवता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसा प्रस्तावही असून तूर्त त्यावर केवळ चर्चा सुरू आहे. यात राज्य सरकारसोबतच रेल्वे, नागरी उड्डाण विभाग यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे, असेही संजयकुमार यांनी स्पष्ट केले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांशी चर्चा करून लवकरच याबाबतचा आदेश जारी केला जाऊ शकतो.

‘या’ राज्यातल्या शाळा बंदच

अनलॉक-6 अंतर्गत सूट मिळाल्यानंतर, अनेक राज्यांत कोरोना गाईडलाईन्स आणि सतर्कतेचा दावा करत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता मुले आणि शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या हरियाणातील प्रकरण चर्चेत आहे. येथे सर्वप्रथम शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता अनेक राज्यांत पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मुंबईने तर, यावर्षी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत बीएमसीने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हरियाणातील तीन जिल्ह्यात 150हून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शैक्षणिक संस्था काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटकात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय टाळण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये शाळा सुरू केल्यानंतर 5 दिवसांतच 6 नोव्हेंबरला 84 शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील पौडी गढवाल जिल्ह्यातील 23 शाळांच्या 80 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गुजरातमध्ये कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता, शाळा उघडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील आदेश मिळेपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शैक्षिणिक संस्था बंद राहतील. मिझोरममध्ये दोन खासगी शाळांतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र शाळा उघडण्याचा धोका लक्षात घेत मिझोरम सरकारने सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे 16 ऑक्टोबरपासून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच!

येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाची साथ संपल्याचा समज करून घेत बेफिकिरपणे वागणा-या मुंबईकरांसाठी मुंबईचे महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोविडमुळं दिल्लीत निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीचं वर्णन करणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करतानाच, ‘स्वत:ला जपा, काळजी घ्या,’ असं कळकळीचं आवाहन चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी असलेल्या शाळा ३१ तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या अंतर्गत येणा-या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यांमधल्या शाळा उघडल्या जाव्यात असे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र त्याचवेळी शाळा उघडण्याचा निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनांनी घ्यावा असंही म्हटलं आहे. आजच ३१ डिसेंबरर्यंत मुंबईतील शाळा उघडणार नसल्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

पंढरपुरात संचारबंदी, कार्तिकी यात्रेलाही माऊलीचं दर्शन नाही, बस सेवाही बंद

कोरोना प्रसाराची भीती असल्याने कार्तिकी यात्रा काळात पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर चार दिवस बस सेवाही बंद राहणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याविषयीची माहिती दिली.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असून, त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होत असल्यानं दशमीपासून म्हणजेच २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांनी दिली.

ज्या भाविकांनी अथवा दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण केले असेल, त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांना व दिंड्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात येणार असल्याचंही झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत जाऊ नये, यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जात असली, तरी कोरोनाचा वाढत धोका बघता शासन व प्रशासनाकडून त्याला परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यात्रा काळात पंढरपुरात असणा-या काही मोजक्या महाराज मंडळींना कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही मूभा देण्याबद्दल सध्या प्रशासनाकडून विचार केला जात आहे.

अमेरिकेत परिस्थिती चिंताजनक

वॉशिंग्टन: अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचे थैमान कायम असून बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी अमेरिकेत एकाच दिवसात दोन हजार कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मे महिन्यानंतर ही आतापर्यंतची सर्वाधिक मृतांची संख्या असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. येणारे काही आठवडे अमेरिकेसाठी अधिक चिंताजनक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशनने जानेवारी महिन्याच्या मध्यापासून दररोज सरासरी २५०० बाधितांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर, १८ डिसेंबरनंतर दररोज २३०० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेत आतापर्यंत २ लाख ५० हजार ५३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, रुग्णांची संख्या १.१५ कोटींहून अधिक आहे. जगभरातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक असल्याचे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. बुधवारी एका दिवसात एक लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळले. तर गुरुवारी अमेरिकेत ८० हजार ६०० कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली, तर सगळ्यांना महागात पडेल – राजेश टोपे

मागील दोन दिवसांत राज्यातील रुग्णांच्या संख्येतही चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली, तर ती सगळ्यांना महागात पडेल. राज्यात लाट येऊ नये असे वाटते, पण मनात भीती आहे, अशा शब्दात राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला सावधगिरी व कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.

केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

कुणीही कोरोनाला गृहित धरू नये. सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुस-या लाटेवर मात करणं शक्य होईल, असंही राजेश टोपे म्हणाले.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

15 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

15 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

16 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

16 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

17 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

19 hours ago