शरद पवारांचा गौप्यस्फोट : आमच्या ‘त्या’ चुकीमुळे मुंबईसह देशात 1992 मध्ये धार्मिक दंगली घडल्या

टीम लय भारी

मुंबई :  सन 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली गेली. त्याचा परिणाम म्हणून मुंबईत धार्मिक दंगली उसळल्या. देशभरातही कलह निर्माण झाला. त्यात अनेक निष्पापांचे बळी गेले. त्यावेळी आमच्याकडून एक चूक झाली होती. ही चूक झाली नसती तर दंगली घडल्या नसत्या असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.

त्यावेळी केंद्रात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. शंकरराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर केंद्र सरकारने चार मंत्र्यांची समिती स्थापन केली होती. डॉ. शंकरराव चव्हाण हे त्या समितीचे सदस्य होते. स्वतः मी, माधवराव सोळंकी आणि अर्जूनसिंग अशा आम्ही चौघेजण त्या समितीमध्ये होतो. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेत होते. तत्कालिन केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर अहवाल दिला होता. त्यामुळे कल्याणसिंग यांचे सरकार बरखास्त करावे अशी सुचना शंकरारव चव्हाण यांनी त्यावेळी केली होती. पण कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केंद्राची आहे. त्यात आपण हस्तक्षेप करायला नको, अशी आम्ही भूमिका घेतली, व शंकरराव चव्हाणांची सुचना मान्य केली नाही. पी. व्ही. नरसिंहराव यांनाही ही सुचना पटली नाही. ही सुचना मान्य केली असती तर उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारच्या हातात आली असती. त्यामुळे बाबरी प्रकरण चिघळले नसते, अन् त्यानंतर धार्मिक दंगलीही घडल्या नसत्या अशा शब्दांत पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील व रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधानभवनात विशेष सोहळ्याचे बुधवारी आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ही माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी या सर्व दिवंगत नेत्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की,  डॉ. शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे आणि उत्तम प्रशासक होते. पाण्याच्या बाबतीत त्यांचा प्रचंड अभ्यास होता. पाण्यासंदर्भात काम केल्याशिवाय लोकांची परिस्थिती सुधारणार नाही ही त्यांची भूमिका होती. राज्यातील सर्व भागांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून वैधानिक विकास महामंडळाच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्वाचे काम केले. उजनी, जायकवाडी, विष्णुपुरी आदी अनेक धरणांच्या कामांची सुरुवात त्यांनी केली. प्राणहिता नदीच्या पाणीवाटपाबाबत आंध्र प्रदेशाबाबतच्या तंट्यामध्ये त्यांनी अत्यंत मुद्देसूद भूमिका मांडली.

यशवंतराव मोहिते यांच्याबद्दल पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पहिल्यांदा त्यांनी मांडला. 1952 मध्ये विधानसभेमध्ये त्यांनी कोयना धरण झाले पाहिजे हा ठराव मांडला. राज्याची वीजेची गरज आणि वीजनिर्मितीनंतर त्याचे पाणी शेतीसाठी मिळेल असे त्यांनी या ठरावाचे समर्थन केले. त्यांच्या दूरदृष्टीचे परिणाम आज पाहायला मिळत आहेत.1960 ते 1978  या कालावधीत गृहनिर्माण, शेती, सहकार आदी विभाग सांभाळताना त्यामध्ये विशेष ठसा उमटवला. मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाची निर्मिती केल्यामुळे मुंबईत सर्वसामान्यांना घरे मिळावीत यासाठी अनेक चाळींची निर्मिती झाली. विदर्भ आणि खानदेशाच्या शेतकऱ्यांना मान मिळवून देणारी कापूस एकाधिकार योजना त्यांनी सुरू केली. तसेच उत्कृष्ट कारखाना उभारून चालविला.

राजाराम बापू पाटील यांच्याविषयी खासदार पवार म्हणाले, लोकांमध्ये प्रत्यक्ष पदयात्रेद्वारे किंवा पायी जाऊन मिसळण्याची त्यांची भूमिका होती. याच तळमळीतून शेतकऱ्यांना जमिनीचे खातेपुस्तक देण्याचे काम त्यांच्या काळात झाले. कोल्हापूर, इस्लामपूरात औद्योगिक वसाहत, सहकारी संस्था उभ्या राहण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात शिक्षणाची चळवळ उभी राहिली.

नागरिकीकरणाबद्दल पुढील काळात जी नीती सरकारने अवलंबली त्याचे जनक डॉ. रफीक झकेरिया होते, असे सांगून पवार म्हणाले, औरंगाबादचे नागरिकीकरण, सुधारणा, औद्योगिकीकरण यात डॉ. झकेरिया यांचे संपूर्ण योगदान राहिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असून औरंगाबाद येथे शिक्षण संस्था सुरू केली.

शिवराज पाटील यांनीही या महनीय व्यक्तींच्या आठवणी जागविल्या. त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांचे पाण्याच्या बाबतीतील काम, यशवंतराव मोहिते यांनी सुरू केलेली कापूस एकाधिकार योजना, डॉ. झकेरिया यांनी औरंगाबादच्या सुधारणेत तसेच औरंगाबाद विमानळाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची माहिती देऊन लोकसंख्या वाढीबाबत त्यांची चिंता तसेच त्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचीही आठवण सांगितली.

प्रास्ताविकात मंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले डॉ. चव्हाण यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. गरिबांच्या प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिले. स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी संघर्ष केला. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी काम केले. रोखठोक भूमिका घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते असे सांगून चव्हाण यांनी राजाराम बापू पाटील, यशवंतराव मोहिते तसेच डॉ. झकेरिया यांच्याबाबतही गौरवोद्गार काढले.

यावेळी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार कुमार केतकर तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी या महान व्यक्तींच्या कार्याचा आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला. कार्यक्रमात या चारही व्यक्तींच्या कार्याचा आढावा असलेल्या संस्मरण पुष्पांजली या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे ‘या कारणा’साठी केले कौतुक

VIDEO : शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी जेवण केलेल्या ‘त्या’ झोपडीचे भाग्य उजळले

…अन् शरद पवारांना पोलिसांनी पाठीवर वळ उठेपर्यंत मारले

मी कुठेच म्हणालो नाही मला ‘जाणता राजा’ म्हणा : शरद पवार

शरद पवारांच्या गनिमी काव्याने ‘शेतकरी कर्जमाफी’, आक्रस्ताळ्या भाजपची मात्र फजिती

तुषार खरात

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

28 mins ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

3 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

4 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago