एका अधिकाऱ्याचे मनोगत

बिपीन जगताप

आज मला भुतकाळात गेलेल्या गोड महाविद्यालयीन दिवसांची सहज आठवण आली. हे दिवस आपल्याला सांगताना कदाचित ही माझी आत्मस्तुतीही वाटू शकते. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो, जर मागील वर्षात समाजहिताचे काही काम झाले असेल तर ते ज्यांच्या सानिध्यात आलो त्या महनिय व्यक्तीमत्वांच्या प्रेरणेने आणि सोबत असलेल्या प्रेमळ सहकार्यांमुळेच…. !

सगळं लहानपण गावात गेले. कांबळेश्वर ता. बारामती हे माझ गाव. जुने वाडे, वेडी वाकडी वळण घेत जाणारी नदी. शिखर असणारे मंदीर. चिंचा – बोरांची झाडे. बारमाही बागायती असलेले हे गाव कमालीचं सुंदर आहे. मी अगदी शालेय जिवनापासून सामाजिक कार्यात सहभागी होतो आणि आजही आहे. माणसांविषयीच्या उत्कट प्रेमामुळेच मला समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आणि उर्जा मिळते. मुळातच माणूस हा समाजशिल प्राणी आहे. माणसांच्या समुहातच तो लहानाचा मोठा होतो. समाजामुळेच तो बोलायला, चालायला शिकतो. म्हणूनच माणसाचा सर्वांगीण विकास या समाजामुळेच होतो.

मला समाजाविषयी नेहमीच आस्था व प्रेम वाटते. माणसांचा समाज द्वेषमुक्त असावा. तो प्रेमाने, आनंदाने रहावा हीच माझी धारणा आहे आणि ती कायम राहील.

अगदी कळत्या वयापासून मी आयुष्यभर व्यसनमुक्त राहीन व समाजदेखील व्यसनमुक्त करेन अशी शपथ घेतली. व्यसनमुक्त संघटनेच्या माध्यमातून व जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने हे व्रत आजही तसेच सुरु आहे.

काँलेजमध्ये असताना हजारो तरुणांना एकत्रित करुन ‘व्यसनमुक्त परिषदेचे’ आयोजन केले होते. त्यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रणेते डाँ. नरेंद्र दाभोळकर या कार्यक्रमास उपस्थित होते. नंतर दाभोळकरांनी या कार्यक्रमाचे कौतुक करणारे पत्रही मला आठवणीने पाठीवले होते. जे आजही माझ्या संग्रही आहे.

या काळात खुप मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीचे मेळावे घेतले. एका मेळाव्याला तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे हे देखील उपस्थित होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले, व्याख्याते आणि प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या व्याख्यांनानी जिवनात खुप बदल केले. या दरम्यान ग्राम स्वच्छतेला महत्व देत आपलं गाव निर्मल करणाऱ्या सौ. सुनेत्रा अजित पवार (वहिणी) यांनीही मला राज्यातील अनेक स्वच्छ निर्मल झालेल्या गावात पाठवले. तालूक्यात काम करण्याची संधी दिली आणि आजही त्या मला सामाजिक कामासाठी नेहमीच प्रोत्साहीत करतात.

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी अनेकदा आम्ही  रँली काढल्या. मोर्चे काढले. परमिट रुम, बिअर बार महिलांच्या मतदानातून बंदही केले. व्यसनमुक्त संघटनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास सर्व किल्ल्यांवर दहा दहा दिवस राहिलो. किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली. अनेक ठिकाणी जाऊन हजारो व्याख्याने दिली. जागतिक किर्तीचे सामाजिक कार्यकर्ते, स्वदेशीचे प्रणेते राजीवभाई दिक्षीत यांचे सानिध्य मिळाले. यावेळी राजीवाभाई माझ्या घरीही मुक्कामाला थांबले. ही खुप संस्मरणीय आणि आनंददायी आठवण आहे. अशा अनेक थोरा मोठ्यांचा परिसस्पर्श माझ्यासारख्या साध्या माणसाला झाला. हिवरे गावचे आदर्श सरपंच पोपटराव पवार ,व्याख्याते इंद्रजित देशमुख यांच्या समवेत अगदी विदर्भात यवतमाळपर्यत फिरलो. पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासमवेत काम केले.

पर्यावरण, ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, समताधिष्टीत समाजनिर्मितीचा ध्यास घेत मी किमान वीस वर्षापुर्वी एका पथनाट्याची निर्मीती केली. ज्या पथनाट्याने महाराष्ट्रात हजारो प्रयोग केले. खूप पारितोषिके मिळवली. त्याच पथनाट्यातील कलाकार रामदास जगताप, भरत शिंदे, सुभाष मदने हे आता ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ ही वेब सिरीज करतात. ज्याला लाखो लोक पाहतात. आजही समाज प्रबोधनाची अशी पथनाट्ये हे तरुण गावोगावी करतात. पण केवळ प्रबोधन – व्याख्यान करतानाच प्रत्यक्ष कृतीही व्हावी, यासाठी आम्हा तरुणांची टिम गावातील गटारे स्वच्छ करायची. आठवड्यातील एक दिवस आम्ही संपुर्ण ग्रामस्वच्छतेला घालवायचो. याचा फायदा म्हणजे मागील चार वर्षापुर्वी महाबळेश्वर येथे मधमाशापालन संस्थेला संचालक असतानाही आम्ही परिसर स्वच्छता करायचो. शासकीय कर्मचाऱ्यांनाही आपण तयार केलेला कचरा उचलण्याची सवय लागावी एवढाच त्यामागचा उद्देश होता.

गावातील तरुणांना एकत्रीत करुन वाचनालय सुरु केले होते. रोजगार तयार करणारी संस्थाही काढली होती. या माध्यमातून आम्ही ग्रामोद्योग देखील करायचो. विविध ओषधी वनस्पतींच्या पावडरी, साबण, शेतीला लागणारी सेंद्रिय खते, औषधे आम्ही बनवत असू.

एवढ्यावरच न थांबता अगदी आळंबी (मशरुम) लागवड देखील आम्ही करुन पाहीली (पण अगदी गुंतवलेले भांडवल देखील निघले नाही). अशा अनेक उद्योगात आम्ही सपशेल फेल ठरलो. पण प्रयोग सुरुच होते. तरुणांनी रोजगारक्षम व्हावे यासाठीचा हा प्रयत्न होता.

कॉलेजमध्ये असताना ‘सकाळ’ वृतपत्रात चार वर्ष पत्रकारीतेचा अनुभव घेतला. सकारात्मक बातम्या लिहिताना सहज सरळ लिहण्याचा छंद लागला, जो अजूनही चालूच आहे. ‘साद’ हा माझा कवीता संग्रह सोलापुरला प्रकाशित केला. ग्रामीण भागातील विविध विषयांवर केलेल्या कविता या संग्रहात आहेत.

मागील दहा वर्षांपासून मी शासकीय नोकरीत आहे. नोकरीत लागल्यानंतर लक्षात आले, ग्रामीण भागात रोजगारासाठी खुप काम करणे आवश्यक आहे. बेरोजगारांना योग्य ते मार्गदर्शनाने केल्याने, त्यांना शासकीय माध्यमातून अर्थसहाय्य झाल्याने अनेक यशस्वी उद्योजक राज्यात तयार झाले आणि होतीलही. शासकीय कामासाठी हेलपाटे मारायला न लावता आणि भ्रष्टाचारमुक्त काम केले की लोकांना शासानाबद्दल आत्मियता निर्माण होते. हे मी  जवळून पाहत आहे. शासनाच्या माध्यमातून खूप अधिकारी – कर्मचारी प्रामाणिक व चांगले काम करतात. हे देखील लक्षात आले. चंद्रपुरला असताना अतिशय दुर्लक्षित दुर्गम भागात जायाचो. लोकांना भेटायचो. जमेल तशी मदतही करायचो. हे आत्मिक समाधानाचे दिवस होते.

महाबळेश्वरला मध संचालनालयाला संचालक म्हणून २०१२ मध्ये रुजू झालो. शेतकऱ्यांना खूप फायदेशीर असणारा मधमाशापालन हा व्यवसाय वाढविण्यासाठी महत्प्रयत्न केले. अनेक लोकांपर्यत हा विषय पोहचावा म्हणून आजही जनजागृती प्रचार प्रसिद्धी करत असतो.

या कार्यालयात असताना वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना मधाचा खरेदी दर वाढवता आला. सेंद्रिय मधनिर्मीती प्रकल्प राबवला. शासनाची 50 टक्के अनुदानाची मध केंद्र योजनाही आता राज्यात सुरु झाली आहे.

हे सगळं काम माझ्यासारखा एकटा माणूस करुच शकत नाही वेळोवेळी वरीष्ठांनी दाखवलेला विश्वास व सोबतच्या सहकार्यांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य होते.

खरतर हे आम्हा सगळ्यांचे हे टीमवर्क आहे. म्हणूनच या सगळ्या कामांचा हिशोब देऊन मी खुप काम केलयं असं मला कणभरही वाटत नाही. हा तर केवळ कर्तव्याचाच भाग. पण आता नोकरीमुळे हे सुंदर जीवन जगता येत नाही. गड किल्ले चढता येत नाहीत. पहिल्यासारखा वेळ देता येत नाही. गावात जाऊन प्रत्यक्ष काम करता येत नाही याची मनाला सतत खंत वाटते.

नुकतेच मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरुंनी ‘ग्रामिण विकास’ या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली याबद्दल मी त्यांचा मन:पुर्वक आभारी आहे. ग्रामीण विकास या विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील सर यांचेही आभार. या माध्यमातून ग्रामीण विकासात अजून चांगले काम करता येईल. महाविद्यालयीन तरुणांना ग्रामविकासाची दिशा समजली, तर महात्मा गांधीजींनी पाहिलेल्या ग्रामस्वराज्याची संकल्पना दृढ होण्यास मदत होईल असा मला विश्वास वाटतो.

दोन दिवसांपुर्वी ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ही बातमी दिल्यानंतर अनेकांकडून शुभेच्छांचा झालेला वर्षाव मला अचंबीत करणारा होता. आपल्या या सदिच्छा व प्रेरणा मला नव्या कामाच्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.

आपले प्रेम मला कायमच नवे बळ देते. आपल्या या शुभेच्छांबद्दल मी मनपुर्वक आभार व्यक्त करतो…!

हे सुद्धा वाचा

राज्य सरकारच्या ‘अभ्यासू’ अधिकाऱ्याला मुंबई विद्यापीठात सन्मानाचे स्थान

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

आश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुषार खरात

View Comments

  • जगताप साहेबांचा मोबाईल क्रमांक पाठवा

    • तुमचा नंबर द्या. त्यावर जगताप साहेबांचा नंबर एसएमएस करतो

Recent Posts

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

13 mins ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

32 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

42 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

1 hour ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago