संपादकीय

निखिल वागळे आणि बरचं काही…..!

निखिल वागळे महाराष्ट्रातील प्रमुख संपादक आहेत. वाद आणि वादग्रस्त भुमिका हे वागळे आणि महाराष्ट्रासाठी नवीन नाही. आता निमित्त ठरले आहेत युवा आंबेडकरी नेते सुजात आंबेडकर. खर तर सरांनी सुजातच्या टिकेला एवढे मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. वागळे यांना प्रत्यक्ष ओळखणारे आणि त्यांच्याविषयी फारशी माहिती नसणारे वागळे यांच्यावत तोंडसुख घेत आहेत. जमेची बाब ही आहे की, वागळे यांना समर्थन देणारेही कमी नाहीत. निखिल वागळे यांच्या सोबत मी सलग १२ वर्ष काम केले आहे. त्यामुळे इतरांपेक्षा मी त्यांच्याबाबत जास्त अधिकाराने बोलू शकेल.

कोणत्याही विषयावर ठोस भुमिका घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्याचे परिणाम भोगायला ते तयार असतात. सुजातच्या निमित्ताने सुरु असलेली चर्चा खरे तर या पातळीवर येण्याची गरज नव्हती. सुजातच्या पिढीच्या जन्माआधी वागळे यांनी सामाजिक, राजकिय कार्य सुरु केले होते. शिक्षण अर्ध्यावर सोडून आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश आंदोलनात भाग घेण्यासाठी घर सोडले होते. कमी वयात संपादक झालेले ते मराठीतील एकमेव पत्रकार आहेत. हस्तीदंती मनो-यात बसुन वागळे यांनी कधी पत्रकारिता केली नाही. ते नेहमीच मैदानात उतरले. सुजात आणि सुजातच्या पिढीला माहित असण्याचे काही कारण नाही की, १९९० च्या दशकात मुंबई आणि महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष, वर्गाच्या विरोधात पत्रकारिता करणे किती अवघड होते. रुईया कॉलेज नाक्यावर वागळेंवर संघाच्या गुंडानी प्राणघातक हल्ला केला होता. शिवसेनेच्या हल्ल्याच्या खूप आधी घडलेली ही घटना आहे.

वागळेंच्या एकूणच पत्रकारितेतील योगदानाबद्दल वाद असण्याची काहीच गरज नाही. मराठीच नव्हे तर, भारतीय पत्रकारितेचा इतिहास ‘दैनिक महानगर’ची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे वागळेंच्या व्यवसायिक स्पर्धकांनाही मान्य करावे लागेल. आज वागळेंची जात आणि धर्म शोधणारे हे विसरत आहेत की, निखिल वागळे कायम आंबेडकरी चळवळी सोबत राहिले आहेत. दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांना महानगरने जे स्थान दिले ते क्वचितच इतरांनी दिले असेल. २५ वर्षांपूर्वी घडलेले घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड कोण विसरु शकेल? हे हत्याकांड घडवणारा मनोहर कदम दोषी ठरला. यात आंबेडकरी कार्यकर्त्यांची जशी मेहनत आहे, तसेच वागळेंचे योगदानही मोठे आहे.

या हत्याकांडला वागळेंनी फक्त प्रसिद्धीच दिली नाही, तर या हत्याकांडची चौकशी करणार्‍या गुंडेवार आयोगापुढे मला साक्ष देण्याची त्यांनी परवानगी दिली आणि पाठबळही दिले. (माझी साक्ष या आयोगाने ग्राह्य धरली आहे.) २३ सप्टेंबर १९९७ रोजीच्या महानगरमध्ये मी लिहिलेल्या “टाँकर (Tankar) स्टोरीचा पर्दाफाश” या लेखामुळे गोळीबार करणे अनावश्यक होते हे सिध्द झाले. या स्टोरीसाठी वागळें सरांनी मला पूर्ण वेळच नव्हे तर पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. अशा कित्येक घटना सांगता येतील. मुंबईतील गिरणी कामगार असो की कष्टकरी वर्गाचे कोणतेही आंदोलन महानगर आणि निखिल वागळे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. राजस्थान मधील भँवरीदेवी या दलित महिलेच्या सामुहिक बलात्कार प्रकरणात निखील वागळेंनी घेतलेल्या ठोस भुमिकेमुळे त्यांच्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला दाखल झाला होता!

६ डिसेंबर १९९३ रोजी बाबरी मशिद उध्वस्त केल्यानंतरच्या दंगलीचे वार्तांकन प्रमुख वर्तमानपत्रे कशी करत होती, हे आज कोणाला आठवत नसेल, पण माझ्यासारख्या पत्रकारानी ही भयानक दंगल अनुभवलेली आहे. (७ डिसेंबर च्या महानगर च्या अंकात अग्रलेखाची जागा काळ्या शाईने रंगवली होती. तेव्हा ‘तुझा बाप मेलाय का?’ असे फोन करुन हिंदुत्ववादी वागळेंना धमकावत असतं) महानगरने अशी कठोर भुमिका घेतली असताना ‘लोकसत्ता’, ‘मटा’ काय करत होते ? “बाबरी पाडण्याचा शुभारंभ” असा लोकसत्ताचा प्रमुख मथळा होता. बेहरामपाड्यात किती मुडदे सापडले याच्या अतिरंजित बातम्या ‘मटा’ छापत होता तर ‘नवाकाळ’ने कहरच केला होता. नवाकाळच्या स्ंपादकांना या प्रकरणी अटक झाली होती.

या काळात फक्त निखिल वागळे आणि महानगरने धर्मनिरपेक्ष विचाराची पाठराखण केली. निखिल वागळे स्वतः बेहरामपाड्यात गेले आणि त्यांनी ‘बेहरामपाड्याचं सत्य’ अशी मालिका लिहून धर्मांध लोकांचा डाव हाणुन पाडला होता. हे करण्यासाठी फक्त धाडस असून चालत नाही, तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेवर विश्वास आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी लागते. वागळे यासाठी नेहमीच तयार असतात. अनेक प्रसंगात राज्यातील प्रमुख संपादक गांडीत शेपूट घालुन बसले होते, तेव्हा वागळे आणि त्यांचे सहकारीनिधड्या छातीने लढत होते.

युती सरकारच्या काळात दादरच्या रमेश किणीची हत्या केल्याचा आरोप राज ठाकरेंवर होता. ही बातमी माझ्याकडे आणि गिरिश कुबेरांकडेच होती. कुबेर त्यावेळी ‘मटा’त होते. ही बातमी फक्त एक दिवस थांबवावी अशी संबधितांची विनंती होती. एका मध्यमवर्गीय व्यक्तीची तुम्ही हत्या करायची आणि मी तुमची विनंती मान्य करावी, असे विचारण्याची हिंमत कशी झाली, असे वागळेंनी स्ंबधितांना सुनावले होते. ( अशा काही घटना, प्रसंगात वागळेंनी तडजोड केली असती तर आज दादरला त्यांचा सोन्याचा बंगला राहिला असता..!)

महानगरने कधीही रिपब्लिकन पक्ष किंवा कोणत्याही चळवळीचे नुकसान करणारी भूमिका कधी घेतली नाही.( रिड्ल्स प्रकरणान्ंतर झालेले रिपब्लिकन एक्य दिवंगत बबन कांबळेला पुढे करुन नवाकाळने फोडण्यात कळीची भूमिका पार पाडली होती.) वागळेंनी नेत्यांवर मात्र अनेकदा प्रखर टिका केली आहे आणि त्याचवेळी नेत्यांना चांगल्या कामासाठी पाठिंबा दिलेला आहे. महानगरची अनेकदा आर्थिक स्थिती बरी नव्हती. पण वागळेंनी कधीही अंधश्रध्दा वाढविणा-या जाहिराती छापल्या नाहीत. अनेक वर्तमानपत्रांचे त्याकाळात ( म्हणजे गोदी मेडियाचे स्वरूप येण्याच्या आधीच्या काळात ) अशा जाहिराती हे प्रमुख उत्पन्न होते.

हे सुद्धा वाचा
शिस्तप्रिय चव्हाण, उमदे देशमुख आणि लढवय्ये मुंडे ( ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन यांचा विशेष लेख)

नरेंद्र मोदींचा २०२४ मध्ये पराभव अटळ (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष लेख)

राजधानीतले मराठी नेतृत्व (ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचा लेख)

वागळे आपल्या कर्मचा-यांना फैलावर घेत असत.  त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा किंवा तुसडेपणे वागण्याचा भाग असेल, त्यामुळे त्यांचे अनेक सहकारी दुखावले गेले, सोडून गेले पण आपल्या वार्ताहरांची पाठराखण करणारा संपादक मराठीत दुसरा नाही. ( वागळे, अरुण टिकेकर, कुमार केतकर, विजय कुवळेकर, मधुकर भावे, दिनकर रायकर अशा प्रमुख संपादकाच्या हाताखाली मी काम केले आहे.) अनेकदा आपला वार्ताहर चूक असेल तरी वागळेंनी त्याला वा-यावर सोडले नाही. यासाठी त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांची नाराजी सहन केली.

ज्या काळात मागासवर्गीय, बहुजन तरुणांना प्रसारमाध्यमात काहीच संधी नव्हती. प्रमुख संपादक आपल्या जातीच्या आणि ब्राम्हणांशिवाय इतरांचा विचारच करायचे नाहीत. माधव गडकरीने सिकेपी, कुमार केतकर यांनी चित्पावन आणि गोविंद तळवळकर यांनी आपल्या जातीच्या पलिकडे कधी बघितले नाही. या प्रमुख संपादकांनी बहुजन तरुणांना पत्रकार होण्याची संधी दिली नाही. दलित तरुणांचा तर यांना विटाळ होईल अशी परिस्थिती मराठी प्रसार माध्यमात होती. ( पत्रकार मणीमाला आणि योगेंद्र यादव यांचा या संदर्भात एक पाहणी अहवाल प्रसिद्ध आहे.) मराठी वर्तमान क्षेत्रातील ही स्थिती बदलण्याच मोठं काम निखिल वागळे या माणसाने केलं.

आज प्रमुख माध्यमात जे दलित, बहुजन पत्रकार अनेक हुद्यावर काम करत आहेत, त्यांना निखिल वागळे यांनी संधी दिलेली आहे. यात वरच्या जातीचेही कित्येकजण आहेत. प्रसार माध्यमातील ही क्रांती करण्याचे श्रेय फक्त निखिल वागळे यांचचं आहे. वागळेंना त्यांच्या जातीची आठवण करुन देणारे हा इतिहास विसरले ? अलिकडच्या काळात आंबेडकरी चळवळीत भक्त संप्रदायाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनुयायी कमी होत आहेत. त्यामुळे आपल्या नेत्यावर कोणी टिका केली की हा भक्त संप्रदाय चवताळून उठतो. पुर्वी अशी स्थिती नव्हती.

मी अनेकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टिका केलेली आहे. जाहीर वाद घातलेला आहे. पण बाळासाहेबांनी कधीच बोलणे थांबवले नाही किंवा त्यांच्या पदाधिकारी असलेल्यांनी माझा व्देष केला नाही. एकदा तर भारिपचे नेते सुदास जाधव यांनी माझ्या एका बातमीचा जाब विचारण्यासाठी महानगरवर मोर्चा आणला होता. निषेधार्थ घोषणा देत कार्यकर्ते कार्यालयात आले. मीच सुदास जाधव यांना सामोरा गेलो आणि त्यांचे निवेदन, खुलासा स्विकारला. दुस-या दिवशी मी खारला त्यांना भेटायला गेलो. माझ्या बातमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली पण नेहमीप्रमाणेच माझे स्वागत केले. आता असे चित्र दिसेल ? काही दिवसांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी मला महानगरसाठी सविस्तर मुलखतही दिली. ( एकदा, मी लोकसत्तेत असताना ईन्दू मिल मधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विषयावर एका वाहिनीवर चर्चेत माझा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वाद झाला. तेव्हा मी काही शब्द त्यांच्याविषयी वापरले. माझगाव विक्रीकर खात्यात त्यांचे सरोदे नावाचे एके अधिकारी होते. त्यांनी मला फोन करुन बाळासाहेबांविषयी अपशब्द वापरणे तुम्हाला शोभत नाही असे सुनावले. महाराष्ट्रातील अनेकांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. तेव्हा मी त्याच आठवड्यात भारिपच्या कार्यालयात बाळासाहेब आंबेडकर यांना भेटलो तर बाळासाहेब नेहमी प्रमाणेच माझ्यासोबत गप्पा मारायला लागले. मी त्यावेळी त्यांच्याकडे दिलगिरीही व्यक्त केली.

रामदास आठवले यांच्या विरोधात मराठीत मी केली तेवढी टिका कोणीच केली नसेल. छोटा राजनच्या भावाला पक्षात प्रवेश दिला तेव्हा खूप जहरी शब्दात मी आठवलेंवर टिका केली होती. अनेकदा त्यांच्या भूमिकेचा विरोध केला. पण आठवले साहेबांनी कधी मनात फार काळ राग धरला नाही. (बंधुराजला काही कळत नाही असे ते गोतम सोनावणे किवा अविनाश महातेकरांकडे बोलतात आणि विषय संपला.) त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेलो तरी ते करतात. घरच्यांची विचारपुस करतात. मुंबईच्या बाहेर कुठे भेट झाली तर ब्ंधुराजच्या जेवणाचे बघा असे एखाद्या पदाधिका-याला सांगतात. माझा कितीही लाड केला तरी त्यांच्या राजकीय भुमिकेचा मी विरोधक आहे, याची जाणीव असूनही ते कधी अपमान करत नाहीत. मात्र अलिकडे भक्त भलतीकडेच भरकट आहेत. हे चिंताजनक चित्र आहे. वागळेंची जात काढण्याच्या निमित्ताने हे लिहिण्याची वेळ आली. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात वागळे किवा त्यांचे कुटूंबिय जात पाळत नाहीत. अशा फालतू गोष्टीच्या कितीतरी पुढे ते गेले आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्यात वागळे कोणतेच कर्मकांड करत नाहीत आणि आपण मात्र अजुनही जुन्याच मापाने व्यवहार करत आहोत. अलिकडे तर कोणत्याही विषयावर बाबासाहेब आंबेडकर यांना कोट करणे सुरु आहे.

बाबासाहेब आपल्या आयुष्यात जे कधी बोललेच नाहीत, अशी वाक्ये बाबासाहेबांची म्हणून खपवण्याची अतिशय वाईट सवय आपल्याला लागलेली आहे. वागळेंवर टिका करताना काही लोकांनी असेच चूकिची, असत्य वाक्ये वापरली आहेत. निखिल वागळे यांच्या स्वभावाबाबत बरीच चर्चा होत असते. पण मला वाटत की प्रत्येकाला आपलं आयुष्य आपापल्या पध्दतीने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून कोणाच्या स्वभावाचे मोजमाप न काढता त्यांच्या राजकिय भूमिका काय आहेत हेच महत्वाचे आहे. वागळे कठोरपणे संघाच्या आणि भाजपच्या विरोधात आहेत. कितीही संकट आलं तरी वागळेंची भुमिका पातळ होणार नाही, याची मला आणि त्यांना जवळून ओळखणा-यांना खात्री आहे. संपादक म्हणून तत्कालिक विषयांवर भूमिका त्यांनी घेतल्या असतील पण ते काही अंतिम सत्य नाही आणि परिवर्तनावर आपला विश्वास असला पाहिजे.

सध्याचा काळ खूप कठिण, भयावह आहे. हा काळ सर्वच बाबतीत आणि सर्व अर्थाने कठिण आहे. ९० च्या दशकात नक्षलवादी नेते विनोद मिश्रा यांनी आयपीएफ ( इंडियन पिपल्स फ्र्ंट्) ही एक स्ंकल्पना मांडली होती. फॉसिझम डोक्यावर आहे तेव्हा सर्व मतभेद विसरुन सर्व पक्ष, स्ंघटनांनी एकत्र आलं पाहिजे अशी आयपीएफ् ची भुमिका होती. तेव्हा सध्या तरी फॉसिझम त्याच्या सर्वाच्च पातळीवर नाही अस्ं इतर् काही पक्ष / स्ंघटना नेत्यांचे मत होते. ,खास करुन नक्षलवादी पक्षांनी मिश्रा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. पण आता फॉसिझम त्याच्या सर्वाच्च पातळीवर आहे, असं अनेक मान्यवरांचे मत आहे. भारतीय फॉसिझमचे स्वरुप युरोपीय फॉसिझम पेक्षा थोडे वेगळे असेल. भारतीय फॉसिझम ब्राम्हणी आहे. त्याचा मुकाबला छ्त्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, आंबेडकर परंपरा आणि विचारधाराच करु शकते, असे माझे एक कार्यकर्ता म्हणून निरिक्षण आहे. विचारवंत, नेते यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

सध्याच्या काळात सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटना, नेते, विचारवंत, कार्यकर्ते यांनी समान शत्रूचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज कधी नव्हे तेवढी आता आहे. महानायकचे संपादक सुनील खोब्रागडे यांनी या संदर्भात काही मांडणी केली आहे. वेगवेगळ्या पातळींवर अस्वस्थता आहे आणि लोक प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत वागळे किवा वागळेंसारख्यांची जात, धर्म हा चर्चेचा विषय होऊ नये.

वागळे सर माझे बॉस, संपादक होते. त्याला आता दोन दशके झाली. पण तेव्हा आणि आताही त्यांच्या सर्वच भूमिका मला मान्य होत्या असे नाही. कोणालाही सर्वच काही मान्य असण्याचा आग्रहच मुळात चूकिचा आहे. वागळेंची जात, धर्म काढणा-यांनी याचा गांभीर्याने विचार करावा म्हणून हे चार शब्द…!!

बंधुराज लोणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

 

टीम लय भारी

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

19 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

19 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

20 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

21 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

22 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

23 hours ago