25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeसंपादकीयराजधानीतले मराठी नेतृत्व (ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचा लेख)

राजधानीतले मराठी नेतृत्व (ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचा लेख)

'लय भारी'च्या दिवाळी विशेषांकामध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'चे माजी निवासी संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

राष्ट्रीय राजकारणात मराठी माणसांची ताकद आणि वजन मर्यादितच राहिले आहे. यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पदाची संधी असताना त्यांनी ती घालवली आणि शरद पवार यांची योग्यता असतानाही त्यांना ती मिळू शकली नाही. अलीकडच्या काळात नितीन गडकरी यांच्याकडे आशेने पाहिले जाते आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत गडकरी यांचे पक्षांतर्गत राजकारणात ज्या रीतीने पंख कापण्यात आले आहेत, त्यावरून राष्ट्रीय राजकारणातल्या त्यांच्या उत्कर्षालाही ब्रेक लावण्यात येत असल्याचे दिसते.

दिल्ली किंवा देशाचे राजकारण आणि महाराष्ट्र यांचा विचार करताना अशी काही मोजकीच नावे आपल्यासमोर येतात आणि मराठी अस्मितेच्या चर्चा त्यांच्याभोवती फिरत राहतात. मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष झाले होते आणि त्याआधी शिवराज पाटील-चाकूरकर यांनीही लोकसभेचे अध्यक्षपद सांभाळले होते. राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने मराठी महिला विराजमान झाली होती; तोही प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावा असा प्रसंग होता. शंकरराव चव्हाण यांनी गृह, अर्थ, परराष्ट्र अशी वजनदार खाती सांभाळली. सुशीलकुमार शिंदे यांनीही गृहमंत्री, ऊर्जामंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात असताना सीनियर नेत्यांमध्ये त्यांचा सहभाग नव्हता. परंतु, गांधी कुटुंबीयांचे आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विश्वासू म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती आणि संघटनात्मक पातळीवरही महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

दिल्लीच्या राजकारणातील ही काही ठळक नावे; जी आधी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत होती. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर त्यांना दिल्लीचे आवतण आले होते आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीही उत्तमपणे पार पाडली. शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. विलासराव देशमुख यांनाही मुख्यमंत्री पदानंतर केंद्रात संधी मिळाली; परंतु दुर्दैवाने त्यांना पुरेसा कालावधी मिळाला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रवास उलटा राहिला. त्यांनी आधी दिल्लीत ओळख निर्माण केली आणि तिथली पुण्याई घेऊन ते महाराष्ट्रात आले होते.

जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या नानाजी देशमुख यांनीही राष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती. राजकारणापलीकडे विविध पक्षांतील नेत्यांशी त्यांचे संबंध होते. नंतरच्या काळात त्यांनी राजकारणाला राम राम ठोकून समाजकार्याला वाहून घेतले; परंतु एकेकाळी नानाजी देशमुख हे दिल्लीच्या राजकारणातले बडे प्रस्थ होते.
अलीकडच्या काळातील दिल्लीच्या राजकारणावर नजर टाकताना ठळकपणे समोर येणारी ही काही नावे. परंतु, दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. स्वातंत्र्योत्तर काळात अगदी प्रारंभापासून मराठी माणसांनी दिल्लीच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. आपल्या बुद्धिमत्ता व कर्तृत्वाच्या जोरावर आपली ओळख आणि स्थान निर्माण केले. त्यात प्रामुख्याने नावे घ्यावी लागतील, ती चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख, बॅरिस्टर नाथ पै, मधू लिमये व मधू दंडवते यांची. सी. डी. देशमुख बुद्धिमत्तेच्या जोरावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आणि पुढे केंद्रीय अर्थमंत्री झाले.
एकादा पंडित जवाहरलाल नेहरू आणि सी. डी. देशमुख सोबत होते. समोर ब्रिटिश उच्चायुक्त होते. त्यावेळी पंडित नेहरू यांनी, ‘India’s most charming minister’ अशा शब्दांत सी. डी. देशमुख यांची ओळख करून दिली. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ऐन भरात असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ सी. डी. देशमुख यांनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी, “चिंतामण महाराष्ट्राचा ‘कंठमणी’ झाला” अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून सी. डी. देशमुख नाराज झाले होते. मुंबई शहराला स्वतंत्र दर्जा देण्याची कल्पना त्यांना पटली नाही. तसेच, मुंबईमध्ये सरकारने केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्यास नकार देणे हे लोकशाहीच्या विरोधातील कृत्य आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

सी. डी. देशमुखांची प्रशासकीय कारकीर्द २१ वर्षांची होती. मध्य प्रांतात त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदे भूषवली होती आणि या पदांवर काम करणारे ते सर्वांत तरुण आयसीएस होते. या कार्यकाळात १९३१ साली महात्मा गांधीजींनी सहभाग घेतलेल्या लंडनमधील गोलमेज परिषदेचे सचिव या नात्याने सी. डी. देशमुख यांनी काम केले होते. १९३९ मध्ये त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. नंतर अवघ्या तीनच महिन्यांत त्यांची बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९४१ साली ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले. १९४३ मध्ये जेम्स टेलर यांचे निधन झाले. सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेत प्रवेश केला, तेव्हा जेम्स टेलर गव्हर्नर होते. जेम्स टेलर यांच्या निधनानंतर रिझर्व्ह बँकेला पहिला भारतीय गव्हर्नर लाभला, तो सी. डी. देशमुख यांच्या रुपाने. ११ ऑगस्ट १९४३ रोजी सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना भारताच्या व्हॉईसरॉयमार्फत ‘नाईटहूड’ बहुमान देण्यात आला.
Vijay Chormare's article on Marathi leadership in Delhi

सी. डी. देशमुख यांनी १९५२ साली कुलाबा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. शेकापतर्फे भाऊसाहेब राऊत यांचा त्यांनी पराभव केला होता. या निवडणुकीपूर्वीच नेहरूंनी सी. डी. देशमुख यांना मंत्रिमंडळात घेऊन अर्थमंत्रिपदी नियुक्त केले होते. मात्र, मंत्रिमंडळात सर्व लोकनियुक्त मंत्री असावेत, असा नेहरूंचा आग्रह होता आणि त्यासाठी त्यांनी सी. डी. देशमुख यांना निवडणूक लढवण्यास सांगितले. सी. डी. देशमुख हे काँग्रेसचे सदस्य नव्हते. स्वतंत्रपणे लढण्यास ते इच्छुक होते. मात्र, तसे झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते उघडपणे समर्थन करण्याची शक्यता नसल्याचे नेहरूंनी सांगितले. परंतु, तरीही ते ठाम राहिले, लढले आणि जिंकले. काँग्रेसपुरस्कृत उमेदवार असा प्रचार झाल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला. स्वतंत्र लढण्याचा त्यांना भविष्यात झालेला फायदा म्हणजे जेव्हा अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली, तेव्हा पंतप्रधानांव्यतिरिक्त कुणालाही स्पष्टीकरण देण्याचे बंधन त्यांच्यावर नव्हते.

बॅरिस्टर नाथ पै हे उत्तम संसदपटू होते. संसदेत विविध आयुधांचा वापर कसा करायचा आणि सत्ताधाऱ्यांना कसे जेरीस आणायचे, याचे नाथ पै यांच्याइतके आकलन असलेले मोजकेच संसदपटू झाले. ते उत्तम वक्ते होते. समाजवादी विचारसरणीच्या नाथ पै यांनी कोकणातील राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ व १९६७ अशी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. १९७१ मध्ये निवडणुकीच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रा. मधू दंडवते यांनी राजापूरमधून निवडणूक लढवली. मधू दंडवते यांनीही दिल्लीच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती. उत्तम वक्ते व संसदपटू म्हणून त्यांनी नाथ पै यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. कोकण रेल्वेची मूळ कल्पना नाथ पै यांची म्हणून ओळखली जाते; दंडवते यांनी त्या कल्पनेला चालना दिली. देशाच्या राजकारणात उत्तम संसदपटूंची चर्चा केली जाते, तेव्हा आजही बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते.
हे सुद्धा वाचा :

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक

मधू लिमये म्हणजे संसदीय राजकारणातले आणखी एक प्रभावी नाव. मूळचे महाराष्ट्रीयन असलेले मधू लिमये बिहारमधून चार वेळा लोकसभेवर निवडून आले होते. महाराष्ट्रात शिक्षण व प्रारंभीचा राजकीय काळ व्यतीत केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी बिहारची निवड केली आणि १९६४ मध्ये पहिल्यांदा मुंगेर मतदारसंघातून निवडून आले. सोशालिस्ट पार्टी व प्रजा सोशालिस्ट पार्टीचे विलीनीकरण होऊन युनायटेड सोशालिस्ट पार्टी तयार झाली होती, त्यामार्फत मधू लिमये लोकसभेवर गेले होते. त्यानंतर ते युनायटेड सोशालिस्ट पार्टीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्षही बनले.
राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यामुळे बिहारच्या मातीत समाजवादी विचारधारा रुजली होती. आज बिहारमध्ये ज्या तऱ्हेने जातीपातींचे राजकारण चालते, तसे राजकारण त्या काळात बिहारमध्ये नव्हते. समाजवादी विचारसरणीचा बिहारच्या राजकारणावर प्रभाव होता, त्याचमुळे मधू लिमये यांच्यासारखा समाजवादी विद्वान एकदा-दोनदा नव्हे, तर चार वेळा लोकसभेवर जाऊ शकला. मधू लिमये संसदेत असताना सत्ताधारी पक्षाचे भले भले नेते त्यांना वचकून होते. मधू लिमये यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, की भल्या भल्यांची भंबेरी उडत असे. त्या अर्थाने त्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपला वचक निर्माण केला होता.

सी. डी. देशमुख, बॅरिस्टर नाथ पै, मधू लिमये ही मंडळी सत्तेच्या साठमारीत नसल्यामुळे राजकीय चर्चेत त्यांचे संदर्भ येत नाहीत. परंतु, दिल्लीच्या राजकारणात, संसदीय वर्तुळात त्यांच्याप्रती असलेला आदर त्यांनी केवळ विद्वत्तेच्या बळावर कमावला होता. त्याचमुळे सत्तेच्या राजकारणातील यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण या नावांना जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व सी. डी. देशमुख, नाथ पै, मधू लिमये, मधू दंडवते इत्यादींना आहे.
(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी निवासी संपादक आहेत.)

‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)

Video : असा रंगला ‘लय भारी’चा उद्घाटन सोहळा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी