32 C
Mumbai
Friday, February 16, 2024
Homeसंपादकीयशिस्तप्रिय चव्हाण, उमदे देशमुख आणि लढवय्ये मुंडे ( ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन...

शिस्तप्रिय चव्हाण, उमदे देशमुख आणि लढवय्ये मुंडे ( ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन यांचा विशेष लेख)

लय भारी'च्या दिवाळी विशेषांकामध्ये ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

प्रमोद महाजन : भाजपचे चाणक्य
एकेकाळी भाजपचे राष्ट्रीय रणनीतीकार – चाणक्य म्हणून ज्यांचा दबदबा होता, ते प्रमोद महाजनसुद्धा मराठवाड्याचेच अंबाजोगाईचे. आधी आरएसएसचे कार्यकर्ते आणि नंतर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते मासबेस लीडर नव्हते; पण पॅलेस पॉलिटिक्समध्ये ते निष्णात होते. ते कुशल संघटक होते. लालकृष्ण अडवानी यांच्या प्रसिद्ध रथयात्रेचे नियोजन त्यांचेच होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर महाजन वाजपेयींच्या खूप जवळ गेले. अनेक गुंतागुंतीच्या मोहिमा त्यांनी फत्ते केल्या. भाजपचे संकटमोचक म्हणून काम पाहिले. भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये सुषमा स्वराज यांच्याबरोबरीने महाजनांचे नाव भविष्यातील पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून घेतले जात असे.

देशात अनेक प्रादेशिक पक्षांना भाजपसारख्या राजकीयदृष्ट्या अस्पृश्य पक्षाशी युती करावयास लावण्यात वाजपेयींची प्रतिमा जशी कारणीभूत होती, तसेच महाजन, जेटली व स्वराज यांचे अथक प्रयत्नदेखील कारणीभूत होते. महाजन हे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार होते. बाळासाहेब ठाकरे यांचा महाजनांवर पूर्ण विश्वास होता. आज प्रमोद महाजन हयात असते, तर शिवसेना व भाजप एकत्रच असते. महाजनांचे सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता अशा विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही वैयक्तिक संबंध उत्तम होते. त्यामुळे लोकसभेत महाजनांचे फ्लोअर मॅनेजमेंट उत्तम असे. टॉपच्या उद्योगपतींशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि त्यामुळे तेव्हा भाजपला कधी निधीची कमतरता पडत नसे. पण, गृहकलहाने महाजनांची इनिंग वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी संपली.

ओबीसींचा चेहरा- मुंडे
गोपीनाथराव मुंडे हे वसंतराव भागवतांचे फाईन्ड. भागवतांच्या ‘माधव’ पॅटर्नचे मुंडे बिनीचे शिलेदार बनले. गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजनांचे कॉलेजच्या दिवसापासूनचे मित्र. पुढे महाजनांच्या बहिणीशी मुंडें यांनी लग्न केले. मग घट्ट मैत्री नात्याच्या धाग्यात विणली गेली. गोपीनाथराव मासबेस असलेले नेते बनले. महाराष्ट्रातील ओबीसी समूहाचा चेहरा बनले. भाजपवरील शेटजी-भटजींचा पक्ष हा शिक्का पुसून भाजपाला बहुजनांचा पक्ष बनवण्याचे काम मुंडेंनी केले. त्यांना एकनाथ खडसे, अण्णा डांगे, पांडुरंग फुंडकर यांनी मोलाची साथ दिली. विरोधी पक्षनेते म्हणून मुंडे यांनी थेट टॉपचे नेते शरद पवार यांच्यावर हल्ले चढवीत आरोपांचा धुरळा उडवून दिला होता. त्या काळात मुंडे यांना शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि अखेरच्या टप्प्यात सुधाकरराव नाईक यांच्याकडून मोलाचे ‘मार्गदर्शन’ होत होते, अशी चर्चा होती. पवारांसारख्या राष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या नेत्यांशी संघर्ष केल्याने राष्ट्रीय स्तरावर मुंडेंचे नाव गेले.
मुंडे अत्यंत आक्रमक व हुशार नेते होते. राज्यात युतीचे सरकार आले, तेव्हा मुंडे उपमुख्यमंत्री झाले. हे पद त्यांनी गाजवले. मनोहर जोशी व नारायण राणे यांच्याशी त्यांची जुगलबंदी रंगत असे. कार्यकर्त्यांत रमणारा, अडचणीतील कार्यकर्त्याला झोकून देऊन सर्व मदत करणारा हा नेता होता. भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आवर्जून भेटत. आपुलकीने बोलत आणि त्याचे कामही झटपट मार्गी लावीत. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंना मुख्यमंत्री केले, तर अनेक अपक्ष आमदार व दोन लहान पक्ष सरकारला पाठिंबा देण्यास तयार होते, अशी चर्चा तेव्हा होती. पण, शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडला नाही आणि युतीची सत्ता गेली. त्यानंतर गोपीनाथरावांना सातत्याने संघर्षरत राहावे लागले. त्यांनी राज्यभर भाजपचे नवे नेतृत्व उदयास आणले, कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे विणले . सहकारी व खासगी साखर कारखानदारीचे जाळे विणले. ऊसतोड कामगारांसाठी प्रदीर्घ संघर्ष करीत अनेक प्रश्न मार्गी लावले.
प्रमोद महाजन यांच्या मैत्रीने त्यांना काही महत्त्वाच्या प्रसंगांत लिफ्ट मिळाली; पण प्रमोद महाजन यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर महाजनांच्या भाजपमधील विरोधकांनी मुंडेंना टार्गेट केले. मुंडे पक्षांतर्गत विरोधाला एवढे वैतागले होते की, ते काँग्रेसमध्ये जाणार होते; पण सुषमा स्वराज यांनी त्यांना आग्रह करून थांबवले, अशा चर्चा त्या काळी सुरू होत्या. पृथ्वीराज चव्हाण याबाबत खरे काय ते सांगू शकतील. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी राजू शेट्टी, महादेवराव जानकर, पाशा पटेल यांना भाजपबरोबर घेतले. त्याचा मोठा लाभ पक्षाला झाला होता. मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री झाल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या विकासाची खूप स्वप्ने होती; पण नियतीच्या मनात तसे नव्हते. केंद्रीय मंत्री झाल्यावर अवघ्या आठवडाभरातच काळाने त्यांना हिरावून नेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची कारकीर्द संपली.
हे सुद्धा वाचा
Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !
Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक
निष्ठेचे दुसरे नाव चाकूरकर
लातूरचेच डॉक्टर शिवराज पाटील-चाकूरकर हे विद्वान व अभ्यासू नेते. लोकसभेचे सभापती म्हणून त्यांचे काम वाखाणले गेले होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे ते लॉयलिस्ट होते. नरसिंह राव यांच्या काळात सोनिया गांधी एकाकी पडल्या होत्या, तेव्हा चाकूरकर व सुशीलकुमार शिंदे सोनिया गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चाकूरकरांचा जर पराभव झाला नसता, तर मनमोहन सिंग यांच्याऐवजी चाकूरकरांचे नावच पंतप्रधान पदासाठी सोनिया गांधी यांच्या मनात होते, असे दिल्लीतील जाणकार सांगतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावरसुद्धा सोनिया गांधी यांनी शिवराज पाटील-चाकूरकर यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात नंबर दोनची पोझिशन मानले गेलेले गृहमंत्रिपद त्यांना दिले. शंकरराव चव्हाण यांची पुण्याई आणि स्वतःचे कर्तृत्व या जोरावर अशोक चव्हाण यांनीसुद्धा मुख्यमंत्रिपद भूषविले.
यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात गृहनिर्माण संस्थांना भूखंडवाटप केलेले होते. पण, आदर्श प्रकरणात कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या शवपेट्या काही चॅनेल्सनी वारंवार दाखवून चव्हाणांच्या विरोधात एवढी वातावरणनिर्मिती केली की, मीडिया ट्रायलने त्यांचा बळी घेतला. आदर्श प्रकरणात अशोकराव काही गंभीर चुकांमुळे अडकले. मात्र, नांदेड शहर व जिल्ह्यात अजूनही त्यांचाच शब्द अंतिम मानला जातो. नांदेडचा गेल्या २० वर्षांत त्यांनी सर्वांगीण विकास केला आहे. सर्वोच्च पदापर्यंत ‘राजकीय कमबॅक’ करण्याचे सामर्थ्य असलेला हा नेता आहे.

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर सर्वांत कमी काळ राहिलेले कै. शिवाजीराव पाटील-निलंगेकर हेसुद्धा मराठवाड्याचे. उच्च पदावर असताना ताकही फुंकून प्यावे, असे म्हणतात. निलंगेकरांवर गुणवाढ प्रकरणात संक्रांत कोसळली. वसंतदादा गटाचे ते नेते होते. अखेरच्या टप्प्यात गृहकलहाने ते सत्तेपासून दूर टाकले गेले. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे भगीरथ होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जायकवाडी धरण, सर्वांत मोठी उपसा जलसिंचन योजना, विष्णुपुरी, कोयना, वारणा, मुळा आदी प्रकल्पांना त्यांनी चालना दिली. अप्पर वर्धा, पेंच, येलदरी, निम्नतेरणा दुधना, मांजरा, नांदूर मधमेश्वर लेंडी, खडकवासला, पूर्णा असे मोठे व मध्यम प्रकल्प हाती घेऊन त्यांनी निम्म्या महाराष्ट्राची तहान भागवण्याचे काम केले. या धरणांमुळे शेती तर बागायती झालीच; पण अनेक महानगरे, शहरे आणि खेड्यांची तहान भागली. या पाण्याने औरंगाबादसारख्या अविकसित भागात १९८० नंतर उद्योगधंदेही आले.
Jayant Mahajan's article on Gepinath Munde, Vilasrao Deshmukh, Shankarao Chavan
एवढे प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेले; पण प्रकल्पाच्या कंत्राटदारांना ते जवळपासही फिरकू देत नसत. ते अभ्यासू आणि गुणग्राही नेते होते. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी जायकवाडी धरणाची मुख्य भिंत बांधण्याचे अशक्यप्राय काम खात्यामार्फत केले ते चव्हाणांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावरच. शंकररावांनी महाराष्ट्रात मोठे, मध्यम व लहान प्रकल्प उभे करण्याचे जे काम केले, त्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कौतुक केले होते. शंकरराव चव्हाण यांची जन्मभूमी पैठण; तर कर्मभूमी नांदेड राहिली. हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात कायद्याची पदवी घेत असताना त्यांचा संबंध हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी आला. त्यानंतर शंकररावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये स्वतःला झोकून दिले. याच काळात स्वामीजींचे अनुयायी असलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी त्यांची मैत्री झाली. ही मैत्री अखेरपर्यंत कायम राहिली.
पुढे शंकररावांनी नांदेड येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि १९५६ मध्ये झालेल्या निवडणुकीत नांदेडचे नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंकरराव चव्हाण धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये उपमंत्री म्हणून समावेशदेखील झाला. त्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकीय यशाची कमानही सातत्याने उंचावतच राहिली. सातत्याने ५० वर्षे ते राज्यात किंवा केंद्रामध्ये मंत्रिपदावर राहिले.

शंकररावांनी नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी या तीन पिढ्यांबरोबर काम केले. इंदिरा गांधी यांचा शंकररावांवर खूपच विश्वास होता. वसंतराव नाईक यांच्यानंतर १९७५ ते १९७७ या काळात शंकरराव राज्याचे मुख्यमंत्री होते. १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी शंकररावांना केंद्रीय मंत्री केले. पुढे त्यांच्याकडे संरक्षणमंत्री पदाची धुरा सोपवली होती. राजीव गांधी यांनी तर शंकरराव चव्हाण यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री केले होते. त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळातच पंजाब, आसाम, मिझोराम अशा अशांत प्रांतांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम आणि अनेक महत्त्वपूर्ण करार झाले. निलंगेकरांना १९८६ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर राजीव गांधी यांनी शंकररावांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये पाठवले. अडीच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर १९८८ मध्ये शरद पवार यांना मुख्यमंत्री करायचे म्हणून शंकररावांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्या काळी शंकरराव चव्हाण यांचे दिल्ली दरबारात किती वजन होते याची प्रचिती मात्र त्या प्रसंगात आली. ज्या दिवशी सकाळी शंकररावांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी सायंकाळी दिल्ली येथे त्यांचा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथविधी करण्यात आला होता.ते सर्व बैठकांना होमवर्क करून जात. अधिकारी मोघम विधाने किंवा दिशाभूल करू लागले की, त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होई. मग अशा अधिकाऱ्यांची फजिती होई. जे नियमात बसत नाही आणि पैशाची उधळपट्टी होईल अशी कामे ते साफ नाकारत असत. त्यातून त्यांना हेडमास्तर हे नाव पडले होते.राज्यातील प्रभावी व ताकदवान नेत्यांच्या दबावाला ते जुमानत नसत. राज्यातील सामर्थ्यवान नेत्यांशी त्यांना नेहमी संघर्ष करावा लागला; पण त्यांनी कधीही संघर्षात माघार घेतली नाही.

पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे १९९१ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे आली, तेव्हा त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन जीवनातले मित्र शंकरराव चव्हाण यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रिपदाची धुरा सोपवली. १९९१ ते १९९६ या पाच वर्षांच्या काळामध्ये शंकरराव चव्हाण यांचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये खूप प्रभाव होता. १९९७ पासून ते सक्रिय राजकारणातून हळूहळू दूर होत गेले आणि आपले चिरंजीव अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी त्यांनी आपले बळ आणि सदिच्छांचे संचित उभे केले.

विलासराव एक उमदा नेता
माणसाने आयुष्यात काय कमावले हे त्याच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या गर्दीवरून कळते, असे जाणकार सांगतात. विलासराव देशमुख यांच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह देशभरातील सर्व मोठे नेते लातूर शहरात जमले होते. लातूरच्या पंचक्रोशीत पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती. तरुण वयात बाभूळगावच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या विलासराव देशमुख यांनी उण्यापुऱ्या ६७ वर्षांच्या आयुष्यामध्ये किती माणसे जोडली होती याचे दर्शन त्या दिवशी घडले. याशिवाय घरोघरी लाईव्ह टेलिकास्टद्वारे अंत्यसंस्कार पाहणारे कोट्यवधी डोळे पाणावलेले होते.

विलासरावांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे, देखणे व उत्साही होते. ते अत्यंत हजरजबाबी होते. त्यांच्याकडे कमालीचे संभाषणचातुर्य होते. त्यांच्या वक्तृत्वाचा धबधबा सुरू झाला म्हणजे सभागृहामध्ये कधी हशा उसळे, तर कधी टाळ्यांचा कडकडाट होई, तर कधी श्रोत्यांचे डोळे पाणावत. विनोद, उपरोध व उपहास ही त्यांच्या वक्तृत्वाची प्रमुख शस्त्रे होती. विरोधकांवर टीका करताना ते कधीही पातळी सोडून बोलत नसत आणि टोला शालजोडीतूनच लगावत असत. शंकरराव चव्हाण विलासरावांचे राजकीय गुरू होते. प्रारंभीच्या काळात त्यांनी विलासरावांचे नेतृत्वगुण हेरले आणि त्यांना लिफ्ट दिली. विलासराव आणि सुशीलकुमार शिंदे यांनी १९९१ मध्ये शरद पवार यांच्याविरोधात बंड केले होते. त्याची परतफेड पवारांनी १९९५ मध्ये केली. विलासराव चक्क आमदारकीची निवडणूक हरले. एवढेच नव्हे, तर विधान परिषद निवडणुकीत बंड केल्यावर विलासरावांना गोपीनाथरावांनी साथ दिली. पण, पवारांनी पुन्हा तडाखा दिला आणि फक्त अर्ध्या मताने ते पराभूत झाले. या काळात ते खूप भावनाप्रधान आणि हळवे झाल्याचे तीनचार भेटींत जाणवले होते.

१९९९ च्या विधानसभेला विलासराव स्वगृही परतलेले होते. माधवराव शिंदे यांनी आपले वजन विलासरावांच्या पारड्यात टाकून त्यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर विलासराव आमूलाग्र बदलले. ते विद्युत वेगाने राजकीय खेळ्या खेळू लागले. त्यांनी महाराष्ट्रभर जनसंपर्क वाढवला. श्रद्धा आणि सबुरी हा गुरुमंत्र त्यांनी स्वीकारला. पक्षाचे आमदार जोडले. त्या काळात हायकमांडकडून निरीक्षक म्हणून येणाऱ्या मार्गारेट अल्वा आणि इतर निरीक्षकांनी त्यांची सातत्याने कोंडी केली. पण, आजचा दिवस आपला असे मानून ते काम करीत राहिले. सुशीलकुमार शिंदेंसाठी त्यांना मुख्यमंत्री पद पक्षश्रेष्ठींनी सोडायला लावले. त्यांना मध्य प्रदेश, कर्नाटकची जबाबदारी दिली. पण, विलासराव २००४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात गुपचूप केव्हा येत आणि काँग्रेस उमेदवारांना भेटून ‘मदत’ करून केव्हा जात हे कोणाला कळायचे नाही.

विधानसभेचे निकाल लागताच काँग्रेसच्या दिल्ली हेडक्वार्टरमधील फॅक्सवर विलासरावांना मुख्यमंत्री करा, अशी नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची पत्रे धडकू लागली. ५२ आमदारांची पत्रे फॅक्सवर आल्यावर हायकमांडला सुशीलकुमार शिंदेंना राज्यपाल; तर विलासराव यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांना असाध्य आजाराने ग्रासले. पैलतीर दिसत असताना विलासरावांनी आधी आपल्या राजकीय विरोधकांच्या भेटी घेऊन सर्व मतभेद दूर केले आणि देशमुख घराण्यातील पुढच्या पिढीचा मार्ग निर्धोक राहील याची खबरदारीही त्यांनी घेतली.

(लेखक ‘सकाळ’च्या औरंगाबाद आवृत्तीचे माजी संपादक आहेत, तसेच ‘सरकारनामा’ या पोर्टलचे माजी संपादक आहेत)

‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)

Video : ‘लय भारी’ची बातमीदारी तळागाळात पोहचेल : बाळासाहेब थोरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी