देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराने भाजपची अब्रु घालवली, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मिळालाय दारूगोळा !

प्रेक्षकहो, आमच्या या व्हिडीओचं शिर्षक पाहिल्यानंतर तुमच्या मनात, विशेषत: भाजपवर प्रेम असलेल्या लोकांच्या मनात एक गोष्ट वळवळली असेल. ती म्हणजे, तुषार खरात हे मुद्दामहून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लोकांमध्ये विष पसरवत आहेत(Devendra Fadnavis’s beloved MLA Jaykumar Gore discredits BJP.). पण मी तुम्हांस सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर मला आदर आहे. याची काही कारणं आहेत. महत्वाचं म्हणजे, माझ्या २५ वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दित मी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला सर्वाधिक भेटलोय. मी सकाळमध्ये ‘सकाळ इन्व्हिस्टीगेशन टीम’चा म्हणजेच एसआयटीचा प्रमुख असताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या पाच वर्षांच्या कारकिर्दित मी किमान २० – २५ वेळा देवेंद्र फडणविसांना भेटलो असेल. आमचे ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याबरोबर मी फडणवीस यांना नेहमी भेटायला जायचो. त्यामुळं आमच्या सकाळच्या कोणत्याही उपक्रमासाठी फडणवीस यांची अपॉईन्मेट घ्यायची असेल, किंवा त्यांना कार्यक्रमाला बोलवायचे असेल तर ती जबाबदारी माझ्यावर पडायची, आणि देवेंद्र फडणवीस ती लागलीच मान्यही करायचे.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

एकदा तर फडणवीस यांनी मला तब्बल एक तासाची मुलाखत दिली होती. अन् त्यावर मी सकाळमध्ये पानभर फिचर केलं होतं. त्याहून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मी छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची आठ थैल्या कागदपत्रे शोधून काढली होती. त्या ठिकाणी मला पोलिसांची मदत हवी होती. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. फडणवीस यांनी त्यावळचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख प्रवीण दिक्षित यांना निरोप देवून पुढच्या १५ ते २० मिनिटांत भुजबळ यांच्या एका गुप्त ठिकाणी पोलिसांची धाड टाकायला लावली होती. त्यात आठ थैल्या सरकारी कागदपत्रे सापडली होती. त्यावर आम्ही सकाळ व साम टिव्हीने जोरदार बातम्यांचा सपाटा लावला होता. आमच्या या कामगिरीची दखल घेवून फडणवीस यांनी त्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तब्बल १४ अधिकाऱ्यांना एका झटक्यात निलंबित करून टाकले होते. राजभवनच्या समोर ‘द लिजेंड’ नावाचा एक टॉवर आहे. हा तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घोटाळा आहे. हा घोटाळाही त्यावेळी माझ्या टीम उघडकीस आणला होता. माझे सहकारी गोविंद तुपे यांना त्यासाठी प्रेस क्लबचा एक लाख रूपयांचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते मिळाला होता. फडणवीस यांच्या अशा या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्यामुळं व्यक्तीगत माझी, आणि आमच्या ‘सकाळ इन्व्हिस्टीगेशन टीम’ पत्रकारिता क्षेत्रात उंची वाढायला मदत झाली होती.

त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर मला आदर आहे. फडणवीस हे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व आहे. समोरचा माणूस काय लायकीचा आहे, हे ते लगेचच ओळखतात. त्यांच्याकडे आपण एखादा विषय़ मांडला, त्यांना एखादं पत्र दिलं तर त्या विषय़ाची खोली त्यांना चटकन कळते. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. खरंतर, अनेक पत्रकारांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या या ओळखीचा मी यापूर्वीच व्यक्तिगत लाभासाठी फायदा उचलू शकलो असतो, पण मी ते केलं नाही. कारण मी कधीच कोणत्याही व्यक्तीच्या फार जवळ जात नाही. कारण ज्यावेळी मला माझा पत्रकारितेचा धर्म बजावण्याची वेळ येईल, तेव्हा समोरच्या व्यक्तीवर पत्रकारितेचे आसूड ओढण्याचा माझा अधिकार शाबूत राहिला पाहीजे, याची मी काळजी घेतो. देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य कोणताही मोठा नेता असो, मी त्यांच्यावर आसूड ओढण्याचा माझा अधिकार आजही शाबूत ठेवलेला आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ

देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेक चांगले गुण आहेत, तसे वाईटही गुण आहेत. गेल्या १० वर्षांत फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या १० वर्षांत त्यांना अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या, पण त्यांनी चांगल्या पेक्षा वाईट गोष्टी जास्त केल्या आहेत. त्यामुळं फडणवीस यांच्याविषयी मला व्यक्तिगत पातळीवर आदर असला तरी त्यांनी केलेल्या चुकांवर आसूड ओढणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर आम्ही अधिकच ताकदीनं आसूड ओढणार आहोत. किंबहूना, फडणवीस यांनी केलेल्या या मोठ्या भ्रष्टाचाराची संपूर्ण फाईल माझ्याकडं आहे. हा भ्रष्टाचार राधाकृष्ण विखे पाटील यांनीच बाहेर काढलेला होता. पण तो चव्हाट्यावर आलेला नाही. तो भ्रष्टाचार सुद्धा मी लवकरच चव्हाट्यावर आणणार आहे.

आजच्या व्हिडीओचं प्रयोजन मात्र ते नाही. मला दुसऱ्याच विषयावर बोलायचं आहे. तो विषय आहे, देवेंद्र फडणविसांच्या एका लाडक्या आमदाराचा. या आमदाराला गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर घेतलं. त्याचे सगळे फाजिल लाड पुरविले. या बिनडोक व गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला त्याच्या मतदारसंघात बेधूंद कारभार करता यावा म्हणून गृहखात्याचा, महसूल खात्याचा वाट्टेल तसा वापर करू देण्याची संधी फडणवीस यांनी करून दिलीय. पण या महाप्रतापी आमदाराने अशी काही घाण करून ठेवलीय की, ती अख्ख्या भाजपला अडचणीत आणणारी ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या आमदाराच्या प्रतापावर ताशेरे ओढले आहेत. गृहखात्याची तर पुरती अब्रु निघाली आहे. या आमदाराने केलेले प्रताप म्हणजे विरोधकांना आयतंच कोलीत मिळालंय. ऐन विधानसभा निवडणुकीत या आमदाराचे प्रताप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेवून भाजप हा मड्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे, हे ठासून सांगण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. या महाडेंजर आमदाराचे नाव आहे, जयकुमार गोरे. हे जयकुमार गोरे प्रकरण इतकं डेंजर आहे की, बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी ‘लखोबा लोखंडे’ या नावाने जयकुमार गोरे यांना निश्चितपणे उपाधी दिली असती. छगन भुजबळ यांच्यापेक्षाही जयकुमार गोरे यांना ‘लखोबा’ ही उपाधी कशी अधिक समर्पक आहे, असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच सांगितले असते. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण न्यायव्यवस्था अजून शाबूत आहे. मुंबई उच्च न्यायालयानेच या जयकुमार गोरे यांची व देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस खात्याची पुरती चंपी केलीय. म्हणूनच हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा. ज्या माणसाला काळीज आहे, तो माणूस जयकुमार गोरे व त्यांच्या भाजपला शिव्याशाप दिल्याशिवाय राहणार नाही.

या जयकुमार गोरेंमुळे अख्खा भाजप कसा अडचणीत आलाय, हे मी या व्हिडीओत सांगणार आहे. हे सांगण्यापूर्वी मला तुम्हा प्रेक्षकांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर करायची आहे. गुगलचा ‘गुगल न्यूज इनिसिएटिव्ह’ हा देशपातळीवरचा फार मोठा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी गुगलने गेल्या वर्षी आमच्या ‘लय भारी’ची निवड केली होती. गुगलच्या या महत्वकांक्षी योजनेत स्थान मिळविणारे ‘लय भारी’ हे पहिलेच एकमेव मराठी पोर्टल होते. याचा केवळ आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी आम्ही करू शकलो होतो. आता यंदा पुन्हा गुगलने ‘लय भारी’ला ‘गुगल न्यूज इनिसिएटिव्ह’ या उपक्रमात सामावून घेतले आहे. आमच्यासह एकूण २४ मराठी न्यूज पोर्टल्सनी या उपक्रमात स्थान मिळविलंय. देशभरातून एकूण ३५० न्यूज पोर्टल्सनी या उपक्रमात स्थान मिळवलंय. या उपक्रमाअंतर्गत गुगलकडून ज्ञान, तंत्रज्ञान, प्रशिक्षण व घसघशीत अनुदान दिलं जातं. आम्ही आता जी काही धारदार पद्धतीने पत्रकारिता करीत आहोत, ती केवळ गुगलच्या उपकारामुळंच. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारितेसाठी वरवंटा ठरलेले आहेत, अशा परिस्थितीत गुगलने आमच्या पत्रकारितेला उत्तेजन देण्यासाठी दिलेली ताकद ही कधीही न विसरता येण्यासारखी आहे. त्यांनी पत्रकारितेसाठी ताकद दिली नसती तर असे व्हिडीओ आम्ही तयारच करू शकलो नसतो. गुगलने आम्हाला जशी ताकद दिली तशी ताकद मायबाप प्रेक्षक व वाचकांनीही द्यावी. म्हणूनच आपण आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा, फेसबूक पेज फॉलो व लाईक करावे, अशी आम्ही आपणांस विनंती करतो.

तर मी जयकुमार गोरे यांच्याविषयी बोलत होतो. जयकुमार गोरे हे माण – खटाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात डॉ. एम. आर. देशमुख नावाच्या एका उच्च विद्याविभूषीत व्यक्तीनं वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न असे रूग्णालयं सुरू केलं होतं. महाविद्यालय नवीनच होतं. सुरूवातीला काही छोट्या मोठ्या चुका झाल्या. त्यामुळं हे महाविद्यालय व रूग्णालय अडचणीत आलं. डॉ. देशमुख ही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ होती. ते पूर्वांपार भाजपचेच कार्यकर्ते होते. पण त्यांना राजकीय छक्केपंजे काहीच माहित नव्हते. त्याचाच गैरफायदा जयकुमार गोरे यांनी उचलला. त्यावेळी जयकुमार गोरे कॉंग्रेसमध्ये होते. गोरे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधलं. जयकुमार गोरे कुठल्या अटीवर भाजपमध्ये गेले, याची अख्ख्या माण – खटाव मतदारसंघामध्ये आजही चर्चा होत असते. डॉ. देशमुख यांनी उभं केलेलं महाविद्यालय मला द्या, मी भाजपमध्ये येतो, अशी गोरे यांनी मागणी केली. गोरे यांना पतंगराव कदम यांच्यासारखं शिक्षणसम्राट व्हायचं होतं. फडणवीस व तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हे महाविद्यालय जयकुमार गोरे यांच्या घशात घालण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या.

जयकुमार गोरे महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष झाले. डॉ. एम. आर. देशमुख यांच्याकडून त्यांनी एक प्रकारे महाविद्यालय विकतच घेतलं.

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

महाविद्यालय ताब्यात घेतल्यानंतर जयकुमार गोरे यांनी ‘मड्याच्या टाळूवरील लोणी खायला सुरूवात केली.’ याच अत्यंत संतापजनक प्रकारावरून मुंबई उच्च न्यायालयाने जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही यावरून पोलिसांना धारेवर धरलंय.

जयकुमार गोरे यांनी हा मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा जो प्रकार केला तो कोरोना काळातील आहे. कोरोना काळात जयकुमार गोरे यांचं हे मायणी महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. म्हणजे कोरोना रूग्णांवर उपचार करण्याची सगळी सूत्रं सरकारने ताब्यात घेतलेली होती. तरीही महाप्रतापी जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनुदान मिळविलं. हे अनुदान मिळविताना अगदी रावण किंवा कंसाच्या वृत्तीचा माणूस सुद्धा जितकी पापं करणार नाही, तितकं पापं ही जयकुमार गोरे यांनी केलियतं. त्यांनी मृत झालेल्या रूग्णांवर उपचार केलेले दाखविले आहेत. म्हणजे रूग्ण ज्या तारखेला मृत झाला, त्याच दिवशी किंवा एक दोन दिवसांत त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले असतील. पण ती व्यक्ती मृत झाल्यानंतर सुद्धा महिना, दिड महिना त्याच्यावर उपचार चालू होते असे जयकुमार गोरे यांनी दाखवलंय. मृत झाल्यानंतर सुद्धा या रूग्णांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत. म्हणजे, जयकुमार गोरे यांना अनुदान मिळावं म्हणून मेलेली माणसे काही काळासाठी जिवंत झाली. त्यांनी जयकुमार गोरे यांना हव्या त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, असा हा मोठा चमत्कार जयकुमार गोरे यांनी घडवून आणलाय. अशा जवळपास २०० मृतांवर उपचार केल्याचे पुरावेच महाविद्यालयाचे तत्कालिन उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी मिळविले आहेत. त्यातील काही पुरावे घेवून ते न्यायालयात गेले आहेत. खरंतर, जयकुमार गोरे यांनी १६०० रूग्णांचे सरकारकडून अनुदान घेतलंय. ते अनुदान साधारण साडेचार कोटी रूपये इतकं आहे. त्यापैकी अवघ्या २०० जणांचेच पुरावे हाती आलेले आहेत. उरलेल्या रूग्णांचेही पुरावे हाती आल्यानंतर गोरे यांनी किती भन्नाट घोटाळे केले आहेत, याच्या नवनवीन सुरस कथा ऐकायला मिळतील.

प्रेक्षकहो, अनुदान लाटण्यासाठी जयकुमार गोरे यांनी ज्या भानगडी केल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. जयकुमार गोरे यांनी चक्क मयत लोकांच्या खोट्या स्वाक्षरी दाखविल्या आहेत. त्यांनी एका बाजूला मयत लोकांच्या नावावर सरकारकडून पैसे उकळले, पण दुसऱ्या बाजूला रूग्णांच्या नातेवाईकांकडून सुद्धा पैसे उकळलेत. न्यायालयात प्रकरण उजेडात आल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये संताप भडकला आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यातून दररोज नवेनवे संतापजनक प्रकार समोर येत आहेत. कचरे नावाच्या एकाने पोलिसांकडे तक्रार केलीय. कचरे यांची आई मृत झाली होती. आईच्या नावाने जयकुमार गोरे यांनी सरकारकडून अनुदान उकळलय. पण कचरे यांच्याकडून सुद्धा पैसे उकळले आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या मृत आईच्या  अंगावरील दागिने सुद्धा उपचारादरम्यान गायब झाले आहेत, असा संताप या कचरे यांनी व्यक्त केलाय.

जयकुमार गोरे यांनी सध्या जिवंत असलेल्या व त्यावेळी कोरोनाचा उपचार घेतलेल्या अनेक रूग्णांच्याही नावाने अनुदान लाटलंय. या जिवंत लोकांच्याही त्यांनी खोट्या सह्या केल्या आहेत. एवढंच कशाला, जे डॉक्टर या रूग्णालयात कार्यरत नव्हते, त्या डॉक्टरांनी रूग्णांवर उपचार केल्याचेही गोरे यांनी दाखवंलय. या डॉक्टरांच्या सुद्धा खोट्या स्वाक्षरी त्यांनी केल्या आहेत. जयकुमार गोरे यांनी आपल्या नावाचा गैरप्रकार केलाय हे त्या डॉक्टरांना सुद्धा ठावूक नव्हते. दीपक देशमुख यांनी सगळं कांड बाहेर काढल्यानंतर डॉक्टर सुद्धा चक्रावून गेले आहेत. मानवता जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात जयकुमार गोरे नावाचा सैतान घुसल्याचे त्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय.

हे अनुदान लाटण्यासाठी जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी विश्वस्त मंडळाला अंधारात ठेवून दुसऱ्या शहरात जावून बँकेत नवे अकाऊंट उघडल होतं. या अकाऊंटवर गोरे यांनी अनुदान पदरात पाडून घेतलंय. हे अकाऊंट उघडल्याबद्दल महाविद्यालयांच्या विश्वस्तांना सुद्धा काहीच माहित नाही. संस्थेचे तत्कालिन उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळं गोरे यांचं हे सगळं कांड बाहेर आलं आहे.

महाभारत व रामायणात आपण अनेक खलनायक पाहिले आहेत. रावण, कंस, दुर्योधन व १०० कौरव असे अनेक राक्षसी खलनायक आपल्याला माहित आहेत. या सगळ्या खलनायकांनी जर जयकुमार गोरे यांचे हे प्रताप बघितले तर त्यांनाही लाज वाटेल. पण आश्चर्य असंय की, हे सगळं पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना व सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांना लाज वाटलेली नाही.

देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही, त्यामुळे न्यायालयानेच आता गृह खात्याची लाज काढलीय. मी अगोदर नमूद केलेल्या विविध प्रकरणातील काहीच प्रकरणे न्यायालयासमोर आली आहेत. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केलेला आहे. न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत, त्यातून आमदार गोरे, पोलीस खातं, देवेंद्र फडणवीस आणि अख्खा भाजप पक्ष यांच्या अब्रुच्या चिंध्या झाल्या आहेत.

वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांना न्यायालयानं धारेवर धरलंय. समोर पुरावे दिसत आहेत. मग तुम्ही FIR दाखल का करीत नाहीत ? असा सवाल न्यायालयाने केलाय.

या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी गोरे यांचा यात दोष नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर न्यायालय सवाल केला, तुम्ही सरकारी वकील आहात की, आरोपीचे वकील आहात. तुमच्या वागण्यावरून वाटत नाही की तुम्ही सरकारी वकील आहात. त्यावर सरकारी वकिलांना न्यायालयाची अक्षरश: माफी मागावी लागली.

पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी न्यायालयासमोर लेखी म्हणणे मांडले होते. त्यात याचिकाकर्ते दीपक देशमुख यांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. आरोग्य खात्याने आमच्याकडे तक्रार करायला हवी, असे सोनावणे यांनी म्हटले होते. सोनावणे यांचे हे पत्र न्यायाधिशांनी चिमटीत धरून उचलले, आणि सोनावणेंना सांगितले की, तुमचा हा कागद कचऱ्याच्या डब्यात टाकण्याच्या दर्जाचा आहे.

याच वेळी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर एक खोटी माहिती दिली. शशिकांत कुंभार या व्यक्तीला जबाबासाठी बोलवले होते. पण ते आलेच नाहीत, असे सरकारी वकील म्हणाले. खरंतर शशिकांत कुंभार यांनी अगोदरच जबाब दिलेला आहे. सरकारी वकील न्यायालयासमोर खोटी माहिती देत असताना पोलीस निरीक्षक सोनावणे यांना मात्र घाम फुटला. त्यावर न्यायाधिश म्हणाले की, इथं इतकी माणसं आहेत. एसी सुद्धा चालू आहे. मग तुम्हाला एकट्यालाच घाम का फुटला आहे ?

महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडील कागदपत्रांची पडताळणी करायची आहे म्हणून पोलिसांनी वेळ मागितली. त्यावर न्यायालयाने वेळ दिली. पण वेळ देताना सांगितलं की, या प्रकरणातील एक जरी पुरावा सापडला तर त्याच वेळी तात्काळ गुन्हा दाखल करा.

न्यायालयाने अशा पद्धतीने पोलिसांचे व सरकारचे वाभाडे काढलेले आहेत. त्यानंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत आम्ही माहिती घेतली तेव्हा असं समजलं की, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यावर वरून मोठा दबाव आहे. वरून कोणाचा दबाव आहे, हे आता देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याची गरज नाही. अशा वरच्या दबावामुळे IPS असलेले समीर शेख सिंघमची भूमिका घेण्याऐवजी म्याव मांजर झालेयत. त्यामुळं ते आमदार जयकुमार गोरे यांना वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत.

प्रेक्षकहो, मी जाता जाता चार गोष्टी सांगतो.

पहिली गोष्ट, ज्या उच्च विद्याविभूषीत डॉ. एम. आर. देशमुख यांनी हे महाविद्यालय उभं केलं त्यांच्यावरच देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने ईडीची कारवाई केलीय. हे डॉ. एम. आर. देशमुख व त्यांचे आणखी एक भाऊ आप्पासाहेब देशमुख, अशा या दोघांना तुरूंगात डांबून ठेवलंय. म्हणजे जे समाजासाठी काहीतरी करू इच्छित होते, त्यांना तुरूंगात डांबलंय आणि जे जयकुमार गोरे घोटाळे करीत आहेत, त्यांना भाजपने सामान्य लोकांच्या गळ्याचे घोट घेण्यासाठी मोकाट सोडलयं. ही ईडीची कारवाई किती बोगस आहे यावरही मी स्वतंत्र व्हिडीओ तयार करणार आहे.

दुसरी गोष्ट, हा व्हिडीओ तयार करीत असताना जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांचा एक कागदोपत्री पुरावा माझ्याकडे आलेला आहे. त्यात सोनिया गोरे यांना दर महिन्याला साधारण पाच लाख रूपये पगार मिळत होता. पगार देणारा एक रेशनिंग ठेकेदार होता, असे सकृतदर्शनी दिसत आहे. याबाबतही मी एक स्वतंत्र दुसरा व्हिडीओ तयार करणार आहे.

तिसरी गोष्ट, जयकुमार गोरे हा उडाणटप्पू, गावगुंड, यापूर्वी दारूचे व्यवसाय केलेला, डझनभर गुन्हे असलेला माणूस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा अत्यंत नतद्रष्ट माणूस माण – खटावच्या बोडक्यावर आणून बसवलाय. या उलट भाजपमध्ये माजी आमदार दिलीप येळगावकर हे RSS चे कार्यकर्ते असलेल्या चांगल्या माणसाला फडणवीस यांनी अक्षरशः सडवलंय. येळगावकर हे प्रचंड बुद्धीमान, प्रचंड अभ्यासू, प्रचंड वैचारिक क्षमता असलेले व मतदारसंघाची खडानखडा माहिती असलेलं व्यक्तिमत्व आहे. यावरही मी स्वतंत्र व्हिडीओ तयार करणार आहे.

चौथी गोष्ट, जयकुमार गोरे ज्यावेळी माणच्या राजकारणात आले त्यावेळी त्यांनी या मतदारसंघाच्या लगतच कटगुण या महात्मा फुलेंच्या गावात जावून महात्मा फुलेंचा काहीतरी आदर्श घेतला असावा. याच मतदारसंघात शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला महिमानगड येथे जावून जयकुमार गोरे यांनी शिवाजी महाराजांचा काहीतरी आदर्श घेतला असावा. याच मतदारसंघात संताजी घोरपडे यांचीही समाधी आहे. त्यांचाही काहितरी आदर्श घेतला असावा, असे माझ्यासारख्या व्यक्तीला वाटले होते. माझ्या मायभूमीसाठी जयकुमार गोरे काहीतरी चांगलं करतील असा माझा गैरसमज झाला होता. त्या गैरसमजातून मी गोरे यांच्या टेबलला सुरूवातीला मतदान केले होते. जयकुमार गोरे यांच्या या आदर्शवादी कार्याचा आढावा घेणाराही व्हिडीओ मी तयार करणार आहे.

तूर्त इतकेच. जयकुमार गोरे यांच्या आदर्शवादी व्हिडीओंची पुढची मालिका तुम्ही आवर्जून बघा. धन्यवाद.

तुषार खरात

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago