Categories: राजकीय

काँग्रेस – राष्ट्रवादी महाआघाडीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खुले पत्र

महाराष्ट्रात पुन्हा भाजप – शिवसेना महायुतीचे सरकार येईल असे बऱ्याच जणांना वाटते आहे. माध्यमांनी हवा भरल्यामुळे आणि महाजनादेशाच्या इव्हेन्टमुळे असे चित्र उभे राहिले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आता फक्त शपथच घ्यायची बाकी आहे. परंतु प्रत्यक्षात जनमत वेगळे आहे. जमिनीवरील वातावरण वेगळे आहे.

कुजबूज करणारी आरएसएसची फौज, ९५ टक्के प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया भाजपधार्जिणा असल्याने ते भाजपाच्या बाजूने प्रचाराला उतरले आहेत. ही मंडळी बोलतात की, आणखी पुढची पाच वर्षे तरी हेच सरकार राहणार. त्यानंतरचे काही सांगता येणार नाही. हे लोक बेरकीपणाने ‘देशाला, राज्याला भाजपशिवाय पर्यायच नाही’ असे वातावरण तयार करत आहेत.

ईव्हीएमची भीती दाखवून ही मंडळी दुसऱ्या पक्षाच्या मतदारांना मतदान करण्यास निराश करत आहेत. जर हे लोक ईव्हीएममुळे निवडून येणारच असतील तर आपण कशाला मतदान करायचे, असा विचार करण्याच्या वृत्तीमुळे आघाडीला कमी मतदान होत आहे. युतीचे मतदार पक्के असल्याने आणि त्यांना सुद्धा ईव्हीएमचा आधार वाटत असल्याने ते असा विचार करतात की, सरकार आपलेच येणार आहे. तेव्हा आपण अजून कष्टाने पक्षाचे काम करू. कारण भविष्यात आपल्या सरकारकडून आपल्याला हवे तसे काम करून घेता येईल.

मित्रांनो, ईव्हीएमचे सोडा, भाजपची ग्राऊंड फिल्ड जबरदस्त आहे. त्यांचे कार्यकर्ते तन – मन – धनाने काम करतात. आघाडीच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हीसुद्धा असेच काम करा. तुमच्या पक्षाच्या उमेदवाराकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका. फक्त ह्या सरकारला हरवायचे आहे, ह्या एका निर्धारानेच निवडणुकीचे काम करा. ईव्हीएमचा धसका सर्व कार्यकर्त्यांनी मनातून काढून टाकावा.

मतदार संघाच्या प्रत्येक यादीवर युतीचे कार्यकर्ते सखोल काम करतात. प्रत्येक पानाची जबाबदारी त्यांनी वाटून घेतली आहे. आपणही स्वतःचे पैसे खर्च करून मतदार याद्या मिळवा. आपल्या विभागातील, चाळीतील, बिल्डिंगमधील, गल्लीमधील मतदारांच्या घरी जा. त्यांना भेटा. सगळं कसं मनापासून करा. आपल्याला हे सरकार घालवायचंय, हे लक्षात ठेवा. नंतर ओरडत बसू नका.

आपण सध्याची बेरोजगारी बघतोय. उद्योगधंदे बंद पडत आहेत. महागाई प्रचंड वाढलीय. महिन्याचे रेशन, दररोजची भाजी, कांदे, टोमॅटो, मिरची ह्यांचे भाव सामान्यांना परवडत नाहीत. नवीन कपडे घेता येत नाहीत. महागाईमुळे सणसुद्धा साजरे करता येत नाहीत. दिवाळी हाता तोंडावर आली आहे. पण दिवाळीसाठी खर्च करण्याची ऐपत कुणाकडेही नाही.

रस्ते बांधणीतील भ्रष्टाचार बघा. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे शेकडो अपघात होऊन कित्येक जणांचे संसार उदध्वस्त होत आहेत. लोकल ट्रेनमधील रोजच्या दगदगीत आम्ही कशाला जगतोय हाच सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे.

अमूक अमूक रथी – महारथी पक्षांतर करीत आहेत. त्यामुळे ह्यांच्यावर असा काय अन्याय झाला म्हणून हे सर्व पक्ष सोडत आहेत, हा प्रश्न डोक्यात सारखा घोंघावतोय (पक्षांतर करणे म्हणजे पक्षांतर केलेल्या नेत्याला ज्या मतदारांनी मतदान केले त्या मतदारांचा घोर अपमान आहे). पक्षांतर करणा-या नेत्यांना गंगेच्या घाटावर पवित्र करून घेतले जात आहे.

रामदास फुटाणे एका वात्रटिकेत म्हणतात, ते अगदी खरे आहे.

१) अंधारातून एक एक

सत्तेच्या पटावर आले

जुने साहेब हृदयात

तर नवे मनगटावर आले.

 

२) शूर आम्ही आमदार आम्हाला

फक्त ईडीचीच भीती

वित्त, भक्त अन सत्तेसाठी

कमळ घेतले हाती.

पक्षांतर करणारे नेते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत. स्वतःची अगणित प्रॉपर्टी वाचविण्यासाठी ते पळत आहेत. ते कधीही निवडून येणार नाहीत ह्याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमुळे तोटा तर सोडाच, मोठा फायदाच झाला आहे. स्वतः नितीन गडकरी म्हणतात की, “ही पक्षांतर करणारी मंडळी कोणाचीच नसतात. ह्यांना पाडा. उंदरं आहेत ही.”

मित्रांनो, ह्यावेळी अटीतटीची लढाई आहे. प्रस्थापित सरकार गेलेच पाहिजे ह्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हे राजकारण नसून आपल्या घरचे कार्य आहे असे समजून तुम्ही सर्वजण कामाला लागा. उमेदवार कोणत्याही गटाचा असुद्या त्याला विजयी करणे हे एकमेव ध्येय समोर ठेवा.

काँग्रेसकडे असलेल्या १२५ जागांपैकी किमान ६० ते ६५ जागा आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या १२५ जागांपैकी किमान ६५ ते ७० जागा तसेच मित्रपक्षांच्या ३८ जागांपैकी किमान १५ जागा तर नक्कीच निवडून येऊ शकतात. म्हणजेच १३८ ते १४८ जागा मिळून आघाडीचे सरकार सहज येऊ शकते.

मित्रांनो हे घडू शकते. हे सहज शक्य आहे.

सत्ताधारी मंडळी तुम्हाला राम मंदिर, हिंदू-मुस्लिम, ३७०, भारत-पाकिस्तान, काश्मिर ह्या मुद्द्यांवर खेळवतील. तुम्ही मात्र बेरोज़गारी, महागाई, खड्डेमुक्त रस्ते, लोकल प्रवास, मंदी, पेट्रोल-सोन्याचे भाव, शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, वस्त्यांची दूरावस्था, पूरस्थिती, दुष्काळ ह्या प्रश्नांच्या सोडवणुकीवरच ठाम राहा.

ह्या सरकारच्या उद्दाम वागण्यामुळे राजकारणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला राजकारण नकोसे वाटायला लागले आहे. ते घाबरत आहेत. अशी अवस्था कधीच नव्हती. अगदी आणीबाणीच्या काळातसुद्धा.

तुम्हाला मग्रूर, अहंकारी मंडळी हवी असतील तर तुम्ही नक्की त्यांनाच मत द्या. मात्र तुम्हाला ‘आपलेपणाचे आणि आपल्या भल्याचे सरकार’ हवे असेल तर आघाडीसाठीच काम करा. आघाडीसुद्धा धुतल्या तांदळासारखी नाही, असा जनमाणसात प्रवाद आहे. परंतु दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने विचार करा. हेवेदावे करु नका. जीवनमरणाचा प्रश्न आहे हे लक्षात ठेवा. हे जर पुन्हा ५ वर्षे आपल्या उरावर बसले तर आपले काही खरे नाही. ५ वर्षे हा आपल्या आयुष्यातील फार मोठा काळ असतो हे लक्षात ठेवा.

युतीच्या पक्षात सुद्धा बरेच नाराज़ आहेत. त्यांचे सर्व काही आलबेल चालले आहे असे समजू नका. त्यांच्यातसुद्धा भरपूर भांडणं आहेत. फक्त ते दार बंद करुन भांडत आहेत इतकेच. विरोधकांतील नाराजांना प्रेम द्या. आपले करा.

निष्ठा काय आहे हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. ती वाया घालवू नका. आघाडीच्या मतदारांनो, आतापर्यंत आपण दिलेल्या  मतांमुळेच आपल्या महाराष्ट्राची प्रगती झाली आहे. जनता सध्या भयंकर हैराण आहे, प्रचंड चिडलेली आहे. त्यांचा संताप मतांमध्ये परावर्तित करुन घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनो आपली आहे. अतिशय आक्रमकपणे प्रचार करा.

लोकसभेच्या अगदी विरुद्ध निकाल ह्यावेळी लागणार आहेत. ह्यापूर्वी सुद्धा अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत पराभूत होणारे, विधानसभा निवडणुकीत विजयी होतात.

मनातील नकारात्मकता काढून टाका. सकारात्मक विचार करा. हे सरकार जाणार म्हणजे जाणार. आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणार.

Yes… We Can…

जय महाराष्ट्र, जय भारत.

आपला,

ॲड. विश्वास काश्यप, 

मुंबई

तुषार खरात

Recent Posts

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

11 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

11 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

11 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

12 hours ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

13 hours ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

13 hours ago