राजकीय

भाजपाच्या देणगी मोहिमेचे स्वागत करायला हवं; शिवसेनेचा खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन पक्षासाठी देणगी म्हणून पैसे देऊन त्याचे फोटो शेअर केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी पक्षासाठी देणगी देण्याचं आवाहन केलंय. मात्र याच विषयावरुन शिवसेनेनं आता सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत जगातील सर्वात श्रीमंत पक्षाला देणगी दिल्याने देश बलाढ्य होणार असा जो दावा पंतप्रधानांनी केलाय त्याचा काडीमात्र संबंध नाही असा टोला लागावलाय(Shiv Sena criticize BJP over donation campaign).

भाजपावर देणग्या गोळा करून चूल पेटविण्याची वेळ

“भारतीय जनता पार्टीने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा वगैरेंनी पक्षाला प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी देऊन पैसे दिल्याची पावती सोशल मीडियावर झळकवली आहे. मोदी-शहांनी देणगीची पावती समाज माध्यमांवर फडकवताच पक्षाचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी वगैरे बड्या मंडळींनीही पक्षनिधीच्या पावत्या फाडल्या. पक्षासाठी अथवा राजकीय कार्यासाठी देणग्या घेणे यात अजिबात गैर नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक चळवळींत लोकांच्या देणग्यांचेच पाठबळ मिळत राहिले, पण इतर सर्व आणि भाजपामध्ये फरक आहे. भाजपावर देणग्या गोळा करून चूल पेटविण्याची वेळ अद्याप तरी आलेली नाही. भाजपा हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष असावा,” असा चिमटा शिवसेनेनं काढलाय.

अयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार;शिवसेनेचा हल्लाबोल

संजय राऊत यांचे विधानसभेसाठी भाजपला आव्हान

 २०१४ पासून कोणाची बँक खाती कशी तरारून फुगली

“भाजपा हा सत्तेत नव्हता तेव्हा ‘शेठजीं’चा पक्ष अशीच त्याची ओळख राजकारणात होती. ही ओळख शिवसेनेशी मैत्री झाल्यावर पुसली गेली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाल्यावर, अयोध्या आंदोलनाने जोर धरल्यावर भाजपा लोकांपर्यंत पोहोचला. भाजपा त्याआधी काय होता हे काय कुणाला माहीत नाही? ते काही असले तरी भाजपाचे नाव श्रीमंतांच्या यादीत झळकले, याचे कुणाला दुःख होण्याचे कारण नाही. तरीही भारतीय जनता पार्टीने आता लोकांकडून पाच रुपयांपासून, ५०,१००,५०० व एक हजार रुपयांपर्यंत देणग्या घेण्याचे मायाजाल टाकले आहे. म्हणजे आपला पक्ष लोक वर्गणीवर उभा आहे हे त्यांना दाखवायचे आहे, पण भाजपाने २०१९-२० सालात ३६२३.२८ कोटी रुपयांची ‘संपत्ती’ जाहीर केली आहे. भाजपाचा जमाखर्च, नफा-तोटा खाते आता सगळ्यांसमोर आहे. तसे इतर पक्षांचेही आहे. २०१४ पासून कोणाची बँक खाती कशी तरारून फुगली हे काही लपून राहिलेले नाही. कधी काळी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हीच बरकत होती,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

त्यामुळे भाजपा’ हा अल्पावधीत अतिश्रीमंत पक्ष

“भारतीय जनता पर्टीला पैसा जमा करण्याची कला अवगत आहे. तशी राजकीय विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कलांतही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. नोटाबंदी काळात त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेच होते, स्वपक्षाच्या बड्या देणगीदारांना आधीच नोटाबंदीची माहिती देऊन त्यांना सुरक्षित केले, पण विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच त्यांचा उदात्त हेतू होता. विरोधी पक्षांच्या हाती निवडणुका लढण्यासाठी फार साधने राहू नयेत व त्यांच्यावर भिकेची वेळ यावी अशी तरतूद गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलगू देसम, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या देणगीदारांना या ना त्या मार्गाने त्रास द्यायचा व फक्त भाजपाला पैसे द्या, इतरांना द्याल तर याद राखा अशा गुप्त मोहिमा राबविण्यात आल्याचे खुलेपणाने बोलले जात आहे. त्यामुळे ‘भाजपा’ हा अल्पावधीत अतिश्रीमंत पक्ष झाला व त्यांचा थाट-माट-तोरा वाढला याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचा पराभव करावा लागेल : संजय राऊत

Shiv Sena objects to ‘meow’ taunt against Aaditya Thackeray, legislative council seeks report on incident

देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय?

“आजही उत्तर प्रदेशात जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतशा आयकर विभागाच्या धाडींचा जोर वाढू लागला. या धाडींमागे एक राजकीय सुसूत्रता आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मैदानातील एक प्रमुख खेळाडू बहनजी मायावती या स्वतःच तंबूत परतल्या आहेत. याचे रहस्यही सगळे जण जाणून आहेत. यामागे कोण व का? हे उघड आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी हजारो कोटी रुपये आधीच जमा झाले असतानाही रामाच्या नावावर जनतेकडून पावत्या फाडण्याच्या प्रकारांवरही टीकेची झोड उठली. भाजपाच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे ते अयोध्येत भाजपा परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले. ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र आहे?

पुढे लेखामध्ये, “या प्रश्नाचे उत्तर श्री. मोदी यांनी देऊन टाकले आहे. “देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व आजन्म देशसेवा करणाऱ्या आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संस्कृतीला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळेल. तुमच्या मदतीमुळे भाजपा व आपला देश आणखी बलाढ्य होईल.’’ अशी चिंता श्री. मोदी यांनी करावी हे आश्चर्यच आहे. देशात लॉकडाऊन पुन्हा येत आहे. देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपाच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले. कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे, स्वातंत्र्यवीर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ , सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढ्य होत जाईल, पण हे सर्व कुचकामी असून भाजपाच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल. मागच्या लॉकडाऊन काळात आर्थिक व्यवस्था ढासळून पडली आहे. महागाई, बेरोजगारीने कहर केला आहे. पेट्रोल-डिझेल आजही शंभरी पार आहे. त्यात कोणताही दिलासा मिळत नाही. मग अशा वातावरणात जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र आहे?” असा टोला लगावण्यात आलाय.

इतर राजकीय पक्षांवर आर्थिक निगराणी ठेवली जाते आणि

“भाजपच्या देणगी मोहिमेचा व राष्ट्रहिताचा, देश बलाढ्य होण्याचा काडीमात्र संबंध नाही. भाजपाच्या तिजोरीत बडे उद्योगपती, ठेकेदार, बिल्डर्स, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात देणग्या देत असतात. सत्ताधारी हे मोठे लाभार्थी ठरतात व इतर पक्षांनाही कमी-जास्त प्रमाणात देणग्यांचा लाभ मिळत असतो. हे खरे असले तरी भाजपा सोडून इतरांना देणग्या मिळू नयेत, निवडणुकीत इतर राजकीय पक्षांची आर्थिक नाकेबंदी व्हावी यासाठीही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. इतर राजकीय पक्षांवर आर्थिक निगराणी ठेवली जाते व त्यांचे नाक-तोंड दाबून भाजपा स्वतःची श्रीमंती दिवसेंदिवस वाढवीत आहे,” असा आरोप शिवसेनेनं केलाय.

तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही

“कोविड काळात स्थापन झालेल्या खासगी स्वरूपाच्या पी. एम. केअर फंडात हजारो कोटी रुपये गोळा झाले. त्यातील आर्थिक उलाढालींवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपा किंवा पंतप्रधान अद्याप देऊ शकले नाहीत. भाजपाच्या तिजोरीची व पी. एम. केअर फंडाची तिजोरी वाढता वाढता वाढतच आहे. त्यात नागरिकांकडून पाच रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत देणग्या घेऊन नैतिक मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे देश आणखी बलाढ्य खरंच होईल? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही,” असा उपरोधिक टोला शिवसेनेनं लगावला आहे.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago