35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रअयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार;शिवसेनेचा हल्लाबोल

अयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार;शिवसेनेचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई: उत्तर प्रदेशातील (UP) अयोध्येत Ayodhya भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम सुरू आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला मंजुरी देण्यात आल्यानंतर येथील जमिनीला सोन्याचा भाव आलाय असं म्हटल्यास गैर ठरणार नाही. मात्र या निकालानंतर अयोध्येमधील जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये स्थानिक आमदार आणि नोकरशहांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. अशा प्रकारे जमीनी घेणं म्हणजे ‘हिंदुत्वाचा चोरबाजार’ असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.( Ayodhya is a thief market of Hindutva, Shiv Sena’s attack)

“भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजार’ आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजपा पुढारी, भाजपाचे आमदार, महापौर, भाजपा गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. हे व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत, योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, पण त्याच दरम्यान भाजपा परिवारातील व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरातील मोक्याच्या जमिनींचे व्यवहार सुरू केले. मंदिरासाठी राम जन्मभूमी ट्रस्टने ७० एकर जमिनीचे अधिग्रहण केले, पण त्याच वेळी भाजपासंबंधित आमदार, नगरसेवक, पोलीस अधिकाऱ्यांनी जमिनी विकत घेऊन मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Shiv Sena : ‘दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा, निवडणुकांवरील उधळपट्टी थांबवा’, भंडारा घटनेनंतर शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

भाजपाच्या १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; निलंबनाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

“आमदार, महापौर, राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य, विभागीय आयुक्त, पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य माहिती आयुक्त, त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिराच्या चार-पाच किलोमीटरच्या परिसरात कोटय़वधींचा जमीन व्यवहार केल्याचे वृत्त सरकारी नोंदीसह ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले. मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल व आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे. राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण व मंदिराच्या नावावर मलिदा खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे,” असा ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

“व्यवहार कसा झाला तो पहा. अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्या जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला १६ कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. महापौर श्री. उपाध्याय हे भाजपाचे. प्रभू श्रीरामाच्या नावावरचा हा चोरबाजार. यालाच कोणी हिंदुत्व मानत असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत घातलेलेच बरे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? शिवसेनेचा सवाल

Shiv Sena hits back at Amit Shah for ‘Hindutva betrayal’ remark

 “शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वापासून कशी फारकत घेतली वगैरे प्रवचने भाजपाचे पुढारी झोडत असतात, पण भाजपाचे हे ‘व्यापारी’ हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो. व्यवहार आणि व्यापारातून या मंडळींनी प्रभू श्रीरामासही सोडले नाही. राममंदिराचा लढा उभारून भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचविणाऱ्या लालकृष्ण आडवाणींना अडगळीत टाकले व आता राममंदिर परिसरात व्यापारी केंद्रे उभी केली. म्हणजे मंदिरासाठी बलिदाने इतरांची व व्यापार यांचे. स्वातंत्र्य विकून खाणारे व राममंदिराचा व्यापार करणारे एकाच जातकुळीचे आहेत. जे स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत त्यांनी स्वातंत्र्यानंतर सत्तेचा सर्वात जास्त फायदा घेतला. तसेच राममंदिर लढ्याचे घडले आहे,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

‘‘आम्ही बाबरी पाडलीच नाही हो…’’ असे सांगून पळ काढणाऱ्यांचे ‘वंश’ मंदिर परिसरातील इस्टेट एजंट बनले व त्या इस्टेट एजंटांकडे ईडी, सीबीआयचे लक्ष जात नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. राममंदिर लढ्यातील करसेवकांवर गोळय़ा झाडणारे जितके गुन्हेगार आहेत त्यापेक्षा मोठे गुन्हेगार राममंदिर लढ्यातील हौतात्म्याचा हा असा व्यापार करणारे आहेत. राममंदिरापाठोपाठ आता भाजपा नेत्यांनी मथुरेत मंदिर उभारणीची घोषणा केलीच आहे. त्यामुळे मथुरेतील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमीन-जुमल्यांचे रक्षण करावे हेच बरे,” असा खोचक टोलाही लेखामधून लगावण्यात आलाय.

 “महाराष्ट्राचे एक जोरदार मंत्री नवाब मलिक यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांनी मंदिरांच्या जमिनी कशा हडप केल्या, त्यातून बेनामी पद्धतीने कोटय़वधीचे व्यवहार कसे केले ते उघड कले आहे. बीड जिह्यातील आष्टी तालुक्यातील तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांची ५१३ एकर जमीन भाजपाच्या नेत्यांनी हडप केली आहे. कागदपत्रांत फेरफार करून हजारो कोटींचा घोटाळा केला, असा आरोप मलिक यांनी केला आहे. जमिनी लाटण्याचे एक तंत्र आहे व भाजपा पुढाऱ्यांच्या ‘रोखशाही’ने हे तंत्र विकसित केले आहे. भाजपा पुढाऱ्यांनी एखाद्या मंदिर उभारणीची घोषणा केली किंवा मंदिराचे भूमिपूजन केले की आसपासच्या परिसरातील लोकांना भीती वाटू लागते. आमच्या जमिनीचे काय होणार, हे भय त्यांना वाटते. भाजपाने हे जे नवहिंदुत्व निर्माण केले आहे त्यामुळे हिंदू समाज बदनाम होईल व निराशेच्या गर्तेत जाईल,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“हिंदूंनी जे लढून मिळवले ते आजच्या व्यापारी मंडळींनी मंदिर व्यवहारात गमावले. उद्या हे मंदिरांचेही लिलाव करतील. एकंदरीत अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपाच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय आता कायमस्वरूपी अयोध्येतच उघडायला हवे. नंतर मथुरा आहेच. ‘राम नाम सत्य है’ हे इतरांसाठी. भाजपासाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे! लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपावाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत! देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे,” असा टोलाही शिवसेनेनं लगावलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी